कन्नड : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये आपण शिवसेना आमदार या नात्याने शिवसेनेचे स्वतंत्र पॅनल उभे करू इच्छित होतो, मात्र खा. चंद्रकांत खैरे यांनी काँग्रेसबरोबर युती करून त्या युतीला अधिकृत युती म्हणून घोाषित केल्यामुळे स्थानिक शिवसैनिकांचा हिरमोड झाला आहे. खैरे शिवसेना संपवायला निघालेत का ? असा प्रश्न निर्माण होत आहे, असा टोला आमदार हर्षवर्धन जाधव यांनी कन्नडमध्ये तातडीने घेतलेल्या पत्रकार परिषदेत लगावला.बाजार समिती व नगरपरिषद निवडणुकीसंदर्भात स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांची कुठलीही व्युहरचना नसल्याने आपण विकासमहर्षी स्व.रायभान जाधव विकास आघाडी स्थापन केली होती. मात्र या निवडणुका तुमच्याच नेतृत्वाखाली लढविल्या जातील असे पालकमंत्री रामदास कदम यांनी सांगितल्याने आपण विकास आघाडी बंद केली. शिवसेनेच्या वतीने आमदार या नात्याने १८ जागांवर मी उमेदवार तयार केले होते. शिवसेना पक्षाची कन्नड तालुक्यात प्रचंड ताकद असल्यामुळेच हा निर्णय आपण घेतला होता. मात्र या निर्णयाला जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी व खासदार चंद्रकांत खैरे यांनी फाटा देऊन स्वत:च्या मजीर्तील तीन लोकांना काँग्रेससोबत युती करण्याचे आदेश दिले. असा आरोप करताना तालुक्यातील शिवसेनेचा वाढता प्रभाव लक्षात घेता काँग्रेसबरोबर युती करणे अनुचित आहे, असे त्यांनी सांगितले.खासदार खैरेंनी पक्षश्रेष्ठींची दिशाभूल केल्यामुळे सदर युतीला त्यांनी त्यांचा पाठींबा दिला असला तरी एक सच्चा शिवसैनिक म्हणून सरसेनापती बाळासाहेब ठाकरे विकास आघाडीच्या नावाने कृउबा समितीची निवडणूक लढविणार असल्याचे घोषित करून सच्च्या शिवसैनिकांनी माझ्या शिवसेनेच्या स्वतंत्र पॅनलला पाठींबा द्यायचा का काँग्रेसशी मांडीला मांडी लावून बसणाऱ्या शिवसेनेला पाठींबा द्यायचा हा विचार योग्य पध्दतीने करावा असेही त्यांनी आवाहन केले.
चंद्रकांत खैरे शिवसेना संपवायला निघालेत
By admin | Updated: October 15, 2016 01:19 IST