कन्नड : शहरामधील सर्व दुकानदारांनी चेहऱ्याला मास्क लावावा, आपल्याकडे येणाऱ्या ग्राहकांनाही मास्क लावण्याचा आग्रह धरावा, त्याशिवाय त्यांना वस्तू देऊ नये, असे केले तरच यावर मार्ग निघू शकतो. तालुका प्रशासनाने विनामास्क वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी पथक नेमले आहे. पथक दिसताच बरेच लोक चेहऱ्याला मास्क लावतात, पथक निघून गेले की मास्क काढून टाकतात. एवढ्या सूचना वारंवार देऊनही नागरिकांनी ऐकले नाहीतर दंडात्मकसह फौजदारी कारवाईही केली जाईल, असा इशारा तहसीलदार संजय वारकड यांनी दिला आहे.
तालुक्यामध्ये कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. त्यादृष्टीने मंगळवारी तहसीलदार संजय वारकड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीमध्ये वारकड यांनी त्रिसूत्रीचा अवलंब करणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच तोंडाला मास्क, सोशल डिस्टन्सिग ठेवणे व सॅनिटायझरचा वापर करणेही आवश्यक आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करावे, अशा सूचना दिल्या. लोकांनी लग्नात गर्दीची मर्यादा पाळावी, शक्यतो गर्दीमध्ये जाऊ नये. शहरांमधील जनतेने जास्तीत जास्त काळजी घ्यावी, स्वतःला व कुटुंबीयांना कोरोनापासून दूर ठेवावे. शहरांमध्ये ग्रामीण रुग्णालय व शिवाजी महाविद्यालयातील होस्टेल येथे रुग्णांवर उपचार सुरू आहेत. नागरिकांनी मास्क न लावल्यास किंवा नियम मोडल्यास फाैजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा वारकड यांनी दिला आहे. यावेळी पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे, ग्रामीणचे पोलीस निरीक्षक सुनील नेवसे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. देगावकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. लांजेवार, मुख्याधिकारी हारुण शेख, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण पवार आदी उपस्थित होते.