लांबलेल्या पावसाने उडीद, मूग पेरणीस ‘खो’
By Admin | Updated: July 11, 2014 00:58 IST2014-07-10T23:40:49+5:302014-07-11T00:58:17+5:30
दिनेश गुळवे, बीड यावर्षी सरासरीपेक्षा तब्बल महिनाभर उशीराने वरूणराजाचे आगमन झाले आहे. यामुळे खरीपातील उडीद, मूग आदी पिकांचा पेरा अडचणीत आला आहे.

लांबलेल्या पावसाने उडीद, मूग पेरणीस ‘खो’
दिनेश गुळवे, बीड
यावर्षी सरासरीपेक्षा तब्बल महिनाभर उशीराने वरूणराजाचे आगमन झाले आहे. यामुळे खरीपातील उडीद, मूग आदी पिकांचा पेरा अडचणीत आला आहे. यामुळे कृषी विभागाच्या अंदाजापेक्षा हा पिकांचा पेरा घटणार आहे, तर इतर पिकांचा पेरा वाढणार आहे. अशा काळात शेतकऱ्यांना बियाणे मिळावे यासाठी कृषी विभागाने नियोजनही केले आहे.
बीड जिल्ह्यात सरासरी खरिपाचे क्षेत्र ५ लाख ६२ हजार ७०० हेक्टर आहे. गेल्यावर्षी वेळेवर व पुरेसा पाऊस झाल्याने तब्बल ७ लाख ८७ हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली होती. यावर्षी मात्र पावसाळा सुरू होऊन तब्बल महिनाभर पाऊस न पडल्याने शेतकरी संकटात सापडले होते. आता पाऊस पडू लागला असला तरी काही पिकांच्या पेऱ्यात घट होईल, असा अंदाज कृषी विभागातून व्यक्त होत आहे.
अनेक शेतकरी पंचांग, पावसाचे नक्षत्र व पाऊस यावर पेरणीचे नियोजन ठरवित असल्याचे शेतीनिष्ठ शेतकरी विठ्ठलराव कारंडे यांनी सांगितले. यावर्षी मृग, आर्द्रा नक्षत्र कोरडे गेल्याने खरिपातील मूग, उडीद ही पिके घेण्यास शेतकऱ्यांना अडचण येणार आहे. जिल्ह्यात या पिकांचा पेरा तब्बल वीस हजार हेक्टरवर असतो. आता हे क्षेत्र बाजरी, कपाशी, मका या पिकांकडे वर्ग होईल, असे कृषी विभागातून सांगण्यात आले.
उशिरा पडलेल्या पावसामुळे बाजारीचा पेरा ९८ हजार ५०० हेक्टरवर होऊ शकतो, असा कृषी विभागातून सांगण्यात आले. यामुळे बाजरीचे बियाणेही साहजिकच अधिक लागणार असल्याने बियाणांची मागणीही २ हजार ४६३ क्विंटलने वाढली आहे.
शेतकऱ्यांनी पीक विमा भरावा
सध्या शेतकरी पेरणी करू लागले आहेत. असे असले तरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून नैसर्गिक आपत्ती येत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. अगामी काळातही अशी आपत्ती आल्यास शेतीपिकांचे मोठे नुकसान होईल. यामुळे अशावेळी मदत मिळावी, यासाठी शेतकऱ्यांनी पीक विमा भरावा, असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले आहे.
पुरेशा ओलीवर पेरणी करावी
जिल्ह्यात चार दिवसांपासून पाऊस सुरू आहे. सध्या समाधानकारक पाऊस होत असला तरी काही ठिकाणी मात्र पुरेसा पाऊस नाही. त्यामुळे अशा ठिकाणी पेरणी केल्यास शेतकऱ्यांना अडचण येऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुरेशी ओल असेल तरच पेरणी करावी, असे मत जिल्हा कृषी अधीक्षक मुळे यांनी व्यक्त केले.