हमीभावापेक्षा कमी दराने कापसाची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 06:00 AM2020-01-13T06:00:00+5:302020-01-13T06:00:22+5:30

कधी ओला दुष्काळ तर कधी सुका. वारंवार होणाऱ्या नापिकीमुळे शेतकऱ्यांची अवस्था आणखी बिकट होत आहे. यावर्षी बऱ्यापैकी पाऊस पडेल, या आशेवर शेतकऱ्यांनी खरीप हंगामात मोठ्या उत्साहात कापसाची पेरणी केली. नगदी पीक म्हणून अनेक शेतकऱ्यांनी कापसाला पसंती दर्शविली. मात्र हंगामाच्या मध्येच पावसाने दगा दिला.

Purchase of cotton at a lower rate than guaranteed | हमीभावापेक्षा कमी दराने कापसाची खरेदी

हमीभावापेक्षा कमी दराने कापसाची खरेदी

Next
ठळक मुद्देअवकाळीचा परिणाम : आर्द्रता कमी असल्याची सबब

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शासनाने कापसासाठी हमीभाव जाहीर केला. पणन महासंघ व सीसीआयच्या माध्यमातून कापसाची खरेदीही जिल्ह्यात सुरू केली. मात्र मध्ये अवकाळी पाऊस झाल्याने कापूस पिकाची प्रतवारी थोडी खराब झाली. आता कापसाची आर्द्रता १२ टक्क्याहून अधिक असल्याचे कारण सांगून पणन महासंघ व खासगी व्यापारीदेखील कापसाला हमीभावापेक्षा अतिशय कमी दर देत आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अनेक शेतकऱ्यांनी दरवाढीच्या प्रतीक्षेत कापूस घरातच ठेवला आहे. आज ना उद्या कापसाचे भाव वाढेल या आशेवर शेतकरी आहेत.
मागील दोन वर्षांपासून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. कधी ओला दुष्काळ तर कधी सुका. वारंवार होणाऱ्या नापिकीमुळे शेतकऱ्यांची अवस्था आणखी बिकट होत आहे. यावर्षी बऱ्यापैकी पाऊस पडेल, या आशेवर शेतकऱ्यांनी खरीप हंगामात मोठ्या उत्साहात कापसाची पेरणी केली. नगदी पीक म्हणून अनेक शेतकऱ्यांनी कापसाला पसंती दर्शविली. मात्र हंगामाच्या मध्येच पावसाने दगा दिला. त्यामुळे उत्पादनावर विपरित परिणाम झाला. तरीही अनेक शेतकऱ्यांनी कसेबसे पीक वाचविले. आता कापसाच्या वेचण्या होऊन कापूस शेतकºयांच्या हाती येत असताना अवकाळी पावसाने व ढगाळ वातावरणाने शेतकऱ्यांचे नुकसान केले. यंदा कापसाला सहा हजार रूपयांहून अधिक दर मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. कापसाच्या उत्पादनात घट झाल्याने यावर्षी वाढलेले दर शेतकऱ्यांना तारणार असे वाटत होते. मात्र तसे झाले नाही. शासनाने कापसाला ५५५० रुपये हमीभाव जाहीर केला. राजुरा, कोरपना, जिवती, वरोरा तालुक्यात नगदी पीक म्हणून कापसाचे उत्पादन घेतले जाते. कापसावरच शेतकऱ्यांचा वर्षभराचा आर्थिक बजेट अवलंबून असतो. कापूस पीक हातात येत असताना अचानक जिल्ह्यात अवकाळी पाऊस बरसला. तीन-चार वेळा अवकाळी पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले. त्यामुळे कापसाची प्रतवारी खराब झाली. पणन महासंघ कापूस खरेदी करताना कापसाची आर्द्रता तपासते. १२ टक्क्यापेक्षा अधिक आर्द्रता असेल तर कापसाची प्रतवारी खराब असल्याचे समजले जाते. आता शेतकरी कापूस घेऊन शासकीय खरेदी केंद्रावर जात आहेत. मात्र आर्द्रता अधिक असल्याचे सांगून या केंद्रावर हमीभावापेक्षा कमी दर देऊन शेतकऱ्यांची बोळवण केली जात आहे. कापसाचे दर अचानक खाली आल्याने शेतकरी निराश झाला आहे. एक तर यंदा कापसाचे जादा उत्पादन नाही आणि कापसाचे भाव कोसळल्याने शेतकºयांना मोठा फटका बसला आहे.

दरवाढीच्या प्रतीक्षेत कापूस घरातच
कापूस दरवाढ आज ना उद्या होईल, या प्रतीक्षेत शेतकऱ्यांनी कापूस घरी भरून ठेवला आहे. जेव्हा कापसाला हमीभाव जाहीर केला, तेव्हा अनेक शेतकऱ्यांचा कापूस निघाला नव्हता. मात्र कापूस निघताच अवकाळी पाऊस येऊन कापसाची आर्द्रता वाढली. त्यामुळे कापसाचे दर पाडल्याने कवडीमोल दरात कापूस विकणे शेतकऱ्यांना परवडण्यासारखे नाही. कापसाला ५ हजाराहूनही कमी दर शासकीय केंद्रातून मिळत आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कापूस सध्या दरवाढीच्या प्रतीक्षेत घरीच ठेवला आहे.
खासगी व्यापाऱ्यांकडून लूट
वर्षभराचे संबंध असल्याने व अडीअडचणीत खासगी व्यापारी मदत करीत असल्याने अनेक शेतकरी पणन महासंघाकडे कापूस न विकता खासगी व्यापाऱ्यांकडे जातात. मात्र आता खासगी व्यापारीदेखील कापसाची आर्द्रता अधिक असल्याचे सांगून शेतकऱ्यांनी लूट करीत आहेत. कापसाला प्रति क्विंटल केवळ ४८०० ते ५००० रुपये प्रमाणे दर दिला जात आहे.

Web Title: Purchase of cotton at a lower rate than guaranteed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :cottonकापूस