Home Loan : आजच्या नोकरदार जीवनातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, दरमहा भाडे देत राहावे की गृहकर्ज घेऊन घर खरेदी करावे आणि ईएमआय भरावा. बहुतेक लोकांना वाटतं की ईएमआय भरणे म्हणजे आपली मालमत्ता तयार करणे आणि भाडे भरणे म्हणजे निव्वळ खर्च करणे. पण, या दोन पर्यायांमधील खरे आर्थिक गणित तुम्हाला अचंबित करू शकते. सामान्यतः, 'भाड्याने राहण्यापेक्षा EMI भरून स्वतःचे घर घ्या' असा सल्ला दिला जातो. ऐकायला ही गोष्ट खूप आकर्षक वाटत असली तरी, या विचारामागे काही छुपे आर्थिक धोके आहेत, जे मध्यमवर्गीयांसाठी भविष्यात अडचणी निर्माण करू शकतात.
EMI चे मोठे बंधन आणि आर्थिक स्वातंत्र्य
विचार करा, जर तुम्हाला १५ ते २० वर्षे एकच मोठा ईएमआय भरावा लागला आणि मध्येच नोकरी बदलणे, शहर बदलणे किंवा उत्पन्न कमी होणे अशा समस्या आल्या तर? ईएमआयचे हे बंधन तुमची आर्थिक स्वातंत्र्य संपवून टाकू शकते. भाड्याने राहिल्याने जागा किंवा शहर बदलताना तुमच्यावर कोणताही दबाव येत नाही. भाडेकरू असल्याने तुम्हाला नोकरी बदलण्याचे, नवीन व्यवसाय सुरू करण्याचे किंवा करिअरमध्ये जलद निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य मिळते. याउलट, EMI तुम्हाला एकाच शहरात किंवा एकाच आर्थिक निर्णयात बांधून टाकते.
भाडे आणि EMI चा खरा खर्च
अनेकांना वाटतं की कर्जाचा हप्ता भरणे हे भाडे देण्यासारखेच आहे. पण, आकडेवारी काहीतरी वेगळेच सांगते. दीर्घ मुदतीच्या गृहकर्जात तुम्ही भरलेले व्याज हे मूळ रकमेपेक्षा अनेक वेळा जास्त असते. उदाहरणार्थ तुम्ही जर ८० ते ९० लाख रुपयांचे घर घेतले, तर २० वर्षांच्या कालावधीत तुम्ही ते पूर्ण फेडता फेडता १.६ ते १.७ कोटी रुपये खर्च केलेले असतात. हा मोठा फरक लोकांना नंतर समजतो, जेव्हा खूप उशीर झालेला असतो. ईएमआयचा हा मोठा बोजा आर्थिक खर्चासोबतच एक मानसिक ताण देखील बनतो, जो वयोमानानुसार वाढत जातो.
तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला
- आर्थिक तज्ज्ञांच्या मते, घर खरेदीचे नियोजन करताना खूप विचारपूर्वक निर्णय घ्यावा.
- जर तुमची आर्थिक परिस्थिती स्थिर नसेल किंवा तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये लवचिकता हवी असेल, तर भाडे देणे हा जास्त शहाणपणाचा आणि सुरक्षित पर्याय ठरू शकतो.
- भाड्याने राहून, तुम्ही जी रक्कम EMI मध्ये घालवणार आहात, ती योग्य ठिकाणी गुंतवून दीर्घकाळात मोठी संपत्ती निर्माण करू शकता.
वाचा - तुमचं गृहकर्ज, वाहन कर्ज स्वस्त होणार? आरबीआय डिसेंबरमध्ये रेपो दरात २५ बेसिस पॉईंटची कपात करणार?
भाडे देणे म्हणजे पैसा वाया घालवणे नाही, तर ते आर्थिक लवचिकता आणि स्वातंत्र्य कायम राखण्याचा एक मार्ग आहे. घर खरेदीचा निर्णय घेताना भाड्याचा खर्च आणि ईएमआयच्या एकूण खर्चाची तसेच तुमच्या भविष्यातील गरजांची योग्य तुलना करणे अत्यंत आवश्यक आहे.
