जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ‘टोळधाड’ची धास्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2020 05:00 AM2020-06-04T05:00:00+5:302020-06-04T05:00:58+5:30

टोळ कीटक हा नाकतोड्याचा एक प्रकार आहे. याचा संधिपाद गटातील कीटक वर्गाच्या ऑथाप्टेरा गणात (कुल-अ‍ॅक्रिडिटी) समावेश होतो. याच्या तीन प्रजाती आहेत. त्यापैकी डेझर्ट लोकस्ट ही अत्यंत खादाड व नुकसानकारक प्रजात आहे. अनुकूल हवामानात टोळांची संख्या खुपच वाढते; त्यांचे थवे तयार होतात; ते इतरत्र थव्याने संचार करू लागतात. त्या स्थितीस थव्याची स्थिती म्हणतात.

Farmers in the district are scared of locusts | जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ‘टोळधाड’ची धास्ती

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ‘टोळधाड’ची धास्ती

Next
ठळक मुद्देआमडी (बेगडे) येथे टोळधाडचे आक्रमक : कृषी विभागाचे अधिकारी दाखल

राजकुमार चुनारकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : कोरोनाच्या संकटाने अगोदरच शेतकरी संकटात आहे. अशातच आता टोळधाडचे नवे संकट आले आहे. जिल्ह्यात टोळधाडचे संकट येण्याची भीती व्यक्त होत असतानाच चिमूर तालुक्यातील तथा वर्धा जिल्हा सीमेवर असलेल्या आमडी (बेगडे) गावातील शेत शिवारात टोळधाडचे आक्रमण झाले. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये हंगामाआधीच भीतीचे वातावरण पसरले आहे.
सोयाबीनवरील पाने खाणारी लष्करी अळी, तंबाखूवरील पाने खाणारी अळी, हरभऱ्यांवरील घाटे अळी, कपाशीवरील बोंडअळी अशा विविध किडीचा पिकांवर सतत हल्ला होत असतो. कोरोनामुळे शेती आणि शेतकरी आर्थिक संकटात असताना आता वाळवंटी टोळ (डेझर्ट लोकस्ट) या किडीची भर पडली आहे.
सध्या ही टोळधाड हरियाना, राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात या चार राज्यात पसरलेली असून भाजीपाला, कापूस व कडधान्य पिकांचे खूप नुकसान करीत आहे. आता ती महाराष्ट्रातही प्रवेश केला आहे. मागील अनेक वर्षातील ही सर्वात भयंकर टोळधाड असावी, असा अंदाज वनस्पती रोगशास्त्रज्ञ व्यक्त करीत आहेत.
टोळ कीटक हा नाकतोड्याचा एक प्रकार आहे. याचा संधिपाद गटातील कीटक वर्गाच्या ऑथाप्टेरा गणात (कुल-अ‍ॅक्रिडिटी) समावेश होतो. याच्या तीन प्रजाती आहेत. त्यापैकी डेझर्ट लोकस्ट ही अत्यंत खादाड व नुकसानकारक प्रजात आहे. अनुकूल हवामानात टोळांची संख्या खुपच वाढते; त्यांचे थवे तयार होतात; ते इतरत्र थव्याने संचार करू लागतात. त्या स्थितीस थव्याची स्थिती म्हणतात. टोळांच्या थव्याची अथवा सांघिक स्थितीमधील संचाराला टोळधाड असे म्हणतात. एका दिवसात १५० किलोमीटरपर्यंत अंतर कापण्याची या किडिची क्षमता आहे. त्यामुळे शेतकºयांनी कृषी विभागाच्या सुचनांचे पालण करुन आपल्या पिकांचे संरक्षण करणे गरजेचे आहे.

नियंत्रणासाठी उपाययोजना
टोळ तरूण अवस्थेत उडू शकत नसल्याने पुढे सरकत येणाºया समुहाच्या वाटेत दोन ते तीन फूट खोल चर काढावी. शेतात मोठा आवाज होईल असे कोणतेही उपाय जसे थाळी, ढोल वाजवून हुसकावून लावता येते. रात्रीच्यावेळी शेतात झाडाझुडपांजवळ शेकोटी करून धूर करणे. तसेच केंद्रीय कीटकनाशके बोर्ड यांच्या शिफारशीनुसार कीटकनाशकांची फवारणी करणे.

टोळधाडचा जीवनक्रम
अंडी, पिल्ले (बाल्यावस्था) व पूर्ण वाढ झालेला प्रौढ अशा तीन अवस्था या किडित आढळतात. किडीची मादी ओलसर रेताड जमिनीत ५० ते १०० अंडी पुंजक्याने घालते. जमिनीतील ओलावा व हवेतील उष्णतामान यावर अंड्यांच्या अवस्थेचा कालावधी अवलंबून असतो. साधारणत: दोन ते चार आठवड्यांनी अंडी फुटून बिनपंखांची पिल्ले बाहेर पडतात. किडीची बाल्यावस्था चार ते सहा आठवडे राहते. या कालावधीत तीन ते पाच दिवसांच्या अंतराने पिल्ले पाचवेळा कात टाकतात व त्यांना पंख फुटतात. कडधान्ये, भाजीपाला, फळपिकांचे नुकसान करतात.

शेतकऱ्यांनी घाबरु नये
चिमूर तालुक्यातील आमडी येथील शेतकरी शालिक विटाळे, रत्नाकर विटाळे, राजू पाटील झाडे, विजय नामदेव शेंडे, अनंता गलांडे, मोहन झाडे, अमृत गाठे, राजू झिकार, नंदकिशोर चदनखेडे यांच्या शेतात टोळधाडने आक्रमण केले. याबाबत कृषी विभागाला माहिती मिळताच कृषी विज्ञान केंद्र सिंंदेवाहीचे वरिष्ठ कीटक शास्त्रज्ञ डॉ. राठोड, डॉ विनोद नागदेवते, तसेच उपविभागीय कृषी अधिकारी सिंदेवाही, वरोरा यांनी प्रत्यक्ष नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात पाहणी केली असता टोलधाडीचे अल्प प्रमाण असून ही टोळधाड भटकून आली. शेतकऱ्यांनी घाबरू नये, असे आवाहन करुन ती हाकलून लावण्याबाबत मार्गदर्शन केले.

खरीप हंगामातील पिकांनाही या किडीचा धोका होण्याची शक्यता आहे. टोळधाड आल्यास समुहाच्या वाटेवर दोन ते तीन फूट खोल चर काढून, शेतात मशाली पेटवून आणि टायर जाळून धूर करून तसेच थाळी वाजवून टोळ नियंत्रणात आणू शकतो. टोळधाड प्रतिबंधासाठी कृषी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन उपाययोजना कराव्या.
- ज्ञानदेव तिखे
कृषी अधिकारी, चिमूर

Web Title: Farmers in the district are scared of locusts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.