ताडोबातील २०० वाघांना आता अधिक मोकळेपणाने फिरता येणार.. पहा कसे..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 01:59 PM2020-07-04T13:59:59+5:302020-07-04T14:03:11+5:30

वन्यजीव प्रेमीच्या प्रयत्नातून ताडोबातील वाघांच्या घराला आता इको सेन्सेटिव्ह झोनची संरक्षण भिंत मिळाली आहे. बफर झोनपासून ३ ते १६ किलोमीटर परिसरापर्यंतचा परिसर आता इको सेन्सेटिव्ह झोन असणार आहे. त्यामुळे वाघाचे अधिवास क्षेत्र वाढण्यास मदत होणार आहे.

200 tigers in Tadoba will now be able to move more freely .. see how .. | ताडोबातील २०० वाघांना आता अधिक मोकळेपणाने फिरता येणार.. पहा कसे..

ताडोबातील २०० वाघांना आता अधिक मोकळेपणाने फिरता येणार.. पहा कसे..

Next
ठळक मुद्देवाघांचे अधिवास क्षेत्र वाढणारकुठल्याही उद्योगाला या क्षेत्रात मनाई

राजकुमार चुनारकर

लोकमत न्यूज नेटवर्क 
चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये आजघडीला दोनशेच्या जवळपास वाघांची संख्या आहे. त्यामुळे वाघांसाठी हे क्षेत्र कमी पडू लागले आहे. असे असताना येथील जंगल परिसरात कोळसा असल्याने कोळसा उद्योग निर्मितीच्या हालचालीही अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र वन्यजीव प्रेमीच्या प्रयत्नातून वाघांच्या घराला आता इको सेन्सेटिव्ह झोनची संरक्षण भिंत मिळाली आहे. बफर झोनपासून ३ ते १६ किलोमीटर परिसरापर्यंतचा परिसर आता इको सेन्सेटिव्ह झोन असणार आहे. त्यामुळे वाघाचे अधिवास क्षेत्र वाढण्यास मदत होणार आहे.
ताडोबा क्षेत्रात वाघांसाठी असलेला उत्कृष्ट अधिवास, खाद्य आणि पाण्याची उपलब्धता त्यासोबत वाघांची संख्या लक्षात घेऊन २३ फेब्रुवारी १९९५ ला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाची निर्मिती झाली. या प्रकल्पात ६२५.४० चौरस किमी क्षेत्र कोर आहे तर भोवताली ११०१ चौरस किमी क्षेत्र बफर झोन आहे. मात्र मध्यंतरी ताडोबातील वाघांची संख्या, जंगल तोड, मानवाचे वाघाच्या घरातील आक्रमण, त्यामुळे वाघ-मानव संघर्ष निर्माण झाला.  त्यामुळे शासनाने वाघाच्या संवर्धनासाठी प्रयत्न करीत अनेक नियम तयार करून वाघांची सुरक्षा वाढवली.

ताडोबा जंगल परिसरात कोळसा खाणीसह उद्योग सुरु करण्यासाठी एक प्रवाह नेहमी तयार राहून वाघाच्या जीवावर उठण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहत आला आहे. त्यांच्या या प्रयत्नांमुळे वाघांचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता असल्याने या विरोधात वन्यजीव प्रेमींनी आवाज उठविला. मागील आठ वर्षांपासून ते शासनाला पत्र व्यवहार करीत आहेत. त्यांच्या या लढ्याची ११ नोव्हेंबर २०१९ मध्ये शासनाने दखल घेतली. ताडोबा प्रकल्पाच्या बफरझोनपासून ३ ते १६ किलोमीटरपर्यंतचा परिसर इको सेन्सेटिव्ह झोन असणार आहे. याला शासनाने मंजुरी दिली आहे.

आता ताडोबासाठी तीन झोन
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामधील वाघ व इतर प्राण्यांच्या अधिवासासाठी तथा सुरक्षेसाठी या जंगलामध्ये यापूर्वी दोन झोन होते. २७ डिसेंबर २००७ मध्ये ६२५.४० चौरस किलोमीटरचे कोअर क्षेत्र निर्माण झाले. त्यानंतर ५ मे २०१० मध्ये ११०१.७७ चौरस किलोमीटरचे बफर झोन तयार झाले. आता या क्षेत्राला लागून चारही बाजूने ३ ते १६ किलोमीटरपर्यंत म्हणजेच १३४६.६१ चौरस किलोमीटर क्षेत्र इको सेन्सेटीव्ह झोन म्हणून ओळखले जाणार आहे.

या बाबींना राहणार बंदी
ताडोबातील बफर झोन क्षेत्रापासून ३ ते १६ किलोमीटरपर्यंत असलेल्या इको सेन्सेटिव्ह झोन परिसरातील जंगल क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे उत्खनन करण्यास बंदी, पर्यावरणाचा ऱ्हास होईल अशा उद्योगास बंदी राहणार आहे. तसेच या क्षेत्रात रिसॉर्ट, हॉटेलसाठी सुद्धा आता पर्यावरण विभागाची परवानगी घ्यावी लागणार आहे.

इको-प्रो संघटनेचा आठ वर्षांचा संघर्ष
इको प्रो संघटनेने ११ नोव्हेंबर २०११ मध्ये इको सेन्सेटीव्ह झोन करण्यासाठी लढा उभारला. हा लढा सातत्याने कायम ठेवला. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने १२ जुलै २०१८ ला इको सेन्सेटीव्ह झोनचे नोटीफिकेशन काढून ६० दिवसांच्या आत हरकती मागितल्या. त्यानंतर इको सेन्सेटीव्ह झोनला ११ नोव्हेंबर २०१९ ला अंतिम मंजुरी देण्यात आली. ही प्रत कुठल्याही कार्यालयात उपलब्ध नव्हती. मात्र बंदर कोल ब्लॉकच्या आंदोलनादरम्यान ती प्रत प्राप्त करण्याचा प्रयत्न इको प्रोचे अध्यक्ष बंडू धोत्रे यांनी केला असता इको सेन्सेटीव्ह झोनचे आदेश मिळाल्याने आता ताडोबातील वाघासह प्राण्यांवरील संकट दूर करण्यासाठी संजीवनी मिळाली आहे.

ताडोबाच्या बफरझोनपासून काही किलोमीटर परिसर इको सेन्सिटिव्ह झोन करण्यात आला आहे. या संदर्भात शासनाने नोटीफिकेशन जारी केले आहे.
-एन.आर.प्रवीण,
क्षेत्र संचालक, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर.

Web Title: 200 tigers in Tadoba will now be able to move more freely .. see how ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.