‘त्या’ जखमी वाघाचा अखेर मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2019 09:47 PM2019-11-07T21:47:25+5:302019-11-07T21:48:35+5:30

भद्रावती तालुक्यातील चारगाव खुल्या कोळसा खाणीलगत असलेल्या शिरणा नदीच्या पुलाखाली जखमी अवस्थेतील वाघाचा वनविभागाच्या डोळ्यादेखत तब्बल १९ तासानंतर दुर्दैवी मृत्यू झाला.

The 'death' of the injured tiger | ‘त्या’ जखमी वाघाचा अखेर मृत्यू

‘त्या’ जखमी वाघाचा अखेर मृत्यू

Next

विनायक येसेकर/राजेश रेवते ।
लोकमत न्यूज नेटवर्क
भद्रावती (चंद्रपूर) : तालुक्यातील चारगाव खुल्या कोळसा खाणीलगत असलेल्या शिरणा नदीच्या पुलाखाली जखमी अवस्थेतील वाघाचा वनविभागाच्या डोळ्यादेखत तब्बल १९ तासानंतर दुर्दैवी मृत्यू झाला.
सदर वाघाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तो पुलाखाली नदीच्या पात्रात पडला. डोक्याला गंभीर दुखापत होऊन मेंदूतून रक्तस्राव वाढला. अशातच वाघाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे. जखमी वाघाला बाहेर काढण्यात वनविभाग कमी पडल्याने वाघावर उपचार होऊ शकले नाही. या बाबीला वनविभागाने पद्धतशीर फाटा देत बचावात्मक पवित्रा घेतल्याचे दिसून येते. सदर वाघ हा नर असून पाच वर्षांचा होता.
तालुक्यातील तेलवासा, कुन्हाळा, चारगाव, ढोरवासा या जुन्या कोळसा खाणीच्या परिसरात या वाघाने आपले वास्तव्य निर्माण केले होते. बुधवारी हा वाघ शिरणा नदीच्या पात्रात एका दगडाखाली असल्याचे तेथील काही नागरिकांना दिसला. या वाघाला मंगळवारी रात्री अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तो नदीपात्रात पडला. त्याच्या मेंदूला जबर मार असल्याने तो तिथून इतरत्र जाऊ शकला नाही. माहिती होताच घटनास्थळी वनपरिक्षेत्र अधिकारी स्वाती म्हैसेकर आपल्या ताफ्यासह दाखल झाल्या. बुधवारी सकाळी ८ वाजतापासून त्या वाघाला जिवंत बाहेर काढण्यासाठी वनविभाग तसेच इको प्रो संघटनेचे शर्थीचे प्रयत्न चालू होते. नदीपात्रातील ज्या दगडाखाली वाघ होता त्या परिसरात जाणे कठीण असल्याने वेकोलिच्या माध्यमातून त्या परिसरात रस्ता तयार करून क्रेन उतरविण्यात आली व त्याच्या सहाय्याने पिंजरा त्या वाघाच्या समोर ठेवण्यात आला. मात्र वाघ सदर पिंजऱ्यात आला नाही. तो पाण्यातच बराच वेळ फिरत होता. वन कर्मचाऱ्यांनी त्याच्याजवळ फटाके फोडून हुसकावण्याचा प्रयत्न केला. परंतु जबर जखमी असल्याने तो पाण्यातून बाहेर निघू शकला नाही. रेस्क्यूदरम्यान घटनास्थळी डीएफओ सोनकुसरे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. वाघ जखमी व नदीपात्रात असल्याने वनाधिकाऱ्यांना वाघाला रेस्क्यू करता आले नाही. दरम्यान, रात्री १ वाजताच्या सुमारास वाघाचा मृत्यू झाला. त्यानंतर इको-प्रो संघटनेच्या सदस्यांमार्फत वाघाचा मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात आला. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण खोब्रागडे, डॉ. शेडमाके, डॉ. जांभुळे यांनी वाघाचे शवविच्छेदन केले. अज्ञात वाहनाच्या धडकेने वाघाच्या डोक्याला जबर दुखापत झाली. मेंदूला मार लागून रक्तस्राव सुरू झाला. रक्तस्राव वाढल्याने वाघाचा मृत्यू झाल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

वनविभागाच्या नियोजनाअभावी वाघाचा मृत्यू
गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात चिमूर वनपरिक्षेत्रातील भान्सुली बिटात तलावाच्या बाजूला ‘येडा अण्णा’ नावाचा वाघ उपचाराअभावी तडफडून मरण पावला. वाघाचा मृत्यू झाल्यानंतर त्यावर उपचार करण्याची अनुमती आली होती; तोपर्यंत वेळ निघून गेली होती. या घटनेची पुनरावृत्ती शिरणा नदीत जखमी अवस्थेत असलेल्या वाघाच्या घटनेवरून झाली आहे. हा वाघही वनविभाग येईल आणि आपल्यावर उपचार करेल, याची वाट पाहात होता. मात्र वनविभाग आला खरा मात्र तो केवळ वाघाच्या जखमा हेरू शकला नाही. उपचार तर दूरच राहिला. जेरबंद करण्यासाठी पिंजरा सोडला. मात्र नियोजनाच्या अभावामुळे वाघ त्या पिंजवनविभागाच्या नियोजनाअभावी वाघाचा मृत्यूत जाऊ शकला नाही. वनविभाग आपल्या प्रयत्नात मश्गुल असतानाच वाघाने अखेर जगाचा निरोप घेतला.
सदर वाघाला अज्ञात वाहनाने समोरून धडक दिली. यात त्याच्या मेंदूला दुखापत झाली. मेंदूतून रक्तस्राव वाढल्याने पोटातही रक्तस्राव सुरू झाला. त्यामुळे वाघाचा मृत्यू झाला.
 स्वाती म्हैसेकर,
वनपरिक्षेत्र अधिकारी, भद्रावती.

चारगाव येथील शिरणा नदीच्या पात्रात पडलेला वाघ ७ नोव्हेंबर रोजी मृत झाल्याचे दिसून आले. प्राथमिक अंदाजानुसार वाघाचा मृत्यू अंतर्गत रक्तस्रावामुळे व पाण्यात बुडाल्याने झालेला असून वाघाचे शवविच्छेदन करून दहन करण्यात आले.
 ए.एल. सोनकुसरे, विभागीय वन अधिकारी, चंद्रपूर

रेस्क्यूदरम्यान मीदेखील घटनास्थळी होतो. वाघ ज्या ठिकाणी होता, तिथे त्याला ट्रॅक्यूलाईझ करणे अवघड होते. बेशुद्ध झाल्यानंतर त्याचा पाण्यात बुडून मृत्यू निश्चित होता. वाघ आक्रमक आणि खवळलेला असल्याने त्याला जाळ्यात पकडणेदेखील शक्य नव्हते. यात एखाद्याचा बळी जाण्याची शक्यता होती. त्यामुळे वनाधिकाऱ्यांसमोर त्याला पिंजऱ्यात पकडण्याशिवाय पर्याय नव्हता.
 प्रकाश कामडे
अध्यक्ष, सार्ड संस्था, चंद्रपूर.

वाघ जखमी होता आणि ज्या ठिकाणी होता, तिथून त्याला पिंजऱ्यात पकडणे हाच एकमेव मार्ग होता. त्याच मार्गाने वाघाला रेस्क्यू करण्यात येत होते. मात्र याला वाघाने प्रतिसाद दिला नाही. वाघाला जाळ्यात पकडणे शक्य नव्हते. ट्रॅक्यूलाईझ केल्यानंतर वाघ १५ मिनिटानंतर बेशुद्ध होतो. तो पाण्याजवळ असल्याने त्याला ट्रॅक्यूलाईझ करणेही शक्य नव्हते.
बंडू धोतरे,
मानद वन्यजीव रक्षक तथा अध्यक्ष
इको प्रो, चंद्रपूर.

Web Title: The 'death' of the injured tiger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.