EPFO Rule : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना योजना केवळ बचतीचे साधन नाही, तर उतारवयात आर्थिक आधार देणारी महत्त्वाची योजना आहे. अनेक कर्मचाऱ्यांना वाटते की त्यांच्या वेतनातून फक्त १२ टक्के योगदान कपात करण्याची 'लक्ष्मण रेषा' आहे, पण हे पूर्णपणे सत्य नाही. नियमांच्या चौकटीत राहून तुम्ही तुमच्या ठरलेल्या मर्यादेपेक्षा जास्त पैसे देखील जमा करू शकता.
ईपीएफओने कर्मचाऱ्यांच्या या गोंधळाला दूर करण्यासाठी काही स्पष्ट नियम सांगितले आहेत. जर तुम्हालाही तुमचे निवृत्तीचे नियोजन अधिक मजबूत करायचे असेल, तर योगदानाची मर्यादा आणि त्यासंबंधित खास तरतुदी समजून घेणे आवश्यक आहे.
१२ टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते?
होय. EPFO नियमांनुसार, कोणताही कर्मचारी आपल्या इच्छेनुसार 'स्वैच्छिक योगदाना'द्वारे १२ टक्क्यांच्या सामान्य कपातीपेक्षा जास्त रक्कम जमा करू शकतो. हे पूर्णपणे कर्मचाऱ्याच्या इच्छेवर अवलंबून असते. यामुळे तुमची निवृत्तीची बचत वेगाने वाढते. तसेच, ईपीएफ वर मिळणारे चक्रवाढ व्याज देखील या वाढलेल्या रकमेवर लागू होते, ज्यामुळे दीर्घकाळात एक मोठा फंड तयार होतो.
कंपनी किती योगदान देणार?
जरी तुम्ही तुमच्या वेतनातून १२ टक्क्यांहून अधिक कपात करण्याचा निर्णय घेतला, तरीही तुमचा नियोक्ता म्हणजेच तुमची कंपनी यासाठी बाध्य नाही. नियमानुसार, कंपनी फक्त कायदेशीर दर म्हणजेच १२ टक्क्यांपर्यंतच त्यांचे योगदान देण्यासाठी जबाबदार आहे. याचा अर्थ, अतिरिक्त जमा केलेला पैसा फक्त तुमच्या पगारातून जाईल, कंपनी तेवढीच रक्कम 'मॅचिंग' करणार नाही.
जास्त पगार असलेल्यांसाठी काय आहे अट?
साधारणपणे, ईपीएफ योगदानाची गणना १५,००० रुपयांच्या वेतन मर्यादेवर आधारित असते. पण जर तुमचा पगार या मर्यादेपेक्षा जास्त असेल आणि तुम्हाला तुमचा पीएफ तुमच्या 'वास्तविक पगारावर' कापायचा असेल, तर त्यासाठी एक विशेष प्रक्रिया करावी लागते.
वाचा - इलॉन मस्कची 'SpaceX' रचणार इतिहास! कंपनीचे मूल्य ७२ लाख कोटींवर पोहोचणार? OpenAI चा रेकॉर्ड मोडणार
जर कर्मचाऱ्याचा पगार १५,००० रुपयांपेक्षा जास्त असेल आणि त्याला संपूर्ण पगारावर पीएफ कपात हवी असेल, तर केवळ अर्ज देऊन काम चालणार नाही. ईपीएफ स्कीमच्या पॅरा २६(६) अंतर्गत, यासाठी असिस्टंट प्रॉव्हिडंट फंड कमिशनर किंवा रिजनल प्रॉव्हिडंट फंड कमिशनर यांची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे. ही परवानगी मिळाल्यानंतरच तुम्ही तुमच्या संपूर्ण पगारावर पीएफ योगदान सुरू करू शकता, ज्यामुळे भविष्यात क्लेम करताना कोणतीही अडचण येत नाही.
