विनेशचंद्र मांडवकर, विनायक येसेकर, चंद्रपूर - राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने सुमारे १० वर्षांपूर्वी संशोधित केलेल्या ‘फुले त्रिवेणी’ या प्रजातीच्या संकरित गायीच्या धर्तीवर ‘नंदोरी त्रिवेणी’ या गायीचा शोध लागला आहे. भद्रावती तालुक्यातील नंदोरी येथील युवा पशुधन पर्यवेक्षक डॉ. राहुल घिवे यांना तब्बल साडेसहा वर्षांच्या अथक परिश्रमानंतर हा शोध घेण्यात यश मिळविले आहे.कृत्रिम रेतनातून हा शोध लावण्यात या डॉक्टरांना यश आले आहे. गीर, जर्सी आणि होलस्टन या तीन प्रजातींतून हे त्रिवेणी प्रजातीचे वासरू जन्मास आले आहे. गीर प्रजात भरपूर दूध देणारी आणि उष्ण वातावरणात टिकणारी आहे, तर होलस्टन ही प्रजात सर्वात अधिक दूध देणारी आणि रोगप्रतिकारक म्हणून देशात ओळखली जाते. या तिन्ही संकरातून जन्मास आलेली प्रजात शेतकऱ्यांना वरदान ठरू शकते, असा विश्वास डॉ. घिवे यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्रातील त्रिवेणी संगमातून जन्मास घातलेली ही केवळ दुसरी गाय असल्याचा त्यांचा दावा आहे. नंदोरी या गावात ही प्रजात जन्मास आल्याने ‘नंदोरी त्रिवेणी’ असे नाव ठेवण्यात आल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
युवा पशुधन पर्यवेक्षकाने शोधली ‘नंदोरी त्रिवेणी’ गाय
By admin | Updated: January 12, 2015 23:34 IST