Start countdowndown | निकालाचे काऊंटडाऊन सुरू
निकालाचे काऊंटडाऊन सुरू

ठळक मुद्देकेवळ पाच दिवस शिल्लक : लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत उत्सुकता शिगेला

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा निवडणुकीसाठी ११ एप्रिल पहिल्याच टप्प्यात मतदान झाले. त्यानंतर रिंगणातील १३ उमेदवारांचे भवितव्य मशीनबंद करण्यात आले. तब्बल सव्वा महिना मतदारांचा कौल निवडणूक विभागाच्या स्ट्रांग रुममध्ये बंद आहे. आता २३ मे रोजी निकाल आहे. उमेदवारांसह मतदारांचीही उत्सुकता शिगेला पोहचली आहे. निकालाला केवळ पाच दिवस शिल्लक असून आता उलट काऊंटडाऊन सुरू झाले आहे.
२५ मार्चला सर्व उमेदवारांना निवडणूक चिन्ह दिल्यानंतर २६ मार्चपासून प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात झाली होती. १५ दिवसांच्या प्रचारानंतर ११ एप्रिलला मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. मतदानासाठी जिल्ह्यात २१९३ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. यातील ५२ केंद्र क्रिटीकल असल्याने त्याकडे भरारी पथक विशेष लक्ष ठेवून होते. या निवडणुकीकरिता एकूण २६१० कंट्रोल युनिट व २५९६ बॅलेट युनिट निवडणूक आयोगाकडून उपलब्ध करून देण्यात आले होते.
काही ठिकाणी इव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मतदानाची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. एक-दोन अपवाद वगळले तर सर्वत्र शांततेत मतदान पार पडले. मतदान झाल्यानंतर लोकसभा क्षेत्रातील सर्व मतदान केंद्रावरील इव्हीएम मशीन्स निवडणूक विभागाने स्ट्रांग रुममध्ये जमा केल्या आहेत. आता २३ मे रोजी निवडणुकीचा निकाल आहे. याला केवळ पाच दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे उमेदवारांच्या ह्दयाची धडधड वाढली आहे. निकालात कुणाच्या बाजुने कौल राहील, याचा अंदाज बांधला जात आहे. याशिवाय जसजसा निकालाचा दिवस जवळ येत आहे, तसा मतदारांचा उत्साहही शिगेला पोहचला आहे. ग्रामीण भागातही पारावर आपला नवा खासदार कोण असेल, यासोबतच देशात कुणाचे सरकार येईल, अशा गप्पाही रंगत आहेत.
या उमेदवारांच्या भाग्याचा फैसला
भाजपचे हंसराज अहीर, कॉग्रेसचे सुरेश धानोरकर, बहुजन समाज पार्टीचे सुशील वासनिक, बहुजन मुक्ती पार्टीचे डॉ.गौतम गणपत नगराळे, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे दशरथ पांडुरंग मडावी, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे नामदेव माणिकराव शेडमाके, आंबेडकराईट पार्टी आॅफ इंडियाचे नितेश आनंदराव डोंगरे, प्राऊटिस्ट ब्लॉक इंडियाचे मधुकर विठ्ठल निस्ताने, वंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड. राजेंद्र श्रीरामजी महाडोळे, अपक्ष उमेदवार अरविंद नानाजी राऊत, नामदेव केशव किनाके, मिलिंद प्रल्हाद दहिवले, राजेंद्र कृष्णराव हजारे या उमेदवारांच्या भाग्याचा फैसला २३ मे रोजी सायंकाळपर्यंत लोकांसमोर येणार आहे.
प्रत्येक विधानसभेसाठी १४ टेबल
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ असून प्रत्येक विधानसभा मतदारसंघ क्षेत्रासाठी नेमून दिलेल्या मतमोजणी हॉलमध्ये १४ टेबल राहणार आहे. प्रत्येक टेबलसाठी राजपत्रित दर्जाचे मतमोजणी पर्यवेक्षक व मतमोजणी सहाय्यक राहणार आहे. तसेच मतमोजणी सूक्ष्म निरीक्षणासाठी मतमोजणी प्रक्रियेची शुद्धता तपासण्याकरिता व मतमोजणीची नोंद घेऊन ते निवडणूक निरीक्षकाकडे सुपूर्द करण्यासाठी एक मतमोजणी सहाय्यक नियुक्त केला जाणार आहे. तसेच प्रत्येक हॉल करिता अतिरिक्त सूक्ष्म निरक्षक देण्यात येणार आहे. प्रत्येक फेरीतील किमान दोन कंट्रोल युनिटची रॅन्डम तपासणी आयोगाचे निरीक्षक चाचणी पद्धतीने करू शकतात. तसेच निकाल अचुक असल्याबाबत पर्यवेक्षकाने भरलेला नमुना १७ सी भाग २ च्या आकडेवारीशी तपासून अचूक असल्याची खात्री करतील. प्रत्येक फेरीचे निकालपत्र निवडणूक निर्णय अधिकारी सोबत तपासून समिक्षा करून घेतील. जेणेकरून पुढे कोणत्याही पुनर्मोजणीसाठी वाव राहणार नाही. या सर्व बाबींची वेळोवेळी पारदर्शकता ठेवण्यात येणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या मार्गदर्शक सूचना
निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार मतमोजणी प्रक्रिया सुरळीत व पारदर्शकपणे पार पडावी, यासाठी मतमोजणीकरिता नियुक्त अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आज शुक्रवारी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांच्या प्रमुख उपस्थितीत नियोजन भवनात घेण्यात आले. यावेळी जिल्ह्याचे उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी संपत खलाटे यांनी अधिकारी व कर्मचाºयांना मतमोजणी प्रक्रियेतील प्रत्येक घटकाचे सादरीकरण केले. सुरक्षा व्यवस्था, टपाली मतपत्रिकाची गणना, मतमोजणी व्यवस्था, व्हीव्हीपॅट मतमोजणी, मतमोजणी कक्ष संरचना, मतमोजणी कक्षात वावरताना घ्यावयाची काळजी, निवडणूक निकाल प्रसिद्धी अशा विविध विषयांचे मार्गदर्शन केले.
देशाच्या राजकारणाचीही चर्चा
२३ मे रोजी देशातील सर्वच लोकसभा क्षेत्रातील निवडणुकीचा निकाल लागणार आहे. भाजपाचे नरेंद्र मोदी व काँग्रेसचे राहुल गांधी हे पंतप्रधानांचे उमेदवार आहेत. त्यामुळे देशातील सर्व लोकसभा निवडणुकीच निकाल ऐकण्यास जिल्हावासीय उत्सुक आहेत. कोणता पक्ष सत्तेवर येणार, कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल की नाही, याविषयीच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
एमआयडीसी परिसरात उसळणार गर्दी
२३ मे रोजी येथील एमआयडीसी परिसरातील वखार महामंडळाच्या आवारात मतमोजणी होणार आहे. सहाही विधानसभा क्षेत्रातील मतमोजणी एकाचवेळी होणार आहे. निकाल ऐकण्यासाठी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते एमआयडीसी परिसरात उपस्थित राहणार आहेत. याशिवाय उत्सुक नागरिकही उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या परिसरात चांगलीच गर्दी उसण्याची शक्यता असल्याने तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
पुन्हा चर्चा रंगू लागल्या
प्रचारादरम्यान व मतदान झाल्यानंतर काही दिवस निवडणुकीत कोण विजयी होणार याविषयीच्या चर्चा जागोजागी ऐकायला मिळत होत्या. मात्र कालांतराने या चर्चा बंद झाल्या. नागरिक आपल्या कामात व शेतकरीवर्ग शेतकामात गुंतला. त्यामुळे काही दिवसासाठी राजकीय चर्चांना पूर्णविराम मिळाला होता. परंतु आता मतमोजणी पाच दिवसांवर येऊन ठेपली असताना परत एकदा चंद्रपूर-वणी-आर्णी व गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार याविषयीच्या चर्चांचे फड जागोजागी रंगू लागले आहेत.


Web Title: Start countdowndown
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.