वीज चोरी भोवली, एकास तीन महिन्याचा तर दुसऱ्याला एक वर्षाचा कारावास
By Admin | Updated: December 13, 2014 23:58 IST2014-12-13T23:58:07+5:302014-12-13T23:58:07+5:30
लातूर : विजेच्या तारेवर आकडा टाकून वीजचोरी करणाऱ्या आरोपीला लातूरच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने एक वर्षाची कैैद व १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे़

वीज चोरी भोवली, एकास तीन महिन्याचा तर दुसऱ्याला एक वर्षाचा कारावास
लातूर : विजेच्या तारेवर आकडा टाकून वीजचोरी करणाऱ्या आरोपीला लातूरच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने एक वर्षाची कैैद व १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे़ तर दुसऱ्या प्रकरणात बोरफळच्या एका आरोपीला विज चोरीपोटी तीन महिन्याचा सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा झाली आहे़ या निकालामुळे जिल्ह्यातील वीज चोरांचे धाबे दणाणले आहेत़
चाकूर तालुक्यातील महाळंगी येथे २९ जून २००९ रोजी वडवळ नागनाथचे तत्कालिन कनिष्ठ अभियंता शकील अहमद व त्यांचे सहकारी गावात वीजमीटरची तपासणी करीत होते़ दरम्यान, शिवाजी मोतीराम डिघोळे यांचे घरी तारेवर आकडा टाकून वीजचोरी होत असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले़ केलेल्या वीज चोरीपोटी १८ हजार ६५० रुपयांचे दंडात्मक बील डिघोळे यांना दिले असता त्यांनी ते भरले नसल्यामुळे महावितरणच्या पोलिस ठाण्यात विद्युत कायदा कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल झाला़
या प्रकरणी विशेष न्यायाधीश आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश-३, लातूर यांचे समोर सुनावणी झाली़ या खटल्यात महावितरणने दाखल केलेला पुरावा ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपीला एक वर्षाची साधी कैैद व १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली़ सरकार पक्षातर्फे सरकारी वकील टी़ एस़ भोसले यांनी काम पाहिले़
दुसऱ्या एका प्रकरणात बोरफळ येथील सचिन ऊर्फ राम गणपती यादव या आरोपीला देखील आकडा टाकून वीज चोरी केल्याबद्दल तीन महिने सश्रम कारावासाची व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली़ तत्कालिन कनिष्ठ अभियंता सोमेश्वर गुजराथी व सहकाऱ्यांनी १८ फेब्रुवारी २०१२ रोजी सचिन यादव विरुद्ध ९ हजार ३३० रुपयांची वीज चोरी केल्याबद्दल महावितरणच्या पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता़ या प्रकरणात तत्कालिन सहाय्य अभियंता दिवाकर देशमुख व बोरफळचे सरपंच यांचे जवाब तपासण्यात आले़ सहाय्यक सरकारी वकील डी़एऩ भालेराव यांनी सरकार पक्षातर्फे बाजू मांडली़