अंबानींच्या सूनबाई राधिका छत्रपती संभाजीनगरात; वडील-बहिणीसह पैठण येथील कंपनीला भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 20:03 IST2025-12-02T20:02:19+5:302025-12-02T20:03:21+5:30
याविषयी माहिती मिळताच कंपनी परिसरात बघ्यांनी गर्दी केली होती. मात्र तेथे त्यांच्या सुरक्षेचा कडक बंदोबस्त तैनात होता.

अंबानींच्या सूनबाई राधिका छत्रपती संभाजीनगरात; वडील-बहिणीसह पैठण येथील कंपनीला भेट
पैठण / छत्रपती संभाजीनगर : पैठण एमआयडीसीतील इनकोर हेल्थकेअर या औषध निर्मिती कंपनीला सोमवारी अंबानी परिवाराच्या सूनबाई राधिका मर्चंट-अंबानी यांनी त्यांचे वडील आणि बहिणीसह भेट दिली. यानंतर हे सर्वजण हेलिकॉप्टरने छत्रपती संभाजीनगरला परतले. त्यांच्या या दौऱ्यांची माहिती गुप्त ठेवण्यात आली होती.
पैठण एमआयडीसीतील या कंपनीचे संचालक असलेल्या राधिका मर्चंट, त्यांचे वडील वीरेन मर्चंट आणि बहीण अंजली मर्चंट हे सोमवारी सकाळी ११ वाजता हेलिकॉप्टरने चिकलठाणा विमानतळावरून पैठण येथे गेले. त्यांच्या कंपनीला एप्रिल महिन्यात आग लागली होती. दुरुस्तीसाठी काहीकाळ कंपनी बंद होती. कंपनी नव्याने सुरू झाल्यानंतर विविध कामांचा आढावा घेण्यासाठी अंबानी परिवाराची सून असलेल्या राधिका मर्चंट या वडील आणि बहिणीसह येथे आल्या. रविवारी रात्री ते त्यांच्या खाजगी विमानाने छत्रपती संभाजीनगरात आले. रात्री मुक्काम करून ते हेलिकॉप्टरने पैठण येथील संत एकनाथ साखर कारखान्याच्या हेलिपॅडवर उतरले. तेथून ते त्यांच्या वाहनांच्या ताफ्याने कंपनीत गेले. याविषयी माहिती मिळताच कंपनी परिसरात बघ्यांनी गर्दी केली होती. मात्र तेथे त्यांच्या सुरक्षेचा कडक बंदोबस्त तैनात होता. सोबत रुग्णवाहिका, वैयक्तिक सुरक्षा पथक व रिलायन्स टीमचे सहकारी उपस्थित होते.
नवीन उद्योगांसाठी जमीन पाहायला आल्याची चर्चा
राधिका मर्चंट (अंबानी) या ऑरिकमध्ये रिलायन्स कंपनीच्या नवीन उद्योगासाठी जमीन पाहायला आल्याचीही चर्चा होती. मात्र यास दुजोरा मिळू शकला नाही. शिवाय स्थानिक उद्योजकांच्या संघटनांनाही या दौऱ्यासंदर्भात माहिती नव्हती.