मनपा, वेकोलिसह १४ उद्योगांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2020 06:00 AM2020-03-06T06:00:00+5:302020-03-06T06:00:24+5:30

काही उद्योगांवर दंडात्मक कारवाईदेखील करण्यात आली आहे. मात्र सदर उद्योगांकडून प्रदूषण कमी करण्यासाठी आखून दिलेल्या नियमाचे पालन केले जात नाही. त्यामुळे प्रदूषण कमी होण्याऐवजी आणखी वाढत आहे. घुग्घुस परिसरात तर कोळशाची धूळ नागरिकांसाठी सर्वाधिक धोकादायक ठरू लागली आहे.

Notice to fourteen industries, including Municipal Corporation, WCL | मनपा, वेकोलिसह १४ उद्योगांना नोटीस

मनपा, वेकोलिसह १४ उद्योगांना नोटीस

googlenewsNext
ठळक मुद्देप्रदूषण नियंत्रण मंडळ गंभीर : हिरवळीचा परिसर ४० टक्क्यांपर्यंत आणा

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर शहराला लागून असलेल्या व सर्वाधिक प्रदूषण करणाऱ्या उद्योगांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रत्येकी एक कोटी रुपयांचा ‘पर्यावरण भरपाई’चा शॉक दिला होता. हा धक्का सहन करतानाच आता प्रदूषण नियंत्रण मंडळाने उद्योगांना नवा धक्का दिला आहे. वेकोलिच्या पाच खाणी, सहा उद्योग, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय राज्य मार्ग प्राधिकरण व चंद्रपूर महापालिका, अशा १४ जणांना नोटीस बजावून प्रदूषणावर नियंत्रण आणून हिरवळीचा परिसर ४० टक्क्यांवर आणण्याचे निर्देश दिले आहे.
४ मार्च रोजी जारी केलेल्या या नोटीसमध्ये आपापल्या परिसरात व मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करावे व पीपीएमची मात्रा ५० प्रति मायक्रोग्रॅम क्युबिक मीटरपर्यंत आणण्यासाठी तात्काळ पाऊल उचलण्याचे निर्देश दिले आहेत.
चंद्रपूर प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारा यावेळी ज्या उद्योगांना ही नोटीस जारी केली आहे त्यात चंद्रपूर महाऔष्णीक वीज केंद्र, धारिवाला इन्फ्रास्ट्रक्चर लि., ग्रेस मेटॅलिक प्रा. लि., घुग्घुस येथील लॉयड मेटल्स, एसीसी सिमेंट, बल्लारपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी, चंद्रपूर महापालिकेचे आयुक्त, राष्ट्रीय राज मार्ग प्राधिकरणाचे अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्यासह वेकोलि चंद्रपूरची लालपेठ, दुर्गापूर, पदमापूर ओपनकास्ट, वणी क्षेत्रातील घुग्घुस ओपनकास्ट व बल्लारपूर क्षेत्रातील बल्लारपूर ओपनकास्ट या कोळसा खाणींचा समावेश आहे.
उपरोक्त उद्योगांना यापूर्वीही अनेकदा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारे नोटीस बजावण्यात आला आहे. काही उद्योगांवर दंडात्मक कारवाईदेखील करण्यात आली आहे. मात्र सदर उद्योगांकडून प्रदूषण कमी करण्यासाठी आखून दिलेल्या नियमाचे पालन केले जात नाही.
त्यामुळे प्रदूषण कमी होण्याऐवजी आणखी वाढत आहे. घुग्घुस परिसरात तर कोळशाची धूळ नागरिकांसाठी सर्वाधिक धोकादायक ठरू लागली आहे.
नियमानुसार या उद्योगाकडून व स्थानिक स्वराज्य संस्थांकडून प्रदूषणाच्या मानकाचे पालन केले तर चंद्रपुरातील पूर्ण नाही तर किमान अर्धे प्रदूषण कमी होणे शक्य आहे, असे या नोटीसमध्ये नमूद आहे. यावरील कार्यवाहीकडे लक्ष लागले आहेत.

मानकाच्या आसपासही पोहचले नाही उद्योग
प्रदूषण कमी करणाऱ्या नियमाची चंद्रपूरलगतच्या उद्योगांकडून अंमलबजावणी केली जात नाही. त्यामुळे प्रदूषणासंदर्भातील मानकापर्यंत कोणताही उद्योग अद्याप पोहचू शकला नाही. त्यामुळे नागरिकांना अद्यापही शुध्द हवा मिळत नाही. प्रादेशिक अधिकारी मधुकर लाड यांनी सांगितले की कोळसा खाणीसाठी असलेल्या मानकानुसार एसपीएमची मात्रा ५०० तथा आरएसपीएमची मात्रा २५० प्रति मायक्रोग्रॅम क्युबिक मीटर आहे. स्पंज आयरन उद्योगासाठी ही मात्रा २००० प्रति मायक्रोग्रॅम क्युबिक मीटर आहे. मात्र प्रत्यक्षात उद्योग हा मानकाच्या जवळपासही पोहचू शकले नाही.

प्रदूषण कमी करण्यासाठी उद्योगांना नियमाचे पालन करावे लागणार आहे. सध्या हिरवळीचा परिसर ३३ टक्के आहे. तो वाढवून ४० टक्क्यांपर्यंत आणावा लागणार आहे. पीपीएमची मात्रा ५० प्रति मायक्रोग्रॅम क्युबिक मीटरपर्यंत आणण्याचे लक्ष आहे. त्यामुळे ही नोटीस बजावण्यात आली आहे.
- मधुकर लाड, प्रादेशिक अधिकारी,
महाराष्टÑ प्रदूषण नियंत्रण मंडळ, चंद्रपूर.

Web Title: Notice to fourteen industries, including Municipal Corporation, WCL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.