अल्ट्राटेक उत्पादनातच खुश, जनतेशी मात्र जीवघेणा खेळ; आवश्यक सुरक्षेकडे कंपनीचा कानाडोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2022 03:47 PM2022-05-06T15:47:33+5:302022-05-06T15:59:52+5:30

याचा थेट परिणाम शहरातील दळणवळणावर होत आहे. त्यामुळे रस्ते खराब होतच आहेत. शिवाय प्रदूषण आणि अपघात होत आहेत ते वेगळेच.

Limestone transport by truck from Manikgad to Ultratech, roads are getting worse and leads to pollution and accidents | अल्ट्राटेक उत्पादनातच खुश, जनतेशी मात्र जीवघेणा खेळ; आवश्यक सुरक्षेकडे कंपनीचा कानाडोळा

अल्ट्राटेक उत्पादनातच खुश, जनतेशी मात्र जीवघेणा खेळ; आवश्यक सुरक्षेकडे कंपनीचा कानाडोळा

Next
ठळक मुद्दे कन्वेअर बेल्टमधून पडणाऱ्या लाइमस्टोनने अंमलनाला प्रकल्पही प्रभावित

राजेश भाेजेकर/आशिष देरकर

गडचांदूर (चंद्रपूर) : माणिकगड सिमेंट उद्योगाला सिमेंटचे उत्पादन घेण्यासाठी आवश्यक असलेला कच्चा माल म्हणजे लाइमस्टोन सुमारे १२ किलोमीटर अंतरावरील कुसुंबी येथून कन्वेअर बेल्ट आणि रोप-वेच्या माध्यमातून कंपनीत आणला जातो. हे आणताना करावयाच्या आवश्यक सुरक्षेकडे मात्र कंपनीने कानाडोळा केल्याचे दिसून आले. शिवाय हा कन्वेअर बेल्ट चक्क अंमलनाला प्रकल्पातून गेला आहे. या मार्गे जाणारा लाइमस्टोन मोठ्या प्रमाणावर प्रकल्पाच्या पाण्यात पडत असून पाणी साठवणूक क्षमतेवर प्रभाव पडतो आहे.

कंपनीपासून जिवती मार्ग जातो. या मार्गावर कंपनीच्या मागील बाजूला अंमलनाला धरण आहे. जिवती मार्ग आणि अंमलनाला धरणावरून कंपनीचा लाइमस्टोन आणणारा कन्वेअर बेल्ट व रोप-वे आहे. कन्वेअर बेल्ट व रोप-वेच्या खालून राजुरा, कोरपना व जिवती तालुक्यातील गावांना जोडणारा रस्ता आहे. या रस्त्याने परिसरातील नागरिकांसह अन्य तालुक्यातून अंमलनाला धरणावर व माणिकगड किल्ल्यावर पर्यटनासाठी मंडळी ये-जा करतात. खाणीतून कन्वेअर बेल्टने येणारा लाइमस्टोन ठिकठिकाणी खाली पडत असल्याचे ढिगाऱ्यांवरून लक्षात येते. रस्त्यावरही हे लाइमस्टोन पडतात. यामुळे अपघात झाले नाहीत हा मुद्दा गौण असला, तरी अपघात झाल्यावरच सुरक्षा करायची का, असा प्रश्न येथून जाताना पडतो.

समाधीही लाइमस्टोनने बुजली

कन्वेअर बेल्टच्या खालच्या बाजूला महादेव मल्लाजी सुद्धाले यांची समाधी आहे. या समाधीवर हे लाइमस्टोन पडत असतात. यामुळे ही समाधी अर्धवट बुजली आहे. याकडे काही दिवस लक्ष दिले नाही तर या समाधीलाच लाइमस्टोन समाधिस्त करेल, असेच चित्र आहे.

ट्रकद्वारे लाइमस्टोनची वाहतूक

अल्ट्राटेक कंपनीच्या माणिकगड युनिटसाठी कन्वेअर बेल्ट व रोप-वेच्या माध्यमातून आणल्या जाणाऱ्या लाइमस्टोनची माणिकगडमधून ट्रकद्वारे अल्ट्राटेक आवारपूर कंपनीत वाहतूक केली जाते. दररोज सुमारे ५०० टन लाइमस्टोन नेला जातो. याचा थेट परिणाम शहरातील दळणवळणावर होत आहे. त्यामुळे रस्ते खराब होतच आहेत. शिवाय प्रदूषण आणि अपघात होत आहेत ते वेगळेच.

सात दिवसांचा अल्टिमेटम संपला

प्रदूषणाच्या मुद्द्यावरून गडचांदूर येथील कृती समितीने मागणी केल्याने अल्ट्राटेक कंपनीच्या माणिकगड युनिटला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटीस देऊन सात दिवसांचा अल्टिमेटम दिला. हा कालावधी आता संपलेला आहे. तरीही ही कंपनी प्रदूषण करतच आहे. यानंंतरही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून हालचाली होत असल्याचे दिसत नाही.

Web Title: Limestone transport by truck from Manikgad to Ultratech, roads are getting worse and leads to pollution and accidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.