predict the next Indian Prime Minister and get a discount on your dinner by Zomato | कोण होणार पंतप्रधान? उत्तर द्या अन् मिळवा या कंपनीने दिलेली मोठी ऑफर
कोण होणार पंतप्रधान? उत्तर द्या अन् मिळवा या कंपनीने दिलेली मोठी ऑफर

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर सर्वांचे लक्ष आता देशाच्या निकालाकडे लागलेले आहे. विविध एक्झिट पोलच्या माध्यमातून अंदाज वर्तविण्यात येत असले तरी प्रत्यक्ष निवडणुकीच्या निकालांसाठी 23 मेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. मात्र देशात सत्ता कोणाची येणार? पुढील पंतप्रधान कोण असणार? या प्रश्नांची उत्तरे देणाऱ्या ग्राहकांसाठी ऑनलाइन फूड डिलीव्हरी कंपनी Zomato ने अनोखी ऑफर आणली आहे. 

झोमेटोने इलेक्शन लीग ऑफर लॉन्च केली आहे. या ऑफरमध्ये तुम्हाला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर द्यावं लागणार आहे. यामध्ये तुम्हाला निकालाची भविष्यवाणी वर्तवावी लागणार आहे. जर ही भविष्यवाणी खरी ठरली तर तुम्हाला कंपनीकडून बंपर ऑफर मिळेल. देशाचा पंतप्रधान कोण होणार? या प्रश्नाचे तुम्ही उत्तर दिलं आणि ते उत्तर खरे ठरले तर Zomato वरुन तुम्ही ऑर्डर केलेल्या फूडच्या दरात 40 टक्के सूट आणि 30 टक्के कॅशबॅक देण्यात येईल. 

पुढील पंतप्रधान कोण असेल याचं उत्तर तुम्हाला 22 मे पर्यंत द्यायचं आहे. त्यानंतर निकाल 23 मे रोजी लागल्यानंतर तुम्हाला कॅशबॅक ऑफर दिली जाईल. या ऑफरचा लाभ घेण्याबाबत Zomato अ‍ॅपमध्ये पर्याय उपलब्ध असतील. त्या पर्यायात तुम्हाला नरेंद्र मोदी, राहुल गांधी आणि अन्य असा पर्याय देण्यात आलेला आहे. आयपीएल दरम्यानही झोमेटोने अशाप्रकारे ऑफर दिली होती. 

१७ व्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला स्पष्ट बहुमत मिळून देशात पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच सरकार सत्तेवर येईल, यावर रविवारी प्रसिद्ध झालेल्या विविध मतदानोत्तर जनमत चाचण्यांमच्या (एक्झिट पोल) अंदाजांमध्ये एकवाक्यता दिसून आली. 23 मे रोजी लोकसभा निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. मात्र त्याआधी विविध चॅनेल आणि दैनिकांनी सर्व्हेच्या माध्यमातून जनतेचा जाणून घेतलेला लोकसभेचा मूड यावरुन निवडणूक निकालांचे अंदाज बांधण्यात येतात. निवडणूक निकालांच्या या सर्व्हेवरून देशात कोणाचं सरकार येणार हे सांगितले जाते. मध्य प्रदेश, राजस्थान, गोवा, गुजरात, छत्तीसगड आणि महाराष्ट्रात भाजपाला मोठ्या प्रमाणात जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. Web Title: predict the next Indian Prime Minister and get a discount on your dinner by Zomato
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.