Retirement Planning : निवृत्तीनंतर प्रत्येकाला आपले उर्वरित आयुष्य सुरक्षित आणि आर्थिक चिंतामुक्त हवे असते. अशा लोकांसाठी एलआयसीची न्यू जीवन शांती योजना एक उत्तम पर्याय ठरत आहे. ही योजना विशेषतः अशा व्यक्तींसाठी तयार करण्यात आली आहे, ज्यांना कोणतेही जोखमीशिवाय आयुष्यभरासाठी पेन्शनची हमी हवी आहे.
LIC न्यू जीवन शांती योजना काय आहे?
ही योजना एक सिंगल प्रीमियम ॲन्युइटी प्लॅन आहे. याचा अर्थ, तुम्हाला फक्त एकदाच मोठी रक्कम गुंतवावी लागते आणि त्यानंतर तुम्हाला आयुष्यभरासाठी पेन्शनची हमी मिळते. एकदा गुंतवणूक केल्यानंतर लगेचच तुम्हाला भविष्यातील पेन्शनची निश्चिती मिळते. तुम्ही मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक अशा कोणत्याही पद्धतीने पेन्शन घेण्याचा पर्याय निवडू शकता. जर एखाद्या व्यक्तीने १० लाख रुपयांची गुंतवणूक केली, तर त्याला निवृत्तीनंतर अंदाजे प्रति वर्ष १ लाख रुपयांपेक्षा जास्त पेन्शन मिळू शकते. वृद्धापकाळात आर्थिक तणावापासून दूर राहू इच्छिणाऱ्यांसाठी हा एक मोठा फायदा आहे.
गुंतवणूक आणि पात्रतेचे निकष
या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी किमान रक्कम १.५ लाख रुपये आहे, तर गुंतवणुकीची जास्तीत जास्त मर्यादा नाही. ३० ते ७९ वर्षांच्या दरम्यानचा कोणताही व्यक्ती ही पॉलिसी खरेदी करू शकतो.
दोन मुख्य पेन्शन पर्याय
तत्काळ पेन्शन : या पर्यायात गुंतवणूक केल्याबरोबर लगेच पेन्शन सुरू होते.
स्थगित पेन्शन : यात गुंतवणूक केल्यानंतर ठरलेल्या कालावधीनंतर (उदा. ५, १० किंवा १५ वर्षांनी) पेन्शन सुरू होते.
गुंतवणुकीवर परताव्याचे उदाहरण
समजा, एका ५५ वर्षांच्या व्यक्तीने ११ लाख रुपये गुंतवले आणि ५ वर्षांसाठी पेन्शन स्थगित ठेवण्याचा पर्याय निवडला. तर ५ वर्षांनंतर, म्हणजे ६० व्या वर्षापासून त्या व्यक्तीला दरवर्षी सुमारे १,०२,८५० रुपयांची पेन्शन मिळू शकते.
वाचा - STP ही एसआयपीपेक्षा वेगळी कशी? काय आहेत फायदे-तोटे? कुणासाठी आहे बेस्ट?
दोन प्रकारचे 'लाइफ ऑप्शन'
सिंगल लाईफ : या पर्यायात फक्त पॉलिसीधारकाला पेन्शन मिळते.
जॉईंट लाईफ : यामध्ये पती-पत्नी दोघांनाही पेन्शन मिळते. पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर, जमा केलेली संपूर्ण रक्कम नॉमिनीला परत केली जाते.
ही योजना निवृत्तीनंतरच्या जीवनासाठी आर्थिक स्थिरता आणि सुरक्षितता प्रदान करणारा एक महत्त्वाचा आधारस्तंभ ठरू शकते.
