सुरंगळी : भोकरदन तालुक्यातील सुरंगळी येथील दारिद्र्यरेषेखालील अनेक कुटुंबे रेशनकार्डापासून वंचित आहेत. कार्डच नसल्यामुळे गरीब कुटुंबाला धान्यच मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.रेशनदुकानदाराने फॉर्म न भरल्याने अनेक गरीब कुटुंबाचे बीपीएल कार्ड बंद झाले आहे. त्यामुळे शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी योजना श्रावणबाळ योजनेचे अनुदान मिळण्यास अडचणी येत आहेत. परिणामी, लाभार्थींना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.१९९१-९२ मध्ये करण्यात आलेल्या दारिद्र्यरेषेमधील कुटुंबांचे सर्वेक्षण करून काही जणांना बीपीएलचे कार्ड देण्यात आले. परंतु २००२- ०३ वर्षात करण्यात आलेल्या सर्वेमध्ये दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांचा यामध्ये समावेश करण्यात आला नाही. ज्या कुटुंबांना १९९१ च्या सर्वेनुसार रेशन कार्ड मिळाले, त्यांना आजही बीपीएल दरानुसार धान्य मिळते, परंतु यामधील अनेक कुटुंबांकडे शेती आहे. त्यांचे उत्पन्न चांगले असूनसुध्दा त्यांच्याकडे बीपीएलचे कार्ड आहे, परंतु गावात अनेक कुटुंब असे आहेत की त्यांच्याकडे ना शेती आहे ना काही उत्पनाचे साधन तरी त्यांच्याकडे बीपीएलचे कार्ड नाही. पुरवठा विभागाच्या गलथान कारभारामुळे गरीब नागरिक या कार्ड पासून वंचित राहत आहे. तरी धनधांडग्यांकडे असणारे बीपीएलचे कार्ड काढून घेण्यात यावे तसेच ते गरिब कुटुंबाला वाटप करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी या प्रकरात गांभीर्याने लक्ष घालून लाभार्थींना शिधापत्रिका देण्यात याव्यात, अशी मागणी होत आहे. मिळण्यास अडचणी होत असल्याने नागरिक खंत व्यक्त करीत आहे. शिधापत्रिकांअभावी लाभार्थींना वंचित राहावे लागत आहे. नियमित अन्नधान्य तसेच सवलती मिळत नाही. लाभार्थींचे हाल लक्षात घेता शिधापत्रिका तात्काळ देण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)भूमिहीन, गरीब कुटुंबे रेशनकार्डपासून वंचितयेथील भूमिहीन मजूरी करणाऱ्या नागरिकांकडे बीपीएल सर्वेनुसार वगळण्यात आले आहे. अनेक वर्षापासून बीपीएल कार्डपासून वंचित आहेत. अनेक विधवा महिलांकडे कार्डच नाही. शासनाच्या विविध योजनेपासून वंचित आहेत. नव्याने सर्वे करून भूमिहिनांना तात्काळ बीपीएल कार्ड देवून अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळावा यासाठी तात्काळ कार्ड देण्याची मागणी.स्वस्त धान्य दुकानदाराने स्वत:च्या मर्जीतले ग्राहक न निवडता सर्वाचे निकषानुसारच कुटुंबे निवडतात. गरीब कुटुुंबे वंचित राहू नये आणि रेशन कार्ड नव्याने तयार करून ते वाटप करण्यात यावे, असे आदेश पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिले होते. परंतु आजपर्यंत परिसरातील गरीब कुटुंबाला बीपीएलधारकाला कोणतेचे कार्ड देण्यात आले नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
स्वस्त धान्यापासून लाभार्थी वंचित
By admin | Updated: July 17, 2014 01:07 IST