७ वर्षांची 'ट्रेकर'! सह्याद्रीचे 'वजीर' शिखर सर करून चिमुकलीचा विक्रम; आता 'एव्हरेस्ट'चा निर्धार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 19:24 IST2025-11-14T19:24:06+5:302025-11-14T19:24:56+5:30
बाल दिन विशेष: तलवारीसारखा सुळका! अत्यंत आव्हानात्मक वजीर शिखर सर करणारी सर्वात लहान ट्रेकर; छत्रपती संभाजीनगरची मान उंचावली

७ वर्षांची 'ट्रेकर'! सह्याद्रीचे 'वजीर' शिखर सर करून चिमुकलीचा विक्रम; आता 'एव्हरेस्ट'चा निर्धार
छत्रपती संभाजीनगर : ‘पप्पा खूप मोठ्या ट्रेकला जाणार होते. त्यांनी आम्हाला त्या डोंगराचे व्हिडिओ दाखवले. ते पाहिल्यावर मला वाटलं की मीपण पप्पांसोबत जावं. मी त्यांना म्हटलं, ‘मलापण ट्रेकिंगला घेऊन चला ना’... ७ वर्षांची अर्णवी अनिकेत चव्हाण बोलत होती. जिने नुकतेच समुद्रसपाटीपासून तब्बल २,९०० फूट उंचीवर असलेले ‘वजीर’ शिखर सर केलंय. तिचा हा प्रवास तिच्याच शब्दांत...
अर्णवी सांगते, ‘‘ट्रेकिंग माझ्यासाठी नवीन नव्हतं. त्यामुळे मी पप्पांच्या मागेच लागले. शेवटी ते तयार झाले. त्या दिवशी आम्ही रात्री निघालो. सकाळी लवकर उठून आम्ही ट्रेकिंगला सुरुवात केली. सगळ्यात पुढे मी होते. बाबा मागे होते. समोर जे काका काठी घेऊन चालत होते, मी त्यांच्या मागेच होते. खूप चालत राहिलो, पण तो सुळका काही दिसेना. मग अचानक एका ठिकाणी पोहोचलो आणि मला तो दिसला. पप्पांनी दाखवलेला तोच सुळका. मी ‘हारनेस’ लावलेले होते. वर वर चढताना खूप छान वाटत होतं. बाबा मागे होते. पाऊसही सुरु झाला. भिजले तरी वर पोहोचले. वर गेल्यावर सगळीकडं पांढरं पांढरं धुकं होतं, जणू ढगांमध्ये गेल्यासारखं वाटत होतं. थंडी वाजत होती, पण खूप छान वाटत होतं.’’
...आता माऊंट एव्हरेस्ट
अर्णवीचे वडील अनिकेत चव्हाण सांगतात, नंतर तिने मला विचारले, ‘आता सगळ्यात उंच डोंगर कोणता आहे?’ मी म्हणालो, ‘माऊंट एव्हरेस्ट.’ ती लगेच म्हणाली, ‘मग मला तिथे घेऊन चला.’
रहस्य काय?
अर्णवीला हा ट्रेक पूर्ण करताना जराही भीती वाटली नाही. याचे रहस्य तिचे बाबा सांगतात, वयाच्या सातव्या वर्षी तिची शारीरिक क्षमता जास्त आहे. कारण लहानपणापासून तिला बाहेरचे खाद्यपदार्थ, मैदा, साखर, पॅकेज्ड फूड दिलेले नाही. उलट वेेगवेगळ्या उपक्रमांत सक्रिय ठेवले.
वजीर पिनॅकल-रोमांचक
अर्णवीने नुकतेच सर केलेले वजीर पिनॅकल हे समुद्रसपाटीपासून २५०० फूट उंचीवर वसलेले असून, त्यावरून आणखी २८० फूट उभी चढाई करावी लागते. ही शेवटची उभी चढाई अत्यंत रोमांचक असून, ती सह्याद्री पर्वतरांगेतील सर्वात आव्हानात्मक मोहिमांपैकी एक मानली जाते. असणगाव येथील महुली किल्ल्याच्या दक्षिण बाजूस असलेले हे शिखर आपल्या तलवारीसारख्या आकारामुळे आणि दुर्गप्रेमी तसेच ट्रेकर्समध्ये प्रसिद्ध आहे. या मार्गावर दोन्ही बाजूंना खोल दऱ्या असून, छोटीशी चूकही जीवघेणी ठरू शकते.
( शब्दांकन - प्राची पाटील )