Lokmat Money > बिझनेस न्यूज > श्रीमंत होण्यासाठी अशी करा गुंतवणुकीला सुरुवात

श्रीमंत होण्यासाठी अशी करा गुंतवणुकीला सुरुवात

‘सर, तुम्ही आम्हाला गुंतवणुकीच्या त्रिकोणाच्या ३ बाजूंची म्हणजे वृद्धी (growth), तरलता (liquidity) आणि सुरक्षितता (safety) यांची माहिती दिली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2019 04:34 AM2019-11-11T04:34:00+5:302019-11-11T04:34:45+5:30

‘सर, तुम्ही आम्हाला गुंतवणुकीच्या त्रिकोणाच्या ३ बाजूंची म्हणजे वृद्धी (growth), तरलता (liquidity) आणि सुरक्षितता (safety) यांची माहिती दिली आहे.

Start investing to get rich | श्रीमंत होण्यासाठी अशी करा गुंतवणुकीला सुरुवात

श्रीमंत होण्यासाठी अशी करा गुंतवणुकीला सुरुवात

- अरविंद परांजपे
‘सर, तुम्ही आम्हाला गुंतवणुकीच्या त्रिकोणाच्या ३ बाजूंची म्हणजे वृद्धी (growth), तरलता (liquidity) आणि सुरक्षितता (safety) यांची माहिती दिली आहे. या तीनही बाबी एकाच योजनेतून साध्य करता येत नसल्याने गुंतवणुकीच्या कालावधीनुसार वेगळे प्रकार निवडायचे असतात, हे पण आम्हाला समजले. मला जो बोनस मिळाला आहे त्याची मला पुढची काही वर्षे गरज नाही, तर गुंतवणुकीची एखादी योजना सांगितली तर लगेच चेक देतो.’ भेटल्यावर प्रणवने लगेच बोलायला सुरुवात केली.
‘अरे, अशी घाई करू नकोस. तू आता कुठे अर्थ नियोजनाच्या रस्त्यावर चालायला सुरुवात केली आहेस असे समज. जसे पुण्याहून मुंबईला जायला निघाल्यावर वाटेत तुझी गाडी तळेगाव, लोणावळा, ठाणे अशा स्टेशनवर थांबून मग मुंबईला पोहोचते. तसेच गुंतवणुकीची योजना ठरवायचे स्टेशन शेवटचे आहे. त्याआधी हे टप्पे आहेत. ते व्यवस्थित पूर्ण करून नंतर मुंबई येईल.
१) आर्थिक उद्दिष्टे ठरवणे
२) स्वत:ची गुंतवणुकीची भूमिका ठरणे
३) त्याकरिता अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशन करणे आणि
४) पोर्टफोलिओ बनवणे इत्यादी.
‘सर, आम्हाला वाटत होते, की तुमच्यासारख्या सल्लागारांनी आम्हाला सांगितले, की आम्ही फक्त चेक द्यायचे काम करायचे आहे. हे तुम्ही आम्हाला कामाला लावत आहात. पण ते इंटरेस्टिंग असणार असं वाटतंय, त्यामुळे आम्ही ते समजून घेऊ.’ अनिताने समजूतदारपणा दाखवल्यामुळे मला बरे वाटले, कारण त्यांना मासा खायला घालण्यापेक्षा मासे कसे पकडायचे,’ हे सांगण्यामध्ये मला जास्त आनंद होता.
‘मला वाटलेच होते, की तुम्हाला गुंतवणुकीचे मंत्र आणि तंत्र शिकायला आवडेल म्हणून. तर मी सांगत होतो, की अर्थनियोजनाने आपण सुरुवात करू या. कारण जे नियोजन करण्यात अपयशी ठरतात ते जणू अपयशाचे नियोजन करतात. आर्थिक नियोजन म्हणजे आपली आर्थिक उद्दिष्टे निश्चित करून ती साध्य करण्यासाठी आपल्या आर्थिक साधनांचे योग्य व्यवस्थापन करण्याची प्रक्रिया.’
‘हे अगदी पटलं सर, एका दिवसाचे जरी प्लॅनिंंग नीट केले नाहीत, तर नुसता वेळ जातो पण कामे होत नाहीत असा आमचा अनुभव आहे आणि पैसा तर खूपच महत्त्वाचा आहे ज्याकरिता आम्ही दिवसभर काम करतो. चांगले आणि वेळेवर काम करायचे असेल तर त्याचे नियोजन चांगले व्हायलाच पाहिजे. आता आम्ही काय करू ते सांगाल का?’ अनिताने विचारले.
‘अर्थनियोजन करायचे म्हणजे तुम्ही या गोष्टी करायच्या आहेत.
१. तुमची आताच्या सांपत्तिक स्थितीची नोंद करा.
२. Financial goals म्हणजे तुमची आर्थिक उद्दिष्टे निश्चित करा.
३. ती उद्दिष्टे कशा प्रकारे अमलात आणायची याची योजना आखा.
४. या योजनेची अंमलबजावणी करून त्याचा आढावा घ्या.
‘सर, हे करायला वेळ लागणार. कारण आमच्याकडे किती पैसे आहेत आणि महिना किती खर्च होतो, याची मला तर काहीच कल्पना नाही. अनितालाच हे काम करावे लागेल.’ प्रणवने हात वर केले.
‘हो ना. खर्च करायचे काम प्रणवचे आणि हिशेब ठेवायचे काम मात्र माझे. मीच दर महिन्याचे अंदाजपत्रक करते, म्हणून आम्हाला कधी कडकी नसते. याच्यावर घर सोडले असते तर कठीणच होते,’ अनिताने तक्रार केली.
‘खरेच आहे तुझे. प्रणवसारखे खूप जण असतात ज्यांच्या बँक खात्यात १० तारखेलाच खडखडाट होतो. मग क्रेडिट कार्ड असतेच खर्च करायला.’
‘सर, अनिता म्हणते ते काही सगळेच खरं नसतं. आम्ही आजच लिहून काढतो आमचा मासिक हिशेब आणि आमचे नेट वर्थ किती आहे ते. एमबीएला तुम्ही आम्हाला कंपनीचे नेट वर्थ कसे काढायचे ते शिकवल्याचे आठवतंय आम्हाला. तशाच पद्धतीने आम्ही आमचे पर्सनल बॅलन्सशीट मांडू शकतो. त्यातली एक बाजूला आमची मालमत्ता आणि दुसऱ्या बाजूला आमची देणी म्हणजे आम्ही घेतलेले कर्ज. यातला फरक म्हणजे आमचे नेट वर्थ.’ फिनान्शियल मॅनेजमेंटमधले महत्त्वाचे मुद्दे प्रणवच्या लक्षात होते हे त्याने आवर्जून सांगितले. ‘चला तर मग सुरुवात करा आजपासूनच. अजून एक महत्त्वाचा मुद्दा. आर्थिक नियोजन म्हणजे काही फक्त गुंतवणूक नाही तर त्यात २) इच्छापत्र (मालमत्ता व्यवस्थापन) ३) जोखीम संरक्षण (विमा) आणि ४) करनियोजन हे पण अजून ३ घटक आहेत. या चारही घटकांचा एकमेकांशी जवळचा संबंध असल्याने या सर्वांचा एकत्रित विचार तुम्ही केला पाहिजे. अर्थनियोजनातील पुढच्या पायऱ्यांची माहिती आणि आर्थिक उद्दिष्टे ठरवताना कुटुंबातील सर्वांच्या (मुले, आई-वडील) गरजा (needs) आणि आकांक्षा (Aspirations) यांचा विचार करून कशी करायची, याची माहिती पुढच्या वेळी घेऊ.
(अर्थसल्लागार)

Web Title: Start investing to get rich

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.