Stock market collapse; A total of 1938 points fall in the month | शेअर बाजारात कोसळधार; महिनाभरात तब्बल १९३८ अंकांची पडझड
शेअर बाजारात कोसळधार; महिनाभरात तब्बल १९३८ अंकांची पडझड

मुंबई : अमेरिका-चीन व्यापारी युद्ध लांबण्याची भीती, हाँगकाँगमधील असंतोष आणि अर्जेंटिनाच्या चलनातील घसरण, यामुळे मंगळवारी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ६२३.७५ अंकांनी घसरून ३६,९५८.१६ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १८३.८0 अंकांनी घसरून १0,९२५.८५ अंकांवर बंद झाला.
सेन्सेक्सची ही मागील महिनाभरातील सर्वांत मोठी एकदिवसीय घसरण ठरली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत मंदीचा होत असलेला शिरकाव आणि वाहनासह ग्राहक वस्तू क्षेत्रात मागणीतील मोठी घसरण याचा फटकाही शेअर बाजाराला बसल्याचे सूत्रांनी सांगितले.
घसरगुंडीचा कल मोडून रिलायन्स इंडस्ट्रिजचे समभाग सुमारे १0 टक्क्यांनी वाढले. रिलायन्सच्या तेजीमुळे सेन्सेक्समधील घसरण मर्यादित राहण्यास मदत झाली.

शेअर बाजार महिनाभरापूर्वी १५ जुलै रोजी ३८,८९६ अंकांवर होता. तेव्हापासून आतापर्यंत त्यात
१९३८ अंकांची घसरण झाली आहे.

घसरण्याची ५ कारणे
१. अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापारयुद्ध नजीकच्या भविष्यात मिटण्याची चिन्हे नाहीत.
२. जगातील सर्वांत मोठे ट्रान्सपोर्ट हब असलेल्या हाँगकाँग येथे सुरू असलेल्या निदर्शनाचे पडसाद उमटले.
3. अर्जेंटिनातील चलन पेसोचे मूल्य सपाटून घसरले. त्यामुळे तेथील बाजारही ३१ टक्के खाली आला.
४. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य आणखी घसरले.
त्याचा फटका बसला.
५. परकीय गुंतवणूकदारांवर लावलेला कर
सरकारने अजूनही रद्द केला नाही. त्यावर
कोणताही निर्णय न झाल्याने बाजार आपटला.

चांदीचा उच्चांक
मंगळवारी राजधानी दिल्लीत चांदी तब्बल २ हजार रुपयांनी वाढून ४५ हजार रुपये किलो झाली. हा चांदीचा सार्वकालिक उच्चांक ठरला आहे. सोने मात्र १00 रुपयांनी घसरून ३८,३७0 रुपये प्रति १0 ग्रॅम झाले.

Web Title: Stock market collapse; A total of 1938 points fall in the month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.