Lokmat Money > बिझनेस न्यूज > निर्यातीच्या घसरणीला सहा महिन्यांनी पूर्णविराम

निर्यातीच्या घसरणीला सहा महिन्यांनी पूर्णविराम

विशेष म्हणजे देशात कोविडची साथ सुरू होण्यापूर्वी असलेल्या निर्यातीच्या दरापेक्षा हा दर अधिक आहे. यावरून भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा पूर्वपदावर येऊ लागल्याची चिन्हे दिसत असल्याचे गोयल यांनी स्पष्ट केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2020 06:14 AM2020-10-03T06:14:27+5:302020-10-03T06:15:00+5:30

विशेष म्हणजे देशात कोविडची साथ सुरू होण्यापूर्वी असलेल्या निर्यातीच्या दरापेक्षा हा दर अधिक आहे. यावरून भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा पूर्वपदावर येऊ लागल्याची चिन्हे दिसत असल्याचे गोयल यांनी स्पष्ट केले.

Six months after the decline in exports | निर्यातीच्या घसरणीला सहा महिन्यांनी पूर्णविराम

निर्यातीच्या घसरणीला सहा महिन्यांनी पूर्णविराम

नवी दिल्ली : कोविडच्या साथीमुळे अर्थव्यवस्थेला लागलेला ब्रेक आता निघत असून, अर्थव्यवस्था प्रगती करू लागल्याची चिन्हे आहेत. गेली ६ महिने सातत्याने कमी होत असलेली देशाची निर्यात सप्टेंबर महिन्यात वाढली आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी ही घोषणा केली. गोयल यांनी सांगितले की, सप्टेंबर महिन्यात देशाची निर्यात वार्षिक निर्यातीच्या प्रमाणात ५.२७ टक्क्यांनी वाढली आहे. या महिन्यात २७.४ अब्ज डॉलरची निर्यात केली गेली आहे.

विशेष म्हणजे देशात कोविडची साथ सुरू होण्यापूर्वी असलेल्या निर्यातीच्या दरापेक्षा हा दर अधिक आहे. यावरून भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा पूर्वपदावर येऊ लागल्याची चिन्हे दिसत असल्याचे गोयल यांनी स्पष्ट केले. टिष्ट्वटरवर केलेल्या एका टिष्ट्वटमध्ये गोयल यांनी म्हटले आहे की, मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड या कार्यक्रमांतर्गत देशाची निर्यात वाढावी यासाठी प्रयत्न सुरू असून, त्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. मागील वर्षाच्या सप्टेंबर महिन्यामध्ये भारताने २६.०२ अब्ज डॉलरची निर्यात केली होती. त्यामध्ये यावर्षी ०.३८ अब्ज डॉलरने वाढ झाली आहे. याचाच अर्थ निर्यातीत ५.२७ टक्के एवढी वाढ झाली आहे. मार्च महिन्यापासून कोविडच्या साथीमुळे जगभरातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन सुरू झाल्याने सर्वच अर्थव्यवस्था ठप्प झाल्या होत्या. त्याचा परिणाम देशाच्या आयात व निर्यात या दोन्ही क्षेत्रांवर पडला होता. मार्च महिन्यापासून देशाची निर्यात ही सातत्याने कमी होत असल्याचे दिसून आले आहे. चालू आर्थिक वर्षाच्या सहा महिन्यांनंतर आता निर्यात वाढू लागल्याने अर्थव्यवस्था लवकरच रुळावर येण्याची आशा वाटू लागली आहे.
भारतीय व्यापार संवर्धन परिषदेचे (टीपीसीआय)चे अध्यक्ष मोहित सिंगला यांनी सांगितले की, जगातील अनेक देशांमधून लॉकडाऊन हे मागे घेतले जात असून, आर्थिक व्यवहार पुन्हा सुरू होऊ लागले आहेत. याचा परिणाम म्हणून परदेशातून भारतीय वस्तूंना मागणी मिळू लागली आहे. त्यामुळे देशाची निर्यात वाढू लागल्याचे चित्र आता दिसत आहे. या पुढील काळातही मोठ्या प्रमाणात आॅर्डर येऊन निर्यात वाढेल, अशी आशा सिंगला यांनी व्यक्त केली आहे.

निर्यातदारांची शिखर संस्था असलेल्या फियोचे अध्यक्ष शरद कुमार सराफ यांनी निर्यातवाढीबद्दल आनंद व्यक्त केला आहे. जगातील अनेक देशांमध्ये चीनबद्दल असलेल्या रागातून भारताला अधिक आॅर्डर मिळत असल्याचे मतही सराफ यांनी व्यक्त केले.

चालू आर्थिक वर्षात पेट्रोलियम, चामड्याच्या वस्तू, इंजिनिअरिंग उत्पादने, रत्न व दागिने या प्रमुख क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले आहे. सप्टेंबर महिन्यातही या क्षेत्रांमधून निर्यातीत वाढ झालेली नाही.
कृषी व अन्नप्रक्रिया या २ उद्योगांकडून निर्यातीमध्ये मोठी वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. गतवर्षीपासून देशातील अन्नधान्याचे उत्पादन वाढले असल्याने हे क्षेत्र निर्यातीत वाढ करण्यासाठी हातभार लावू शकते.
कोविडच्या साथीपासून चीनबद्दल जगातील अनेक देशांमध्ये रागाची भावना आहे. त्यामुळे चीनमधील उत्पादने मागविणे बंद करण्याकडे अनेकांचा कल आहे. याचा फायदा भारतातील उद्योगांना मिळून निर्यात वाढू शकते.

Web Title: Six months after the decline in exports

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.