वैजाप
वैजापूर : चुकीच्या लेखापालनामुळे तालुक्यातील जवळपास ९५ टक्के शेतकी संस्था मार्चअखेर तोट्यात आल्या आहेत. हा तोटा शंभर कोटींपेक्षा जास्त असल्याचा आरोप माजी पंचायत समिती सदस्य व ब-वर्ग लेखापरीक्षक दत्तात्रय धुमाळ यांनी केला. मंगळवारी त्यांनी पत्रकार परिषदेेत ही माहिती दिली.
पुढे बोलताना धुमाळ म्हणाले की, तालुक्यात जिल्हा सहकारी बँकेच्या एकूण ११५ शेतकी संस्था आहेत. या संस्थांमध्ये चुकीच्या पद्धतीने लेखापालन होत असल्याचे समोर आले आहे. तर हा तोटा भरून काढण्यासाठी लेखापालनाच्या कामकाजामध्ये आमूलाग्र बदल करणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले. अयोग्य पद्धतीने होणाऱ्या लेखापानलामुळे जिल्हा बँकेचे देणे, विविध कार्यकारी सेवा संस्थेचे कर्जदार सभासदांकडून येणे. यात १५० कोटी रुपयांपेक्षा जास्त तफावत आहे. येत्या काळात ही तफावत वाढतच जाणार आहे. रामकृष्ण उपसा योजनेस दोनशे ते अडीचशे कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले आहे. मात्र, ही योजना बंद असल्याने बँकेचे पैसे बुडीत होण्याच्या मार्गावर आहे. तालुक्यात २००९ पासून नवीन कर्जवाटप बंद झाले आहेत. याला जबाबदार कोण, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. गेल्या तीस वर्षांत बँकेने सोसायटीवर व्याजाच्या खोट्या रकमेची आकारणी केली. ती सेवा संस्थेची येणे दाखवून रक्कम वाढवली. यात बँकेचा खोटा नफा दाखवून सभासद शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. या पत्रकार परिषदेला शिवाजी पाटील थेटे, संदीप ठोंबरे, गोरख घायवट, लक्ष्मण पवार, रवींद्र डोमे आदींची उपस्थिती होती.