कृष्णा नेमाने
शेंद्रा : यंदा चांगला आणि भरघोस पाऊस असल्याने आणि मागील वर्षीच्या चांगल्या पावसाने शेतकऱ्यांनी फळ पिकाकडे आपले लक्ष केंद्रित केले आहे. या वर्षीच्या रब्बी हंगामात फुलवलेल्या डाळींब पिकाला मात्र मधमाश्यांअभावी पूर्ण परागीकरण होण्यात अडथळे येत असल्याने उत्पादनात घट होण्याची भीती बळावली आहे. डाळिंबबागामध्ये परागीकरण न होण्याच्या धास्तीने पंचक्रोशीतील शेतकरी धास्तावले आहेत.
शेंद्रा, वरुड काजी, वरझडी, वाडखा इत्यादीसह पंचक्रोशीत २०० ते ३०० एकर क्षेत्रावर डाळींब पिकाचे उत्पादन घेतले जाते. या वर्षीच्या हंगामात पूर्ण क्षमतेने पाऊस झाल्याने मागील हंगाम शेतकऱ्यांना पाहिजे तेवढा समाधानकारक गेला नाही. म्हणून रब्बी हंगामातील फळपिकाला महत्त्व दिले आहे. डाळींब फळाचे परागीकरण होण्यासाठी भरपूर प्रमाणात मधमाश्या बागामध्ये वावरणे महत्त्वाचे असते, मधमाशी एका फुलावरून दुसऱ्या फुलावर नियमित फिरत असल्याने परागीकरणाचे प्रमाण लक्षणीय वाढतात, मात्र मधमाशा कमी प्रमाणात असल्याने फळबागधारक शेतकरी संकटात सापडला आहे.
मधमाशा आकर्षणासाठी फुलझाडे लावा...
शेताच्या बांधावरील वृक्षतोड झाली आणि जाळी झुडपे शेताशेजारी नसल्याने मोहोळ नामशेष झाल्याचे दिसत आहे. बागांमध्ये मधमाश्यांना आकर्षित करण्यासाठी शेतकऱ्यांनी झाडा जवळ झेंडूचे झाडे, कांदा बियांचे रोप लावावे तसेच झाडांच्या खोडाला गुळाचा लेप लावल्यास मधमाश्यांचे प्रमाण वाढण्यास मदत होईल.
- एस. जी. मिर्झा, सहा, कृषी अधिकारी
खर्च निघणार नसल्याची खंत..
३ एकर डाळिंबबाग आहे. मधमाशा पाहिजे त्या प्रमाणात अनेक उपाय करून येत नसल्याने केलेला खर्च तरी निघावा ही अपेक्षा आहे.
-भाऊसाहेब तुपे , शेतकरी, शेंद्रा बन
कॅप्शन.. १)डाळिंबाची बाग