एका चेंडूत जग बदलण्याची क्षमता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 12:06 PM2019-08-05T12:06:34+5:302019-08-05T12:07:05+5:30

खेळावर प्रेम करा, देशाचे नावलौकीक वाढवा, कारण एका चेंडूत जंग बदलण्याची क्षमता असते, त्यामुळे क्रीडा प्रकाराकडे न्यायदृष्टीने पाहा, असे प्रतिपादन सुप्रसिध्द सिनेअभिनेता आमिर खान यांनी केले.

The ability to change the world in one ball | एका चेंडूत जग बदलण्याची क्षमता

एका चेंडूत जग बदलण्याची क्षमता

Next
ठळक मुद्देमिशन शक्तीचा थाटात शुभारंभ

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मिशन शक्तीमुळे तरुणांना संधी मिळाली आहे. खरे म्हणजे माझे अभ्यासात मन लागत नव्हते, क्रीडा क्षेत्राची मला आवड होती. खेळातून सांघिक भूमिका बजावता येते. खेळण्याची जिद्द, हारल्याचे आत्मपरिक्षण करण्याची प्रेरणा क्रीडा प्रकारातून मिळते. शालेय अभ्यासक्रमात विषयानुसार शिक्षणासोबत कौशल्य विकसित करण्यासाठी क्रीडा प्रकाराचा समावेश करण्याची गरज आहे. खेळावर प्रेम करा, देशाचे नावलौकीक वाढवा, कारण एका चेंडूत जंग बदलण्याची क्षमता असते, त्यामुळे क्रीडा प्रकाराकडे न्यायदृष्टीने पाहा, असे प्रतिपादन सुप्रसिध्द सिनेअभिनेता आमिर खान यांनी केले.
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने विसापूर येथील १५ एकर जागेच्या परिसरात अद्यावत बल्लारपूर तालुका क्रीडासंकुल उभारण्यात आले. त्याचे व माजी प्रधानमंत्री श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्याचे अनावरण पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते व प्रसिद्ध सिने कलावंत व दिग्दर्शक आमिर खान यांच्या प्रमुख उपस्थित पार पडले. यावेळी आमिर खान बोलत होते.
यावेळी व्यासपिठावर राज्याचे अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह आदिवासी विकासमंत्री अशोक उईके, वन विकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, राजुराचे आमदार अ‍ॅड. संजय धोटे, आमदार नाना श्यामकुळे, गडचिरोलीचे खासदार अशोक नेते, नगराध्यक्ष हरिश शर्मा, जि.प. अध्यक्ष देवराव भोंगळे, चंद्रपूरच्या महापौर अंजली घोटेकर, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा क्रीडा अधिकारी अनंत बोबडे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

वाघाच्या जिल्ह्यातील युवकांना ऑलिम्पिक पदकाची संधी- सुधीर मुनगंटीवार
जिल्ह्यातील ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्प वाघासाठी प्रसिद्ध आहे. याच जिल्ह्यातील युवकांना २०२४ ऑलिम्पिक खेळात भाग घेऊन पदक मिळविण्याची संधी मिशन शक्तीच्या माध्यामातून मिळणार आहे. लगतच्या गडचिरोली जिल्हादेखील यात सहभागी होणार आहे. मिशन शौर्यच्या माध्यमाने या भागातील आदिवासी तरुणांनी एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत करुन नावलौकीक मिळवला. आता मिशन शक्तीच्या रुपाने आलिम्पिक पदाला गवसणी घालण्याचे तरुणांना बळ दिले जाणार असल्याचे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्हा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे रविवारी केले.
आमीर खान यांचा पिंड देशभक्तीचा व सामाजिक बांधिलकी जोपासणारा आहे. त्यांनी भूमिका साकारलेल्या व दिग्दर्शित केलेल्या चित्रपटामधून ते प्रतिबिंबीत होते. ‘लगान’ चित्रपट त्याचे चांगले उदाहरण आहे. कार्तिकेय गुप्ता याने जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेत देशात अव्वल येवून राज्याचा लौकीक वाढविला. युपीएससीसह तत्सम स्पर्धा परीक्षेत उज्ज्वल यश प्राप्त करुन प्रशासकीय व्यवस्थेत उच्चपदस्थ अधिकारी म्हणून येथील तरुणाला संधी मिळावी. सैनिक शाळेतील विद्यार्थी मोठ्या पदावर जावा. जिल्ह्याचा नावलौकीक वाढावा. मिशन शौर्य, मिशन शक्तीप्रमाणेच प्रशासकीय सेवा कार्याचेही प्रतिबंब उमटविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ना. सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.

तालुका क्रीडा संकुलात या आहेत सुविधा
बल्लारपूर तालुका क्रीडा संकुलाच्या बांधकामावर ३९८५.६० लक्ष रुपये खर्च करण्यात येवून अद्यावत क्रीडा संकूल उभारण्यात आले. यामध्ये दोन लॉन टेनिस कोर्ट, कबड्डी मैदान, खो-खो मैदान, बॉस्केट बॉल मैदान, व्हॉलीबॉल मैदान, ४०० मीटर सिंथेटिक स्मॉर्ट धावपट्टी, जलतरण तलाव, धनुर्विद्या क्षेत्रासह ५० मुलांची राहण्याची व्यवस्था असणारे वसतिगृह, संरक्षण भिंत, बॅडमिंटन हाल, पव्हेलियन इमारत, अंतर्गत रस्ते व पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा पूर्णाकृती पुतळा प्रेरणा देणार आहे.

Web Title: The ability to change the world in one ball

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.