विकास निधीत पक्षपाताचा आरोप विरोधी नगरसेवकांचा गदारोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 05:00 AM2019-12-31T05:00:00+5:302019-12-31T05:00:17+5:30

महापौर राखी कंचर्लावार यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी १ वाजता मनपाच्या हिराई सभागृहात सर्वसाधारण सभेला सुरूवात झाली. यावेळी उपमहापौर तथा स्थायी समितीचे सभापती राहुल पावडे, उपायुक्त गजानन बोकडे, नगरसचिव के. एस. नेहारे व विषय समित्यांचे सर्व सभापती, आयुक्त संजय काकडे व विभाग प्रमुख उपस्थित होते.

Opposition councilors accused of bias in development funds | विकास निधीत पक्षपाताचा आरोप विरोधी नगरसेवकांचा गदारोळ

विकास निधीत पक्षपाताचा आरोप विरोधी नगरसेवकांचा गदारोळ

Next
ठळक मुद्देमनपाची सर्वसाधारण सभा : विकासात संतुलन ठेवण्याची महापौरांची ग्वाही

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शहरातील विविध प्रभागात विकासकामांवरून दुजाभाव केल्याच्या आरोप- प्रत्यारोपावरून महानगर पालिकेच्या सभागृहात सोमवारी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत गदारोळ मोठा झाला. दरम्यान महापौर राखी कंचर्लावार यांनी सर्व प्रभागांच्या विकासकामांसाठी मुबलक निधी देऊन संतुलन ठेवण्याचे आश्वासन दिल्याने विरोधी पक्षातील नगरसेवक शांत झाले.
महापौर राखी कंचर्लावार यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी १ वाजता मनपाच्या हिराई सभागृहात सर्वसाधारण सभेला सुरूवात झाली. यावेळी उपमहापौर तथा स्थायी समितीचे सभापती राहुल पावडे, उपायुक्त गजानन बोकडे, नगरसचिव के. एस. नेहारे व विषय समित्यांचे सर्व सभापती, आयुक्त संजय काकडे व विभाग प्रमुख उपस्थित होते. महिला व बालकल्याण समितीचे कार्यवृत्त माहितीकरिता सादर करणे, ८ नोव्हेंबर २०१९ रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेचे कार्यवृत्त वाचून पक्के करणे, दिव्यांगांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या ५ टक्के निधीचा विनियोग, मनपा क्षेत्रातील मुला- मुलींच्या गुणोत्तर प्रमाणाबाबतचा अहवाल सादर करणे, आदी विषय सभापटलावर ठेवण्यात आले होते.
नगरसेवक दीपक जयस्वाल यांनी तुकूम प्रभागात सुरू असलेल्या विविध कामांमध्ये अनियमितता असून ही कामे करताना पक्षपात केल्या जात असल्याचा आरोप केला. त्यांच्या या आरोपाला सत्ताधारी नगरसेवकांनी प्रत्युत्तर दिले. सदर प्रभागातील विकास कामांबाबत केलेला आरोप चुकीचा असल्याचा दावा सभागृहात करण्यात आला. नगरसेवक अनिल रामटेके यांनी बाबुपेठ परिसरात निधी मिळत नसल्याने विकासकामे ठप्प असल्याने सभागृहाचे लक्ष वेधले. विकासकामे रखडल्याने जनता नाराज असल्याचेही ते म्हणाले. नगरसेवक सुनिता लोढिया यांनी वडगाव परिसरातील अवैध बांधकाम आणि कृषक जागेवर बेकायदेशीर इमारत बांधकाम सुरू असल्याचा मुद्दा मांडला. त्यामुळे हे भूखंड विक्रीसाठी मनपाने प्रतिबंध घालावे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या कामांचे निरीक्षण करून त्यातील त्रुटी दूर करण्याची मागणी केली.
नगरसेवक पप्पू देशमुख यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले. तुकूम प्रभागामध्ये मंगल कार्यालय पाडण्यात आले. यातील काही कार्यालयांना अभय दिल्याचा आरोप सभागृहात विरोधी सदस्यांनी केला. लॉन आणि मंगल कार्यालयावर मनपाने कारवाई करताना दुजाभाव करू नये, अशी मागणी सदस्यांनी केली.
यावेळी शहरातील सर्व प्रभागाच्या विकासासाठी विविध कल्याणकारी कामांवर चर्चा करून ठराव पारित करण्यात आल्याची माहिती मनपाने दिली. माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज्य, माजी अर्थमंत्री अरूण जेटली, माजी आमदार स्व. प्रभाकर मामुलकर यांना सभागृहाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

दिव्यांग टक्केवारीनुसार अर्थसहाय्य
शहरातील दिव्यांगांच्या आर्थिक विकासासाठी यापुढे सरसकट अर्थसहाय्य न देता दिव्यांगाच्या टक्केवारीनुसार रक्कम देण्याचा निर्णय मनपाने घेतला. त्यानुसार ४०-६० टक्क्यांसाठी १० हजार, ६१-८० टक्क्यांसाठी १५ हजार आणि ८१-१०० टक्के दिव्यांग असल्यास २० हजारांचे अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. जे दिव्यांग कायमस्वरूपी अंथरूनाला खिळून आहेत त्यांना दरमहा १ हजार रूपये पेन्शन देण्याचा विषय सभेत मांडण्यात आला. पण त्यावर निर्णय झाला नाही.

पाणी पुरवठ्याची क्षमता तपासणार
शहरातील नागरिकांना पाणी पुरवठा करणाऱ्या मे. उज्वल कंन्सट्रक्यन कंपनीचे कंत्राट रद्द करण्यात आले. नवीन कंत्राट अद्याप कुणालाही देण्यात आले नाही. मनपाकडून शहराला होत असलेल्या पाणी पुरवठ्याची क्षमता तपासण्यात येणार असून त्यानंतरच नवीन कंत्राट देण्याबाबतच्या ३१ जुलै २०१९ च्या ठरावाचे सोमवारच्या सभेतही वाचन करण्यात आले. त्यामुळे नवीन कंत्राट देण्याचा प्रश्न सद्यस्थितीत जैसे थे ठेवण्यात आला आहे.

Web Title: Opposition councilors accused of bias in development funds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.