vodafone may leave indian market losses mounting says report IANS | व्होडाफोन लवकरच भारतातून गाशा गुंडाळणार?
व्होडाफोन लवकरच भारतातून गाशा गुंडाळणार?

नवी दिल्ली : भारतातील आघाडीची दूरसंचार कंपनी असलेली व्होडाफोन लवकरच देशातील सेवा बंद करण्याची शक्यता आहे. व्होडाफोन कंपनीला मागील काही दिवसांत मोठं नुकसान झालं असून, लवकरच ती भारतातून गाशा गुंडाळण्याची चर्चा आहे. आयएएनएस या वृत्तसंस्थेने असं वृत्त दिलं असून, व्होडाफोनकडून अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. गेल्या काही महिन्यांपासून दूरसंचार क्षेत्रात प्रचंड स्पर्धा निर्माण झाली आहे. जिओनं बाजारात उडी घेतल्यानंतर अनेक कंपन्यांचे दाबे दणाणले. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आयडिया आणि व्होडाफोननंही विलीनीकरणाचा मार्ग स्वीकारला. या दोन्ही कंपन्या एकत्र सेवा देत असतानाही आता व्होडाफोन भारतातून गाशा गुंडाळणार असल्याचं वृत्त आल्यानं अनेकांना धक्का बसला आहे. कंपनीचं पॅकअप झालेलं असून, कंपनी कोणत्याही क्षणी भारतातून सेवा बंद करू शकते, असं वृत्त आयएएनएसनं दिलं आहे.
 
काही दिवसांपूर्वीच व्होडाफोन अन् आयडियाच्या लाखो ग्राहकांच्या संख्येत घट झाल्याची माहिती समोर आली होती. तिमाहीत कंपनीला आर्थिक तोटा झाला होता. बाजारातील भांडवलात दिवसेंदिवस होत चाललेली घट आणि तोटा वाढल्यानेच कंपनी असा निर्णय घेण्याची चर्चा आहे. 2019मध्ये जून या एकाच महिन्यात कंपनीला 4 हजार 67 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. तसेच हा नुकसानीचा आकडा वाढताच असल्यानं व्होडाफोनच्या अडचणी वाढतच चालल्या आहेत.  तसेच सर्वोच्च न्यायालयानंही एका निकालात व्होडाफोन अन् आयडिया कंपनीला 28 हजार 309 कोटी रुपये भरण्यास सांगितले आहेत. या रकमेवर कंपनीला दिलासा मिळाला नाही, तर कंपनीसाठी पुढची वाटचाल कठीण आहे.

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात झाले होते व्होडाफोन अन् आयडियाचं विलीनीकरण
व्होडाफोन इंडिया व आयडिया सेल्युलर या कंपन्यांच्या विलीनीकरणाला राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरणाने (NCLT) परवानगी दिली. त्यानंतर 31 ऑगस्ट 2018 रोजी या दोन्ही कंपन्यांचं विलीनीकरण झालं. या विलीनीकरणानंतर व्होडाफोन-आयडिया ही नवी मोबाइलसेवा पुरवठादार कंपनी जन्माला आली. या विलीनीकरणामुळे भारती एअरटेल ही कंपनीसुद्धा दुसऱ्या स्थानावर फेकली गेली. अंबानींच्या जिओने मोबाइलसेवेत केलेल्या नवनव्या प्रयोगानंतर व्होडाफोन व आयडिया या कंपन्यांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते. या दोन्ही कंपन्यांवर कर्जाचा बोजा वाढत असल्यानं अस्तित्वासाठी त्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. 

Web Title: vodafone may leave indian market losses mounting says report IANS

Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.