Delete the event 'Manage' | इव्हेंटचे ‘मॅनेजमेंट’ करा हटके
इव्हेंटचे ‘मॅनेजमेंट’ करा हटके

आजकाल माणूस भलताच उत्सवप्रिय बनत चालला आहे. प्रत्येक चांगल्या घटनेची स्मृती कायम जपण्याचा त्याचा प्रयत्न असतो. बदलते तंत्रज्ञान, पैशाची बऱ्यापैकी आवक, इतरांचे अनुकरण, सामाजिक प्रतिष्ठा अशा अनेक घटकांचा या उत्सवावर प्रभाव असतो. त्यामुळे बारशापासून लग्नापर्यंत, वयाची एकसष्टी, सहस्र चंद्रदर्शन, लग्नाचा रौप्य, सुवर्ण महोत्सव अशा किती तरी निमित्ताने सोहळे होत असतात. या सोहळ्यांच्या आयोजन-नियोजनपासून जबाबदारी घेणाºया क्षेत्राला इव्हेंट मॅनेजमेंट म्हणतात. पण हा झाला कौटुंबिक सोहळा. याच्या पलीकडेही इव्हेंट मॅनेजमेंटची झेप असते. आजकाल कमर्शिअल क्षेत्रात इव्हेंट मॅनेजमेंटला मोठी मागणी आहे. सांस्कृतिक कार्यक्रमही इव्हेंट मॅनेजमेंटमुळे लक्षवेधक होतो. त्यामुळे हा एक यशस्वी उद्योग आहे. कल्पक आणि सृजनशील व्यक्तींना यात करिअर करण्याची खूप संधी आहे.
इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये करिअर करण्यासाठी कोणत्या एकाच विद्या शाखेतील पदवीची आवश्यकता नाही. बारावी उत्तीर्ण झालेले उमेदवारही यात करिअर करू शकतात शिवाय वयाचीही तशी अट नाही. काय असते या इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये? तर कार्यक्रमाचे स्वरूप पाहून व्यासपीठाची रचना, त्याची सजावट, संगीत, प्रकाशयोजना, येणाºया पाहुण्यांचे स्वागत, भोजन व्यवस्था, वाहन व्यवस्था, अशा किती तरी व्यवस्था यात पाहाव्या लागतात. अगदी घरगुती कार्यक्रमापासून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांपर्यंत इव्हेंट मॅनेजमेंट हा परवलीचा शब्द होऊ पाहत आहे. त्यामुळे सध्या इव्हेंट मॅनेजमेंटची स्थिती पाहता भविष्यकाळात याला मागणी असणार यात शंका नाही. या क्षेत्रात असणारी वैविध्यता पाहता तरुण पिढी मोठ्या संख्येने या क्षेत्राकडे वळत आहे.
इव्हेंट मॅनेजमेंटचे प्रशिक्षण देणाºया संस्था आहेत. त्यात प्रशिक्षण मिळतेच पण या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी खरी गरज असते ती प्रॅक्टिकल ज्ञानाची. त्यासाठी प्रशिक्षणाबरोबरच कुठल्या तरी इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीत उमेदवारी करून ज्ञान मिळविणे आवश्यक असते. यामुळे पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रत्यक्ष कामाचे स्वरूप व काम करण्याची पद्धत याचा अंदाज येतो. पुणे विद्यापीठ, सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट आॅफ जर्नलिझम अ‍ॅण्ड कम्युनिकेशन, पुणे तसेच मुंबईतील सेंट झेविअर्स कॉलेज आॅफ कम्युनिकेशन, इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ इव्हेंट मॅनेजमेंट यांसारख्या संस्थांतून इव्हेंट मॅनेजमेंटचे प्रशिक्षण दिले जाते.
इव्हेंट मॅनेजमेंटमध्येही प्रकार असतात. काहींना कमर्शिअल क्षेत्रांशी निगडित मोठे कार्यक्रम, परिषदा, शिबिरे, प्रशिक्षण केंद्र या प्रकारांत काम करायला आवडते तर काहींना लग्न, वाढदिवस, सांस्कृतिक कार्यक्रम यांचे नियोजन करण्यात रस असतो. तथापि, कल्पनाशक्ती, सृजनशीलता, वैविध्यपूर्णता, व्यवस्थापन व नियोजन यांवर वकुब असणाºयांना यात खूप संधी आहेत.

इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये काम करताना सर्वात महत्त्वाचे असते ते संभाषण चातुर्य. आपल्या संवाद कौशल्याने एखाद्या संस्थेकडून वा कंपनीकडून काम मिळविले जाते. त्यानंतर संभाव्य खर्चाची पूर्वसूचना देणेही तेवढेच महत्त्वाचे असते. हे काम वेळेतच पूर्ण करावे लागते. त्यामुळे कार्यक्रमाचे व्यवस्थित नियोजन करून सर्व तयारी ठेवावी लागते. समारंभाच्या दिवशी कार्यक्रमाचे व्यवस्थापन करताना मर्यादित वेळेत सर्व गोष्टी पूर्ण करायच्या असतात.
शिवाय कार्यक्रमात अडथळा येऊ नये म्हणून तशी तयारीही ठेवावी लागते. इव्हेंट मॅनेजमेंटशी संबंधित असणारी कामे वरवर समान असली तरी कंपनीनुसार त्यात बदल होत असतो. कंपनीचे संचालक आणि पदाधिकारी कार्यक्रमाची रूपरेषा आखत असतात. त्यानुसार विपनन पद्धती ठरवणे, प्रायोजक मिळविणे, स्थळनिश्चिती करणे, निमंत्रण पत्रिका तयार करून त्यांचे वितरण करणे, कलाकारांची वेळ निश्चित करणे, व्यासपीठ सजवणे, वाहनव्यवस्था पाहणे, अशा किती तरी बाबींकडे लक्ष पुरवावे लागते. विशेष म्हणजे कार्यक्रम विनाअडथळा पार पाडावा लागतो.

Web Title: Delete the event 'Manage'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.