तुमच्या मिठात आयोडीन आहे का? आता घराघरांतील मिठाची तपासणी करणार आरोग्य कर्मचारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 15:21 IST2025-10-29T15:21:17+5:302025-10-29T15:21:49+5:30
जागतिक आयोडीन न्यूनता विकार प्रतिबंध पंधरवडा

तुमच्या मिठात आयोडीन आहे का? आता घराघरांतील मिठाची तपासणी करणार आरोग्य कर्मचारी
छत्रपती संभाजीनगर : आपण रोज खातो ते मीठ आयोडिनयुक्त आहे का? पण, हे ओळखण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांना रोजच्या धावपळीच्या आयुष्यात थोडीच वेळ असतो. आयोडिनच्या कमतरतेमुळे गलगंड, थायरॉईडसह अनेक गंभीर आजार उद्भवू शकतात. हीच बाब लक्षात घेऊन जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने २८ ऑक्टोबरपासून जिल्हाभर ‘आयोडिनयुक्त मीठ तपासणी मोहिमे’ला सुरुवात केली आहे.
आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले की, आयोडिनची कमतरता हा ‘सायलेंट डिसीज’ असून, त्यामुळे बालकांमध्ये मानसिक विकासात अडथळे येतात, महिलांमध्ये गर्भावस्थेत गुंतागुंत होते तसेच गलगंड, थायरॉईडचे प्रमाण वाढते. म्हणूनच प्रत्येक घरात आयोडिनयुक्त मिठाचा वापर करणे गरजेचे आहे. या मोहिमेत पुढील १५ दिवस ग्रामीण भागातील घरांमधून, शाळा, वसतिगृहे, अंगणवाड्या येथून मिठाचे रॅण्डम नमुने घेऊन त्यांची प्रयोगशाळेत तपासणी केली जाणार आहे. योग्य प्रमाणात आयोडिनयुक्त मिठाचा वापर होत आहे का, हे पाहणे या मोहिमेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. तसेच विद्यार्थ्यांचे मूत्रनमुनेदेखील घेतले जाणार आहेत.
या मोहिमेत आरोग्य साहाय्यक, आशा कार्यकर्त्या आणि अंगणवाडी सेविका यांचा सक्रिय सहभाग राहणार आहे. नमुन्यांच्या तपासणीसाठी आरोग्य विभागाने सुमारे दोन-तीन हजार किटदेखील कर्मचाऱ्यांकडे वितरित केले आहेत. एका किटमध्ये ५० टेस्ट होतात. शंकास्पद असलेल्या मिठाची तपासणी जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत केली जाणार आहे. या मोहिमेत नागरिक, विद्यार्थी, शिक्षक व आरोग्य कर्मचाऱ्यांनी सहभाग घेऊन ‘आयोडिन अभावमुक्त समाज’ घडविण्यात योगदान द्यावे, असे आवाहन डॉ. धानोरकर यांनी केले आहे.
दिवाळी सुटीमुळे लांबली मोहीम
केंद्र शासन व राज्य शासनाच्या निर्देशांनुसार १४ ते २८ ऑक्टोबर या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात आयोडिन न्यूनता विकार प्रतिबंध जनजागृती पंधरवडा राबवायचा होता. परंतु, दिवाळीच्या सुटीमुळे ते शक्य झाले नाही. या मोहिमेची सुरुवात २८ ऑक्टोबरपासून करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांच्या अध्यक्षतेखाली या मोहिमेचे उद्घाटन झाले. यावेळी जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. विशाल बेंद्रे, अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नागेश सावरगांवकर, वैद्यकीय अधिकारी (साथरोग) डॉ. सारिका लांडगे, प्रशासकीय अधिकारी रवींद्र जोशी, सहायक प्रशासकीय अधिकारी चंद्रभान बनसोडे, अनिल गवळी, शशिकांत ससाणे, बी.एस. थोरात यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.