lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Share Market: अचूक शेअर निवडण्याचा 'फंडा'; कंपनीचे 'फंडामेंटल' पाहून 'गणित' मांडा! 

Share Market: अचूक शेअर निवडण्याचा 'फंडा'; कंपनीचे 'फंडामेंटल' पाहून 'गणित' मांडा! 

फंडामेंटल जाणून घेतल्याने, अमूक एका कंपनीत गुंतवणूक करावी, असलेली गुंतवणूक वाढवावी, कमी करावी की आहे तितकीच ठेवावी, याबाबत निर्णय घेता येऊ शकतो.

By पुष्कर कुलकर्णी | Published: December 14, 2021 06:50 PM2021-12-14T18:50:40+5:302021-12-14T18:54:08+5:30

फंडामेंटल जाणून घेतल्याने, अमूक एका कंपनीत गुंतवणूक करावी, असलेली गुंतवणूक वाढवावी, कमी करावी की आहे तितकीच ठेवावी, याबाबत निर्णय घेता येऊ शकतो.

Share Market: Look at the company fundamentals to select stocks and earn profit | Share Market: अचूक शेअर निवडण्याचा 'फंडा'; कंपनीचे 'फंडामेंटल' पाहून 'गणित' मांडा! 

Share Market: अचूक शेअर निवडण्याचा 'फंडा'; कंपनीचे 'फंडामेंटल' पाहून 'गणित' मांडा! 

>> डॉ. पुष्कर कुलकर्णी

मागील भागात आपण डिव्हीडंड / बोनस शेअर / स्टॉक  स्प्लिट म्हणजे काय हे जाणून घेतलं. आजच्या भागात शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजेच 'फंडामेंटल' याबाबत जाणून घेऊ. 

फंडामेंटल म्हणजे नेमकं काय? 
कंपनीचा व्यवसाय, उलाढाल, नफा आणि कंपनीबद्दल अशा सर्व गोष्टी जाणून घेणं, ज्या थेट तिच्या शेअरच्या भावाशी निगडित असतात, यास फंडामेंटल असं म्हणतात. शेअरचा भाव कंपनीच्या कामगिरीनुसार योग्य आहे की कमी आहे किंवा जास्त आहे या गोष्टी फंडामेंटलमुळे अवगत होतात. 

फंडामेंटल जाणून घेतल्याने, अमूक एका कंपनीत गुंतवणूक करावी, असलेली गुंतवणूक वाढवावी, कमी करावी की आहे तितकीच ठेवावी, याबाबत निर्णय घेता येऊ शकतो. दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी कंपनी फंडामेंटल वेळोवेळी जाणून घेणे अत्यंत आवश्यक असते. 

'फंडामेंटल'मध्ये काय काय पाहावे? 
कंपनीच्या फंडामेंटल्समध्ये खालील गोष्टी आवर्जून पाहाव्यात आणि त्याचा अभ्यास करावा. 

१. तिमाही निकाल : प्रत्येक कंपनीस तिचा तिमाही निकाल जाहीर करावा लागतो. वर्षात एप्रिल - जून / जुलै - सप्टेंबर / ऑक्टोबर - डिसेंबर आणि जानेवारी - मार्च अशा एकूण चार तिमाही असतात. कंपनी निकाल जाहीर करण्याची तारीख सेबीला कळवते. तिमाही निकालात एकूण उलाढाल, विक्री, करपूर्व नफा आणि करपश्चात नफा ही आकडेवारी जाणून घ्यावी. यात मागील तिमाही आणि मागील वर्षीची त्याच कालावधीची तिमाही याच्याशी वर्तमान निकालाची आकडेवारी तपासून पाहावी. यावरून कंपनीची कामगिरी कशी सुरू आहे, हे जाणून घेता येते. 

२. वार्षिक निकाल - वार्षिक निकाल आर्थिक वर्ष (३१ मार्च रोजी) संपल्यावर जाहीर केला जातो. कंपनीतर्फे निकाल कोणत्या तारखेला जाहीर केला जाणार आहे, याची तारीख कळविली जाते. या निकालात ज्या पद्धतीने तिमाही निकालाचा अभ्यास केला जातो, त्याचप्रमाणे उलाढाल, विक्री, करपूर्व आणि करपश्चात नफा (तोटा) याचा अभ्यास करणे आवश्यक असते. तसेच ईअर ऑन ईअर कंपनीची उलाढाल, व्यवसाय, फायदा / तोटा, कंपनीच्या असेट्स, कंपनीची कर्जं ही आकडेवारीसुद्धा जाणून घ्यावी. यातून कंपनीचे कामकाज कसे सुरू आहे हे लक्षात येते. 

३. पी. ई. रेशो (PE ratio) - प्राईस अर्निंग रेशो -  शेअरचा  बाजार भाव (market rate) भागिले अर्निंग पर शेअर (EPS) म्हणजेच पी. ई. रेशो. हा रेशो जितका जास्त तितकी शेअरची किंमत तुलनात्मक महाग असे समजले जाते. परंतु, काही कंपन्यांचा कारभार अत्यंत उत्तम चालतो आणि अशा कंपनीच्या शेअर्सला मागणी जास्त असते म्हणून पी. ई. रेशो जास्त पाहावयास मिळतो. शेअर्सला मागणी वाढली आणि तो ओव्हर बॉट झोन (उच्चतम खरेदी पातळीवर) मध्ये गेला तर पी. ई. रेशो जास्त दिसतो. इथूनच जर विक्रीचा मारा सुरू झाला तर भाव खाली येतात आणि त्यानुसार पी. ई. रेशो खाली आलेला दिसतो. 

४. EPS (अर्निंग पर शेअर) - कंपनीचा प्रतिशेअर नफा जे दर्शविते ते म्हणजे अर्निंग पर शेअर. कंपनीचा एकूण नफा (company profit)  भागिले एकूण शेअर्स वजा डिव्हीडंड रक्कम  (Total outstanding shares - Dividend amount). सोप्या भाषेत सांगायचे तर जितका जास्त ईपीएस तितका कंपनीचा नफा जास्त. आता नफा जास्त म्हणजे शेअर्सला अधिक मागणी. याचाच अर्थ पी. ई. रेशो सुद्धा अधिक. 

५. शेअर होल्डिंग पॅटर्न - फंडामेंटलमध्ये हा एक महत्त्वाचा घटक आहे. यामध्ये कंपनीचे शेअरधारक आणि त्यांची विभागणी नेमकी कशी आहे ते समजते. हा पॅटर्न खालील प्रमाणे असतो. 

१. प्रमोटर्स - कंपनीचे प्रवर्तक म्हणजेच प्रमोटर्स. त्यांचा हिस्सा सर्वात जास्त असतो. सर्वसाधारण ५१% ते ७५% इतका हिस्सा प्रवर्तकांकडे असतो. 
२. विदेशी गुंतवणूकदार (FIIs) - विदेशी गुंतवणूकदार भारतीय कंपन्यांमध्ये पैसे गुंतवू शकतात. कंपनीच्या एकूण भागभांडवलामध्ये हा हिस्सा जास्तीत जास्त २२% पर्यंत असू शकतो. 
३. म्युच्युअल फंड्स - (Mutual funds) - जे गुंतवणूकदार थेट शेअर बाजारात गुंतवणूक करीत नाहीत, परंतु सामान्य गुंतवणुकीपेक्षा जास्त परतावा अपेक्षित असतो ते म्युच्युअल फंड्सच्या माध्यमातून रक्कम बाजारात गुंतवत असतात. म्युच्युअल फंड्स कंपन्यांकडे बाजार विशेष तज्ज्ञ असतात, जे नियमित अभ्यास करून विविध कंपन्यांमध्ये गुंतवणूक करीत असतात. याचे प्रमाणही फंडामेंटलमध्ये आपल्याला दिसते. 
४. घरेलू गुणवणूकदार (DIS)- भारतीय वित्तीय संस्था आणि मोठे गुंतवणूकदार यांना घरेलू गुंतवणूकदार (डोमेस्टिक इन्व्हेस्टर्स ) असे म्हणतात. या कंपन्या बाजारात अनेक कंपन्यांमध्ये पैसे गुंतवत असतात. अशा घरेलू गुंतवणूकदार कंपन्यांचा एकूण शेअर भागभांडवलात किती हिस्सा आहे हे फंडामेंटल अभ्यासात समजते.  
५. विमा कंपन्या (Insurance companies) - आयुर्विमा तसेच इतर सर्व प्रकारच्या संस्था थेट शेअर बाजारात पैसे गुंतवतात. प्रत्येक विमा कंपनीकडे बाजाराची जाण आणि अभ्यास असेलेल्या व्यक्ती असतात, जे नियमितपणे निर्णय घेत असतात की कोणत्या शेअर्समध्ये रक्कम गुंतवायची आणि कोणत्या शेअर्समधून रक्कम काढायची. 
६. इतर सर्वसाधारण (Non Institutional) - ज्या संस्था नाहीत असे सर्व या प्रकारात मोडतात. जसे सर्वसामान्य गुंतवणूकदार ज्यांना आपण रिटेल इन्व्हेस्टर्स असे म्हणतो असे सर्व. 

वरील ६ घटक महत्त्वाचे आहेत. त्यांची हिस्सेदारी प्रत्येक तिमाहीत कमी-जास्त होत असते. याचा अभ्यास फंडामेंटलच्या माध्यमातून केल्यास नव्याने गुंतवणूक करावी की आहे ती गुंतवणूक काढून घ्यावी याचा योग्य निर्णय घेणे शक्य होते. 

फंडामेंटलमध्ये अजूनही काही घटक आहेत. परंतु, वरील महत्त्वाच्या घटकांचा नियमित अभ्यास केल्यास ज्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये आपले पैसे गुंतविले आहेत, त्याबाबत योग्य निर्णय घेण्यास नक्कीच मदत होईल. 

पुढील भागात टेक्निकल / चार्ट्स आणि सपोर्ट लेवल म्हणजे काय ते जाणून घेऊ. (क्रमशः)

हेही वाचाःडिव्हीडंड अन् बोनस शेअर कधी दिले जातात?; स्टॉक स्प्लिट म्हणजे काय?.. जाणून घ्या!

हेही वाचाःअप्पर सर्किट आणि लोअर सर्किट म्हणजे काय?; ते कधी, कशामुळे लागतं?

हेही वाचाः IPO म्हणजे काय रे भाऊ?; 'लिस्टिंग'च्या वेळची किंमत कशी ठरते?.. वाचा! 

Web Title: Share Market: Look at the company fundamentals to select stocks and earn profit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.