गतिरोधकाचा अंदाज न आल्याने कार हवेत उडाली, दुभाजकला धडकुन पेट; पाच जण बचावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 13:25 IST2025-12-09T13:25:09+5:302025-12-09T13:25:42+5:30
छत्रपती संभाजीनगर - जालना महामार्गाच्या दिशेने येताना भरधाव कार बनगाव लाहुकी फाट्याजवळ येताच गतिरोधकाचा चालकाला अंदाज आला नाही

गतिरोधकाचा अंदाज न आल्याने कार हवेत उडाली, दुभाजकला धडकुन पेट; पाच जण बचावले
करमाड : नागपूर येथून पुणेकडे निघालेली कार समृद्धी महामार्गावरून करमाडकडे येताना बनगाव लाहुकी फाट्यावरील चौकात चालकाला गतिरोधकाचा अंदाज न आल्याने दुभाजकाला धडकून कारने पेट घेतला. सुदैवाने कारमधील पाच जण सुखरूप बाहेर पडल्याने जीवितहानी टळली. यात संबंधित किरकोळ जखमी झाल्याची घटना सोमवारी दुपारी तीन वाजता घडली. याठिकाणचा हा तिसरा अपघात असून, हे गतिरोधक अपघाताला आमंत्रण ठरत आहेत. अनिकेत दत्तात्रय झिरपे (३४), दत्तात्रय गणपत झिरपे (६१), केतकी दत्तात्रय झिरपे (५३, सर्व. रा. वडगाव शोरीती, जि. पुणे), कोमल अशोक गायकवाड (२९), कल्पना अशोक गायकवाड (५०, सर्व. रा. डोंबावली ता. कल्याण) असे या कार अपघातात किरकोळ जखमी झालेल्यांची नाव आहे.
समृद्धी महामार्गावरून नागपूर येथून पुण्याकडे कुटुंबाला घेऊन निघालेली कार एमएच १३ डीवाय ९६९१ ही शेंद्रा एमआयडीसीतील समृद्धी महामार्गाच्या जंक्शनवरून खाली उतरली. संभाजीनगर - जालना महामार्गाच्या दिशेने येताना भरधाव कार बनगाव लाहुकी फाट्याजवळ येताच गतिरोधकाचा चालकाला अंदाज न आल्याने गतिरोधकावरून कार हवेत उडाल्यानंतर चौकातील दुभाजकावर धडक बसल्याने कारने पेट घेतला. सुदैवाने कारमध्ये असलेले ५ जण सुखरूप बाहेर पडले. मात्र, या अपघातात कार पूर्ण जळून खाक झाली. काही वेळाने अग्निशमन विभागाने आग आटोक्यात आणली. पण, तोपर्यंत कार पूर्ण जळाली होती. या घटनेची नोंद करमाड पोलिसात करण्यात आली आहे.
आवश्यक उपाययोजना कराव्यात
या चौकात अशा अनेक घटना घडत आहेत. या गतिरोधकाचा चालकांना अंदाज न आल्याने अनेक अपघात या ठिकाणी घडल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. या घटनेनंतर संबंधित विभागाने या ठिकाणी अपघात नियंत्रणात कसे आणता, यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वाहनधारक करत आहे.