लसीकरणासाठी दररोज लागतात २५ हजार डोस, तर मिळतात केवळ तीन हजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 07:34 PM2021-05-08T19:34:48+5:302021-05-08T19:36:03+5:30

Coronavirus in Chandrapur कोरोना संसर्गाविरुद्ध लढा देण्यासाठी लसीकरण हाच पर्याय असल्याचे नागरिकांना पटू लागल्याने केंद्रावर प्रचंड गर्दी होत आहे; परंतु चंद्रपूर जिल्ह्याला दररोज २५ हजार डोस लागत असताना केवळ तीन हजार मिळत आहेत.

Vaccination requires 25,000 doses per day, but gets only 3,000 | लसीकरणासाठी दररोज लागतात २५ हजार डोस, तर मिळतात केवळ तीन हजार

लसीकरणासाठी दररोज लागतात २५ हजार डोस, तर मिळतात केवळ तीन हजार

Next
ठळक मुद्देलस तुटवडा ३९ हजार २४० सहव्याधी नागरिकांना बूस्टर डोसची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क

चंद्रपूर : कोरोना संसर्गाविरुद्ध लढा देण्यासाठी लसीकरण हाच पर्याय असल्याचे नागरिकांना पटू लागल्याने केंद्रावर प्रचंड गर्दी होत आहे; परंतु जिल्ह्याला दररोज २५ हजार डोस लागत असताना केवळ तीन हजार मिळत आहेत. त्यामुळे नागरिकांना केंद्रातून परत जावे लागत आहे. विशेष म्हणजे ३९ हजार २४० सहव्याधी नागरिकांनी पहिला डोस घेऊनही त्यांना दुसरा डोस मिळणे कठीण झाले आहे.

कोरोना लसीकरणासाठी जिल्हा प्रशासनाने २०० पेक्षा जास्त केंद्रे तयार केली. लसीकरण सुरू असताना अचानक १८ वर्षांपुढील तरुणाईला लस देण्याची सरकारने घोषणा केली; पण जिल्ह्याला पुरेसा लससाठा उपलब्ध करून दिला जात नाही. त्यामुळे चंद्रपूर महानगरपालिका व जिल्ह्यातील ७० पेक्षा जास्त केंद्रे बंद ठेवावी लागत आहेत. दुसरा डोस घेणाऱ्या ४५ व ६० वर्षांवरील नागरिकांना तर शहरातील केंद्रांवर भटकंती करावी लागत असल्याचे चित्र आहे. आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाइन वर्कर्सनी पहिला डोस पूर्ण केला आहे. लस घेतल्याने कोरोना झाल्यानंतर प्रकृतीत समस्या निर्माण होत नाही, असे बऱ्याच रुग्णांच्या बाबतीत अनुभवास आले. त्यामुळे लस घेण्यासाठी केंद्रासमोर आता युवक- युवतीही गर्दी करीत आहेत.

१८ ते ४४ वयोगटात ९ हजार ५३८ जणांचे लसीकरण

चंद्रपूर शहर व जिल्ह्यातील केंद्रात आतापर्यंत १८ ते ४४ वयोगटातील ९ हजार ५३८ जणांचे लसीकरण झाले, तर अनेकांना आल्या पावली परत जावे लागत आहे. पुरेसे डोस मिळत नसल्याने केंद्रे बंद राहतात. प्रत्येक केंद्राला १०० ते ८० डोस मिळत आहेत. त्यामुळे ४५ व ६० वर्षांवरील नागरिकांना लस मिळणे कठीण झाले.

कूपन घेण्यासाठीही लागतात रांगा

आरोग्य विभागाकडून लस मिळाल्यानंतर सकाळी १० वाजता लसीकरणाला सुरुवात होते. नागरिकांनी गर्दी करू नये, यासाठी चंद्रपूर मनपाने कूपन पद्धत सुरू केली. केंद्रात जेवढे डोस आले तेवढेच कूपन आधी वितरित केले जातात. नागरिक पहिल्यांदा कूपनसाठी रांगा लावतात. बऱ्याचदा केंद्रात लस किती उपलब्ध आहे, हे आरोग्य पथकाकडून सांगितले जात नाही. त्यामुळे १०० लस उपलब्ध असताना २०० ते २५० नागरिक केवळ कूपनसाठी रांगेत लागतात. हा प्रकार टाळण्यासाठी आधी डोस किती आहेत, हे जाहीर करण्याची सूचना नागरिकांनी केली आहे.

ज्येष्ठ नागरिकांची निराशा

६० वर्षांवरील नागरिकांना लस घेण्यासाठी उपलब्ध डोसनुसार चंद्रपूर मनपा क्षेत्रात तीन किंवा चार केंद्रे सुरू असतात. त्यातही आता १८ ते ४४ गटासाठीच तीन केंद्रे सुरू आहेत; परंतु जास्त डोस मिळत नसल्याने ज्येष्ठ नागरिकांना निराश होऊ घरी परत जावे लागते.

लसीसाठी युवक- युवतींच्या केंद्रात चकरा

१ मेपासून १८ वर्षांवरील तरुणाईसाठी लसीकरण मोहीम सुरू झाली; पण एकाही केंद्रावर १०० पेक्षा जास्त डोस उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे युवक- युवतींचा हिरमोड होत आहे. ऑनलाइन नोंदणी करूनही लसीकरणासाठी चकरा माराव्या लागत आहेत.

नागरिक म्हणतात...

मी चार दिवसांपासून केंद्रात चकरा मारत आहे. लस कोणत्या केंद्रावर उपलब्ध आहे, याची माहिती मिळायला सकाळी ९ वाजतात. माहिती घेऊन संबंधित केंद्रावर गेल्यास आधीच कूपन घेण्यासाठी मोठी रांग दिसून येते. त्यामुळे मला पहिलाही डोस घेता आला नाही.

-प्रमोद देशमुख, बालाजी बार्ड, चंद्रपूर

रामनगर येथील प्राथमिक शाळेत लस घेण्यासाठी गेलो होते. कूपनसाठी २०० लोकांची रांग दिसून आली. कूपनसाठी दोन गेले. माझा नंबर येईपर्यंत कूपन संपले. त्यामुळे केंद्रातून परत जाण्याच्या सूचना आरोग्य कर्मचाऱ्याने दिल्या. हा प्रकार चार दिवसांपासून घडत आहे.

-सुमित्रा भोजने, रामनगर, चंद्रपूर

तुकूम येथील पंजाब सेवा समिती परिसरातील केंद्रात दररोज प्रचंड गर्दी असते. पहिला डोस घेण्यासाठी तीन दिवसांपासून केंद्रात जात आहे; पण मला लस मिळाली नाही. लससाठा पुरेसा नाही, अशी माहिती दिली जात आहे.

-शंकर मानापुरे, सुमित्रानगर, चंद्रपूर

Web Title: Vaccination requires 25,000 doses per day, but gets only 3,000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.