विद्यार्थ्यांचे पाठीवरील ओझे सेनेमुळे उतरले..!
By Admin | Updated: July 27, 2015 01:10 IST2015-07-27T00:43:45+5:302015-07-27T01:10:16+5:30
जालना : विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी करण्याबाबत प्रथम शिवसेनेने शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा केली. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानंतर मुंबईत विद्यार्थ्यांना टॅब देण्याचा निर्णय घेण्यात येऊन

विद्यार्थ्यांचे पाठीवरील ओझे सेनेमुळे उतरले..!
जालना : विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी करण्याबाबत प्रथम शिवसेनेने शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा केली. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानंतर मुंबईत विद्यार्थ्यांना टॅब देण्याचा निर्णय घेण्यात येऊन तो प्रत्यक्षात अमलात आणण्यात आला. शिवसेनेच्या या उपक्रमाचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी स्वागत करुन राज्यभरात हा निर्णय राबविता येऊ शकेल का याबाबत विचार सुरू केला अन् तसा निर्णयही घेतला. त्यामुळे हा निर्णय म्हणजे उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आणि शिवसेनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षातील क्रांतीकारक निर्णय असल्याचा दावा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी पत्रकार परिषदेत रविवारी केला.
रावते म्हणाले की, मराठवाडा हा दुष्काळी आहे. त्यात जालना जिल्ह्यात भयावह स्थिती आहे. अशा परिस्थितीवर मात करण्यासाठी जालन्यात शिवसेनेच्यावतीने शिव जल क्रांती बंधारे उभारून जिल्ह्याला जलक्रांतीच्या बाबतीत आघाडीवर नेण्याचा केलेला प्रयत्न स्तुत्य आहे.
शिवसेनेने आदीवासी भागात जेथे वीज पोहोचली नाही तेथे सौरदिवे पोहोचविले. उपेक्षितांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. शिक्षणाचे ओझे कमी करण्यासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अनेक शिक्षण तज्ज्ञांशी चर्चा केली.
८ वी ते १० च्या विद्यार्थ्यांना टॅब देण्याचा निर्णय घेतला. मुंबईत अदित्य ठाकरे यांनी एका कार्यक्रमात हा टॅबचा प्रयोग शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना दाखविल्यानंतर त्यांनी याबाबत निर्णय घेतल्याचे रावते म्हणाले.
यावेळी आ. अर्जुन खोतकर, शहरप्रमुख विष्णु पाचफुले, युवासेनेचे जगन्नाथ काकडे, भाऊसाहेब घुगे आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)