चंद्रपूर जिल्ह्यातील रेंगाबोडी झाले टोमॅटो गाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 12:55 PM2020-02-19T12:55:58+5:302020-02-19T12:58:40+5:30

चिमूर तालुक्यातील रेंगाबोडी गावातील जवळपास दोनशे शेतकरी टोमॅटोचे उत्पादन घेत आहेत. त्यामुळे आता रेंगाबोडी टोमॅटो उत्पादकांचे गाव बनले आहे.

Rengabodi village in Chandrapur district has became tomato village | चंद्रपूर जिल्ह्यातील रेंगाबोडी झाले टोमॅटो गाव

चंद्रपूर जिल्ह्यातील रेंगाबोडी झाले टोमॅटो गाव

Next
ठळक मुद्देरोज दहा गाड्या टोमॅटो बाजारातदोनशे शेतकऱ्यांनी केली लागवड

राजकुमार चुनारकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : चिमूर तालुक्यातील रेंगाबोडी परिसरापासून वºहाड परिसर लागतो. त्यामुळे या गावात कापूस, सोयाबीन, गहू हे पीक घेतले जात होते. मात्र दोन-तीन वर्षांपासून काही निवडक शेतकऱ्यांनी टोमॅटो लागवडीचा नवा प्रयोग केला. तो यशस्वी झाला. त्यामुळे आजघडीला गावातील जवळपास दोनशे शेतकरी टोमॅटोचे उत्पादन घेत आहेत. त्यामुळे आता रेंगाबोडी टोमॅटोउत्पादकांचे गाव बनले आहे.
चिमूर तालुक्यातील खडसंगी हिंगणघाट मुख्य रस्त्यावर वसलेले रेंगाबोडी हे दोन हजार लोकवस्तीचे गाव आहे. गावात ९० टक्के शेतकरी आहेत. येथे एकेकाळी पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत होता. कारण गावात पाण्याचे स्रोत नाही. मात्र आता शिवारात पाण्याची सोय झाल्यामुळे येथील शेतकरी नेहमीच प्रयोगशील राहत आले आहेत. येथील काही शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसह टोमॅटोचे नगदी पीक घेण्याचे ठरवले व त्यामध्ये ते यशस्वी झाले.
रेंगाबोडी येथील बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्या वडिलोपार्जित शेतीपैकी एक एकर क्षेत्रात टोमॅटोची लागवड केली. टोमॅटोची रोप विकत घेणे, लागवडीपूर्व मशागत आणि लागवडी पश्चात खत फवारणी, आंतरमशागत, ठिंबक सिंचन, मल्चिंग असा एकूण सुमारे लाखापर्यत खर्च केला. पीक चांगले आले. खर्च एक लाख रुपयांपेक्षा जास्त झाला आहे, एक महिन्याअगोदर टोमॅटो बाजारात ५० ते ६० रुपये असा एका २५ किलोच्या क्रेटला भाव मिळत होता. त्यामुळे शेतकरी चिंतेत आले होते. मात्र सध्या २५ किलोच्या क्रेटला शंभर रुपयांच्या जवळपास भावाने विकले जात आहेत. यावर्षी टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना लागवड, मशागत खर्च जाता चांगलाच फायदा मिळत आहे.
रेंगाबोडीतील दोनशे शेतकऱ्यांनी टोमॅटो उत्पादन घेतले आहे. रोज गावातून दहा गाडया भरून टोमॅटो बाजारात विक्रीसाठी जात आहेत. आता रेंगाबोडी गाव टोमॅटो उत्पादकांचे गाव बनले आहे. हा प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी पे्ररणादायी आहे.

आठवडी बाजारात व शहरात विक्री
रेंगाबोडी येथील टोमॅटो दुर्गापूर, चंद्रपूर, मूल, चामोर्शी, भिवापूर, सिंदेवाही, वरोरा, भद्रावती, वणी आदी गावातील बाजारात विक्रीसाठी नेले जात आहेत. यासोबत चिमुरातही ते विक्रीसाठी असतात.

आजघडीला गावात दोनशेच्या जवळपास शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड केली आहे. मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी उत्पादन चांगले आले. सुरुवातीला भाव कमी होता. मात्र आता शंभर रुपयांच्या जवळपास २५ किलोचा ट्रे जात आहे. रोज दहा गाडया बाजारात विक्रीसाठी जात आहेत.
- पांडुरंग रामगुंडे,
टोमॅटो उत्पादक शेतकरी, रेंगाबोडी

Web Title: Rengabodi village in Chandrapur district has became tomato village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती