अर्थार्जनासाठी घराबाहेर निघणारा तरूण वयोगट ठरला ‘कोरोना टार्गेट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 05:00 AM2021-04-16T05:00:00+5:302021-04-16T05:00:32+5:30

कोरोना विषाणूचे जिल्ह्यात धडक दिल्यानंतर ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व सहव्याधी असणाऱ्यांनाच सर्वाधिक धोका असल्याचे आरोग्य विभाग व या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून सांगितले जात होते. गतवर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेत या वयोगटातील व्यक्तींना संसर्ग झाल्याची माहिती पुढे आली. तेव्हापासून ४० ते ६० वयोगटालाच खबरदारीच्या सूचना दिल्या जात होत्या. वयोमानानुसार त्यांची प्रतिकारशक्तीही कमी असते.

'Corona Target' | अर्थार्जनासाठी घराबाहेर निघणारा तरूण वयोगट ठरला ‘कोरोना टार्गेट’

अर्थार्जनासाठी घराबाहेर निघणारा तरूण वयोगट ठरला ‘कोरोना टार्गेट’

Next
ठळक मुद्देकुटुंबातील ज्येष्ठ धास्तावले : १९ ते ४० वयोगटात १६ हजार १२९ बाधित

राजेश मडावी
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : नोकरी, व्यवसाय, स्वयंरोजगार अथवा कुटुंबातील दैनंदिन विविध कामांसाठी घराबाहेर निघणाऱ्या १९ ते ४० वयोगटातील सर्वाधिक व्यक्ती कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत. आरोग्य विभागाने बुधवारी जाहीर केलेल्या अहवालानुसार शुक्रवारपर्यंत अशा वयोगटातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १६ हजार १२९ पर्यंत पोहोचली आहे. विशेष म्हणजे, ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व सहव्याधी असणाऱ्या बाधितांचीच संख्या तुलनेने कमी आहे. त्यामुळे कुटुंबाची जबाबदारी पेलणाऱ्या व्यक्तींनाच यापुढे खबरदारी घ्यावी लागणार आहे.
कोरोना विषाणूचे जिल्ह्यात धडक दिल्यानंतर ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व सहव्याधी असणाऱ्यांनाच सर्वाधिक धोका असल्याचे आरोग्य विभाग व या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून सांगितले जात होते. गतवर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेत या वयोगटातील व्यक्तींना संसर्ग झाल्याची माहिती पुढे आली. तेव्हापासून ४० ते ६० वयोगटालाच खबरदारीच्या सूचना दिल्या जात होत्या. वयोमानानुसार त्यांची प्रतिकारशक्तीही कमी असते. त्यामुळे नागरिकांनीही घरातील ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घेऊन घराबाहेरील दैनंदिन सर्वच कामांची जबाबदारी स्वत:कडे घेतली. कोरोनामुळे ज्येष्ठांच्या सामूहिक संपर्काला मर्यादा घालण्यात आल्या; परंतु कुटुंबातील महत्त्वाच्या कामांची जबाबदारी घेणाऱ्या १९ ते ४० वयोगटातील युवक- युवती, नोकरदार, व्यावसायिक व स्वयंरोजगार करणारेच आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बाधित होत आहेत. कोरोना संसर्गाची साखळी तुटली नाही, तर काही दिवसांतच कमावती तरुणाई कोरोनाच्या विळख्यात सापडून मोठा अनर्थ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच जिल्हा प्रशासनाने चाचण्याची गती वाढविली आहे.

लसीकरण वयोगटाचा पुनर्विचार व्हावा
कोरोना प्रतिबंधक लस (व्हॅक्सिन) कुणाला द्यायची, याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार केंद्र सरकारकडे आहे. सद्यस्थितीत १९ ते ४० वयोगटातील नागरिक लस घेण्यास पात्र नाहीत. लसीकरण मोहिमेचे अद्याप विकेंद्रीकरण झाले नसल्याने जिल्ह्यांना राज्य सरकारकडे व राज्य सरकारला केंद्र सरकारकडे डोससाठी हात पसरावे लागत आहे.  पुरेशा डोसअभावी  केंद्र बंद ठेवाव्या लागतात. काही दिवसात हे चित्र बदलेल, अशी आशा करूया. मात्र, कमावत्या तरूण वयोगटालाच कोरोनाने टार्गेट             केल्याने व्हॅक्सिन वयोगटाचा तातडीने पुनर्विचार करावा लागणार         आहे.
 

कमावत्या वयोगटामुळे घरात शिरला कोरोना
कोरोनामुळे घरातील ज्येष्ठ नागरिकांचा सार्वजनिक वावर कमी झाला. कुटुंंबातील बहुतांश कमावते सदस्य बाहेरील कामांची जबाबदारी स्वत:कडे घेतली. मात्र, चंद्रपुरातील बºयाच कुटुंबात १९ ते ४० वयोगटातील सदस्यच कोरोना बाधित झाले. त्यांच्यामुळे ज्येष्ठांवरही कोरोना संसर्गाची आपत्ती ओढवली तर काहींचा बळी गेला. त्यामुळे कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकांना आता स्वत:सोबतच कमावत्या मुलामुलींचीही चिंता सतावू लागली आहे.

संकटात आशेचे किरण
१९ ते ४० वयोगटाला कोरोनाने लक्ष्य केले. मात्र, मृत्यु होण्याचे प्रमाण कमी आहे. आतापर्यंत ३० ते ४० वयोगटातील ३४ जणांचा मृत्यू झाला. ४० ते ५० वयोगटात १४२ तर ६० वयोगटात २८० जणांचा मृत्यू झाला. पण, १९ ते ४० वयोगटातील कोरोना दुरूस्ती (रिकव्हरी रेट) दर सध्या तरी चिंताजनक नसल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे.

 

Web Title: 'Corona Target'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.