खरिपासाठी लागणार ७० हजार क्विंटल बियाणे
By Admin | Updated: May 7, 2015 00:57 IST2015-05-07T00:49:40+5:302015-05-07T00:57:25+5:30
उस्मानाबाद : जिल्ह्यातील शेतकरी सध्या खरीप पेरणीपूर्व मशागतीच्या कामांमध्ये मग्न असून कृषी विभागाकडूनही पेरणीची तयारी सुरू केली आहे.

खरिपासाठी लागणार ७० हजार क्विंटल बियाणे
उस्मानाबाद : जिल्ह्यातील शेतकरी सध्या खरीप पेरणीपूर्व मशागतीच्या कामांमध्ये मग्न असून कृषी विभागाकडूनही पेरणीची तयारी सुरू केली आहे. मागील तीन-चार वर्षांपासून शेतकऱ्यांचा खरिपाच्या पिके घेण्याकडे कल वाढल्याने प्रस्तावित क्षेत्राचा आकडाही वाढत चालला आहे. खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र ३ लाख ९० हजार २०० हेक्टर इतके आहे. मात्र यंदा ४ लाख ५८ हजार ४०० हेक्टर एवढे क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे. तसेच खरिपाच्या विविध तेरा पिकांच्या सुमारे ७० हजार ३२५ क्विंटल बियाण्याची आवश्यकता आहे.
खरीप पिकांखालील क्षेत्रामध्ये झपाट्याने वाढ होत असली तरी अनियमित पाऊस आणि अवकाळीच्या फटक्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक घडी विस्कटल्याचे पहावयास मिळते. रबी पिकांची पेरणी केल्यानंतर पावसाने दडी मारली. याचा परिणाम पिकांच्या उत्पादकतेवर झाला. असे असले तरी खरीप पेरणीसाठी तरी चांगला पाऊस पडेल, या आशेवर शेतकरी पेरणीपूर्व मशागतीची कामे सुरू केली आहेत. तसेच जिल्ह्यासाठी लागणारे खत आणि बियाण्याचे नियोजन केले आहे. जिल्हाभरातील विक्रेत्यांकडे १२ हजार ३९९ मेट्रीक टन खतसाठा शिल्लक आहे. यामध्ये युरिया १ हजार १५६, डीएपी २ हजार ९१६, एमओपी ८०१, एसएसपी १ हजार ६८४, एनपीके ४ हजार ३६६ मेट्रीक टन खताचा समावेश आहे. त्याचप्रमाने इतर संस्थांकडे मिळून १ हजार ४७७ मेट्रीक टन खत शिल्लक आहे. यंदाही कृषी विभागाने कापूस, सोयाबीन पिकांसाठी सर्वाधिक क्षेत्र प्रस्तावित केल्याचे दिसून येते. एकट्या सोयाबीन पिकाखाली १ लाख ४६ हजार ९०० हेक्टर क्षेत्र येईल, असा अंदाज कृषी विभागाकडून बांधण्यात आला आहे. तसेच खरीप ज्वारी ३३ हजार ९००, बाजरी १२ हजार ६००, मका २८ हजार ५००, तीळ ३ हजार २००, सूर्यफुल ८ हजार ४००, कापूस ३३ हजार १०० तर २ हजार ५०० हेक्टवर कापसाची लागवड प्रस्तावित केली आहे. (प्रतिनिधी)
जिल्ह्याचे खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र ३ लाख ९० हजार २०० हेक्टर इतके आहे. २०१४ मध्ये प्रत्यक्ष ४ लाख ९८ हजार १०० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. ही बाब लक्षात यंदा ४ लाख ५८ हजार ४०० हेक्टर एवढे क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे. खरिपाच्या विविध तेरा पिकांच्या सुमारे ७० हजार ३२५ क्विंटल बियाण्याची आवश्यकता आहे. यापैकी महाबीजकडे ४१ हजार ८४० क्विंटल बियाणे आहे. तर २८ हजार ४८६ क्विंटल बियाणे हे खाजगी कंपन्यांकडून उपलब्ध करून घेण्यात येणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.
जिल्ह्यातील शेतकरी नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोयाबीनवर भर देत आहे. परंतु, गतवर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे सोयाबीनचे उत्पादन घटले. परिणामी पेरणीच्या काळात बियाणाचा तुटवडा निर्माण होवू शकतो. ही बाब लक्षात घेवून शेतकऱ्यांनी घरगुती बियाण्यावर प्रक्रिया करून त्याची उगवण क्षमता तपासून पेरणीसाठी उपयोगात आणावे, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.