सिलिंडर भाववाढ; गरिबांचा स्वयंपाक पुन्हा चुलीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 01:33 PM2021-02-24T13:33:29+5:302021-02-24T13:34:06+5:30

Chandrapur News सिलिंडरचे सातत्याने वाढलेले भाव गरिबांना परवडणारे नसल्याने ग्रामीण महिलांनी पुन्हा चुलीवरच स्वयंपाक करणे सुरु केले आहे.

Cylinder inflation; The cooking of the poor is on the stove again | सिलिंडर भाववाढ; गरिबांचा स्वयंपाक पुन्हा चुलीवर

सिलिंडर भाववाढ; गरिबांचा स्वयंपाक पुन्हा चुलीवर

Next
ठळक मुद्दे महिलांचा डोळ्यात पुन्हा पाणी

 लोकमत न्यूज नेटवर्क 

चंद्रपूर : ग्रामीण महिलांना डोळ्याचे आजार होऊ नये तसेच प्रदूषणाला आळा बसून जंगल कटाई थांबावी यासाठी केंद्र शासनाने मोठा गाजावाजा करून गरीब कुटुंबीयांना उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत गॅस सिलिंडरचे वितरण केले. मात्र सिलिंडरचे सातत्याने वाढलेले भाव गरिबांना परवडणारे नसल्याने ग्रामीण महिलांनी पुन्हा चुलीवरच स्वयंपाक करणे सुरु केले आहे. त्यामुळे केंद्र शासनाची योजना चांगली असतानाही महिलांना मात्र आता सरपण गोळा करण्याशिवाय पर्याय नसल्याचे चित्र जिल्ह्यात बघायला मिळत आहे.

पंतप्रधान गॅस योजनेअंतर्गत जिल्ह्यात अल्प उत्पन्न असलेल्या महिलांना गॅस सिलिंडरचे वितरण केले. यामुळे ग्रामीण महिलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. मोलमजुरी करून चार पैसे मिळवून जगणाऱ्या कुटुंबीयांना गॅस सिलिंडर मिळाला मात्र सातत्याने सिलिंडरचे वाढणारे भाव डोळ्यात पाणी आणणारे ठरत आहे. कसेबसे करून आजपर्यंत सिलिंडर भरला मात्र आता अवाक्याबाहेर जात आहे. विशेष म्हणजे, आता शासनाने केरोसिनही देणे बंद केल्यामुळे महिलांना जंगलामध्ये जीव धोक्यात टाकून सरपण गोळा केल्याशिवाय पर्यायच नाही.

सिलिंडर भरण्यासाठी पैसा आणायचा कुठून

यावर्षी कोरोना संकटामुळे सर्वांचेच अर्थचक्र बिघडले आहे. यातून कसाबसा मार्ग काढत जीवन जगणे सुरु आहे. यातही महागाई तसेच सिलिंडरचे दर वाढल्यामुळे गरिबांनी जगायचे कसे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सिडिंडरचे दर वाढले त्यामुळे भरण्याचा प्रश्न असतानाच केरोसीनही बंद आहे. त्यामुळे महिलांना सरपण गोळा करावे लागत आहे. मात्र सरपण आणणेही आता धोकादायक ठरत आहे. जंगलव्याप्त गावांमध्ये वन्यप्राणी मोठ्या संख्येने असल्यामुळे एकीकडे आड दुसरीकडे विहिर अशी काहीशी अवस्था ग्रामीण महिलांची झाली आहे.

गृहिणींच्या प्रतिक्रिया

उज्ज्वला गॅस मिळाल्यामुळे आनंद झाला. मात्र तो काही दिवसांसाठीचाच होता. सातत्याने वाढणाऱ्या गॅस सिलिंडरच्या किमतीमुळे सिलिंडर भरणे परडणारे नाही. त्यातच महागाई वाढत आहे. त्यामुळे महिला पुन्हा चुलीवर स्वयंपाक करून कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करीत आहे. शासनाने सिलिंडरच्या किमती कमी करणे गरजेचे आहे.

- सुनंदा देशमुख

किरमीटी

दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. त्यामुळे गरिबांना जगणे कठीण झाले आहे. असे असतानाच गॅस सिलिंडरची भाववाढ करून शासनाने गरिबांच्या जखमेवर मिठ चोळण्याचा प्रयत्न केला आहे. सिलिंडरचे दर कमी करावे. सध्या सरपण गोळा करून चुलीवरच स्वयंपाक करणे सुरु केले आहे.

कुंदा नवघडे, मिंथुर

ग्रामीण भागात लाभार्थ्यांना उज्ज्वला गॅस योजनेतून गॅससिलिंडर मिळाले. मात्र आता सिलिंडरचे भाव वाढल्यामुळे गरिबांना सिलिंडर भरणे कठीण जात आहे. शासनाने सिलिंडरचे भाव कमी करून गरिबांना दिलासा देणे गरजेचे आहे.

सरकारने गॅससिलिंडर दिल्यामुळे आनंद झाला. मात्र सासत्याने वाढणारे दर बघून चुलीवरच स्वयंपाक करणे परवडणारे असल्यामुळे पुन्हा चूल पेटवली आहे. सरकारने गॅस सिलिंडरच्या किमती कमी करून गोरगरिबांना परवडेल इतक्या कमी किमतीवर तो उपलब्ध करून द्यावा.

वाढत्या महागाईमुळे मोठी अडचण जात आहे. प्रत्येक गोष्टीच्या किमती वाढत आहे. गॅससिलिंडरचे दर वाढले आहे. त्यातच सबसिडीही देणे बंद केले आहे. त्यामुळे गरिबांचे जगणे कठीण झाले आहे. सिलिंडरचे भाव कमी करणे गरजेचे आहे.

Web Title: Cylinder inflation; The cooking of the poor is on the stove again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.