Maharashtra Election 2019 ; Elections fought to win the hearts of the people | Maharashtra Election 2019 ; जनतेची मने जिंकण्यासाठी लढली निवडणूक

Maharashtra Election 2019 ; जनतेची मने जिंकण्यासाठी लढली निवडणूक

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार यांची विशेष मुलाखत : चंद्रपूर मॉडेल जिल्हा करणे हेच एकमेव ध्येय, त्यासाठीच पायाभूत सुविधांवर भर

राजेश भोजेकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : विधानसभा निवडणुकीत मतदार राजाने कुणाला कौल दिला हे गुरुवारी स्पष्ट होणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यात झालेल्या विकासकामांकडेही बोटे दाखविली गेली. अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. या विकासकामांमागील नेमकी भावना काय आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांची निवडणूक निकालाच्या पूर्वसंध्येला घेतलेली विशेष मुलाखत. यावेळी मुनगंटीवार यांनी सडेतोड उत्तरे देतानाच मी जिंकण्यासाठी निवडणूक लढत नाही तर जनतेची मने जिंकणे हा माझा हेतू आहे, असेही ते म्हणाले.
ही निवडणूक कठीण गेली असे वाटते काय?
सुधीर मुनगंटीवार :
माझ्यासाठी आमदार हे पद राजमुकुट नाही. जनतेने जनतेची सेवा करण्यासाठी दिलेला हा काटेरी मुकुट आहे. विजय झाल्याने जनसेवेचा अधिकार येतो. या निवडणुकीमध्ये मी निश्चिंत होतो. मला विजय, पराभवाची चिंता नव्हती. विजय झाला तर जनतेचा हा मतरुपी प्रसाद आनंदाने स्वीकारायचा आणि ईश्वराचा अंश असणाऱ्या जनतेची सेवा करायची. आणि विजय झाला नाही दुर्दैवाने तर ते माझे दुर्दैव असू शकत नाही. ते दुर्दैव विकासाच्या बाबतीत मतदार संघाचे असते. मी जीव तोडून काम केले आहे. मी विकाससुद्धा जीव लावून केला आहे. निवडणुकीमध्ये जनतेचा निर्णय हाच सर्वतोपरी असतो. निवडणुकीमध्ये विजय पराभव असे मुल्यमापन करत नाही. तर त्या जनतेला काय हवं, याचं मुल्यांकन करीत असतो.
चंद्रपूर मतदार संघाकडे आपण कसे पाहता?
सुधीर मुनगंटीवार : चंद्रपूर मतदार संघामध्ये नानाभाऊंसाठी सर्वच कार्यकर्त्यांनी मनापासून प्रयत्न केले. महायुतीचा आमदार निवडून यावा. निश्चितपणे हे स्वप्न आहे. शेवटी एखादे विकासाचे काम करायचे असेल तर त्याचा पाठपुरावा करण्यासाठी हक्काचा व्यक्ती लागतो. दुसºया पार्टीचा आमदार असताना त्या मतदार संघामध्ये आपण काम करू शकत नाही. तिथं असणारा तो स्थानिक आमदार विरोधी पक्षाचा असेल, तर आपल्याला सकारात्मक उत्तर देऊ शकत नाही. आपल्या पक्षाचा असेल तर सदैव पक्षाच्या बैठकीत असतो. विकासाच्या बैठकीत असतो. आपण सांगितलेल्या कामाचा तो पाठपुरावा करतो. आपण सांगितलेल्या कामाच्या संदर्भात बैठका आयोजित करतो. सातत्याने संपर्कात असलेली व्यक्ती असल्यास त्या मतदार संघाचा पाठपुरावा करणे सोपे आहे. आपल्याला चंद्रपूर विधानसभेत अपेक्षा आहे. बघू पुढे काय होते.
प्रश्न : लोकसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात नकारार्थी वातावरण जिल्ह्यात होते. आपणाला काय वाटते?
सुधीर मुनगंटीवार :
माझ्या मतदार संघामध्ये जनतेचा प्रतिसाद पाहतो. लहानमुलांचा प्रतिसाद पाहतो. मी अजयपूर गावात गेलो. शंभर दीडशे लहानमुले नारे देत होते ‘एक रुपये का च्युईनगम सुधीरभाऊ सिंगम’. दूर्गापूरमध्ये तरुण नारे देत होते की ‘वाघ आला वाघ आला ताडोब्याचा वाघ आला’. काय नारे दिले हे महत्त्वाचे नाही. भावना महत्त्वाची आहे. प्रेमाची भावना आहे.
विकासामध्ये काहीतरी करू शकतो. पराक्रम करू शकतो. ख्रिस्ती समाजाच्या शेकडो महिलांनी प्रभू येशूपाशी प्रार्थना केली की भाऊ निवडून आले पाहिजेत. त्यांच्या हातून चांगली कामे झाली पाहिजेत. माझ्या दृष्टीने आज ‘मै चुनाव जितने के लिए नही लढ रहा हू. मै जनता का दिल जितना चाहता हू ये मेरा लक्ष्य है.’मुस्लिम बहिणींनी सुधीरभाऊ आगे बढोचा नारा दिला. मला असे वाटते की विकासकामे केली म्हणून असा लोकप्रतिसाद आहे. लोकसभेमध्ये जी काही नकारार्थी भावना होती ती तत्कालीन होती. आणि ती भावना चंद्रपूर जिल्ह्यात मला दिसत नाही. उद्याच्या निकालानंतर त्यात स्पष्टता येईल.
प्रश्न : चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाली नाही तर ती महाग झाली असा आरोप होतोय.
सुधीर मुनगंटीवार :
दारूबंदी ही घटनेमध्ये, संविधानामध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बघितलेलं स्वप्नं आहे. महात्मा गांधींनीही हे स्वप्न बघितले. या देशामध्ये कोणीही महामानव असेल. तथागत गौतम बुद्धांपासून प्रत्येकांनी म्हटले की आपण यापासून दूर राहिले पाहिजे. ही मागणी माझी नव्हती. ५८८ गावांचे ठराव होते. पाच हजारांपेक्षा जास्त महिला टी पार्इंट नागपूरमध्ये मोर्चा घेऊन गेल्या. हा मोर्चा स्पष्टपणे चंद्रपूर जिल्ह्यामधील व्यसनाधिनता संपावी. माझ्या कुटुंबामध्ये होणारी वाताहात संपावी, यासाठी होता. आता हे खरे आहे की शेवटी कोणताही कायदा केला तर त्याचा परिणाम व्हायला काही वर्ष लागतात. मुंबईमध्ये रेव्हपार्ट्या होत नाही, असा दावा कोणी करत नाही.पहिल्यांदा मुलींच्या शिक्षणाच्या संदर्भामध्ये समाज उदासीन होता. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी भिडेवाड्यामध्ये पहिली शाळा सुरू केली. त्याचे परिणाम अनेक वर्षानंतर झाले. ज्यांना दारू प्यायची सवयच लागली, त्यांना काहीअंशी त्रास होणार आहे. पण या पिढीपासून नवीन व्यसनमुक्त पिढीपर्यंत जायला काही वर्ष लागतील. एक नेता पकडल्या गेला. तो पत्रकार परिषदेत सांगायचा की दारूबंदी करू नये. आणि तोच अवैध दारू विकणारा निघाला. दारूबंदीच्याविरोधात एक लॉबी काम करते. ती दारू अवैधपणे विकणाऱ्यांची किंवा ज्यांची दुकाने बंद झाली त्यांची. त्यांच्यााशिवाय कोणीही याबद्दल काही म्हणत नाही. दारूबंदीचा कायदा बदलला आहे. भविष्यात या संदर्भात निश्चितपणे जिल्ह्यातील जनता धन्यवाद देईन.

Web Title: Maharashtra Election 2019 ; Elections fought to win the hearts of the people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.