Tata Sons' chairmanship Cyrus Mistry was forced to leave, what happened in the meeting? | टाटा सन्सचे चेअरमनपद सायरस मिस्त्रींना सोडावे लागले, काय घडले त्या बैठकीत?
टाटा सन्सचे चेअरमनपद सायरस मिस्त्रींना सोडावे लागले, काय घडले त्या बैठकीत?

मुंबई : टाटा सन्सच्या चेअरमनपदावरून सायरस मिस्त्री यांना दूर करण्याचा प्रस्ताव २४ आॅक्टोबर २0१६ रोजी संचालक मंडळाच्या बैठकीत झाला. मिस्त्रींना टाटा सन्सने हटवल्याच्या वृत्तामुळे उद्योग जगतात त्यावेळ मोठीच खळबळ माजली होती. त्यामुळे त्या बैठकीत नेमके काय झाले, याविषयी अनेकांना आजही उत्सुकता आहे. दीपाली गुप्ता यांच्या ‘टाटा व्हर्सेस मिस्त्री’ या पुस्तकात त्याची माहिती आहे. मिस्त्रींना हटवण्याचा निर्णय ज्या बैठकीत झाला, त्याविषयीचा हा भागही या पुस्तकात दिला आहे. तो पुढीलप्रमाणे आहे :

आपल्याला हटवण्यात येणार असल्याची कल्पना मिस्त्रींना आधीच आली होती. तसा मेसेज त्यांनी पत्नी रोहिका यांना पाठवला. कायदेशीर सल्ला घ्यायला तिथे वकीलही नव्हता. मिस्त्रींच्या बाजूने उभे राहतील, असे कोणी बोर्ड मेम्बर होते का?
मिस्त्री बोर्ड रुममध्ये आले, तेव्हा तिथे मानद चेअरमन रतन टाटा, वित्तीय संचालक इशात हुसैन, ट्रस्टवरील नियुक्त संचालक व माजी सनदी अधिकारी विजय सिंह, अन्य नियुक्त संचालक व हार्वर्ड बिझनेस स्कूलचे डीन नितीन नोहरिया, स्वतंत्र संचालक रोनेंद्र सेन, फरिदा खंबाटा, टाटा मोटर्सचे चेअरमन व स्वतंत्र संचालक वेणू श्रीनिवासन, अजय पिरामल, अमित चंद्रा ही मंडळी तिथे बसली होती. चेअरमनसाठी असलेल्या अधिक मोठ्या खुर्चीत सायरस मिस्त्री दुपारी २ वाजता स्थानापन्न झाले.
बैठक सुरू होताच नोहरिया यांनी कामकाज पत्रिकवर नसलेला ठराव मांडण्यास आम्हाला टाटा ट्रस्टने सांगितल्याचा उल्लेख केला. त्यावर अमित चंद्रा म्हणाले की, आम्हा नियुक्त संचालकांची सकाळी बैठक झाली असून, त्यात सायरस मिस्त्री यांनी चेअरमनपदावरून दूर व्हावे, अशी विनंती करण्याचे ठरले आहे. त्यामुळे बैठकीचे काम सुरू होण्याआधी मिस्त्री राजीनामा देणार का?
हे सारे नाट्य अवघ्या साठ मिनिटांमध्ये आटोपले.

याबाबत रतन टाटा यांनी दोन शब्द बोलावेत, अशी विनंती मिस्त्रींनी केली, पण मी इथे केवळ निरीक्षक म्हणून आलो आहे, असे सांगून टाटा गप्प बसले. पुन्हा चंद्रा यांनी तुम्हाला हटविण्याच्या ठरावावर तुमचे काय म्हणणे आहे, असे मिस्त्रींना विचारले. त्यानंतरही झालेली चर्चा पुढीलप्रमाणे :
मिस्त्री : हा ठराव बेकायदा आहे. ठराव मांडण्यापूर्वी सर्व संचालकांना १५ दिवस आधी याची नोटीसद्वारे माहिती देणे आवश्यक असते.
चंद्रा : आम्ही कायदेशीर मत घेतले आहे. सध्या या नोटीसची गरज नाही. हा विषय मिस्त्रींविषयीचा आहे. त्यामुळे बैठकीचे अध्यक्षपद विजय सिंह यांनी स्वीकारावे, असा माझा प्रस्ताव आहे. तो मताला टाकण्यात यावा.
त्यावर इशात हुसैन व फरिदा खंबाटा यांनी मतदानात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. असा काही निर्णय होईल, याची त्यांना कल्पनाच नव्हती. सहा संचालकांनी चंद्रा यांच्या ठरावाच्या बाजूने मत दिल्याने मिस्त्री यांच्याकडून बैठकीची सूत्रे विजय सिंग यांच्याकडे गेली.
त्यानंतर लगेचच मिस्त्री यांचे कार्यकारी अधिकार काढण्याचा ठराव संमत झाला. नवा चेअरमन शोधण्यासाठी समिती नेमण्याचा ठराव संमत झाला. कंपनी सेक्रेटरी व कंपनीचे चीफ आॅपरेटिंग आॅफिसर फारोख सुबेदार यांच्याकडे व्यवस्थापन नियंत्रणाचे अधिकार देण्याचा प्रस्ताव मान्य झाला.
त्यानंतरच्या भाषणात रतन टाटा यांनी सायरस मिस्त्री यांच्या कार्याचे कौतुक करतानाच, तुम्ही संचालकपदी यापुढे राहणार का, असे विचारले. त्यावर मिस्त्री यांनी ‘होय’ असे उत्तर दिले.

सर्व कंपन्यांमधून बाहेर
नंतर हुसैन यांनी मिस्त्री यापुढे टाटा ग्रुप आॅफ कंपनीचे चेअरमन राहणार नसतील, तर स्टॉक एक्स्चेंजला ही माहिती देण्याची सूचना केली, कारण मिस्त्री टाटांच्या सात कंपन्यांच्या संचालक मंडळावर होते. पण सातही कंपन्यांवरून मिस्त्री यांना जावे लागले. मिस्त्री यांनी कायदेशीर सल्ल्याची प्रत मागितली असता, त्यावर वकिलांशी बोलून निर्णय घेतला जाईल, असे त्यांना सांगण्यात आले. बैठकीच्या अखेरीस या महत्त्वाच्या निर्णयाची माहिती पत्रकार परिषदेद्वारे सर्वांना देण्यात यावी, अशी सूचना केली आणि त्या परिषदेने सर्वत्र खळबळ माजली.


Web Title: Tata Sons' chairmanship Cyrus Mistry was forced to leave, what happened in the meeting?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.