Join us  

मोदी पुन्हा जिंकल्यास वित्तमंत्री कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 4:45 AM

जेटली की गोयल ? : देशाच्या अर्थव्यवस्थेला उभारी देणाऱ्या वित्तमंत्र्याची गरज

नवी दिल्ली : मतदानोत्तर चाचणीच्या अंदाजानुसार निवडणुकीचे निकाल आल्यानंतर नरेंद्र मोदी पुन्हा लोकसभेची निवडणूक जिंकल्यास कर्जाचा बोजा न वाढता अर्थव्यवस्थेला उभारी देणाºया वित्तमंत्र्याची त्यांना गरज लागेल. अरुण जेटली यांचा वित्तमंत्रीपद कायम राखण्याचा इरादा पक्का असला तरी त्यांच्या प्रकृतीचा विचार केल्यास विद्यमान रेल्वे आणि कोळसामंत्री पीयूष गोयल यांची वित्तमंत्रीपदी वर्णी लागू शकते.

अलीकडच्या काळात तेलाच्या भडकलेला भाव, २०१८ च्या अखेरीस पाच तिमाहीतील वृद्धीदर ६.६ टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील खप कमी होण्याची आणि इंधनाचे दर भडकतील, परिणामी वृद्धीची वाटचाल आणखी बिकट होईल,अशी भीती अर्थतज्ज्ञांनावाटते.केंद्रात मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार आले, तर भावी वित्तमंत्री कोण असतील? हे यथावकाश कळेलच.रेल्वे आणि कोळसामंत्री पीयूष गोयल यांच्याकडे भावी वित्तमंत्री म्हणून पाहिले जाते. जेटली आजारी असताना त्यांनी मोदी सरकारमध्ये दोनदा वित्तमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली होती. स्टेट बँक आॅफ इंडिया आणि बँक आॅफ बडोदाच्या संचालक मंडळावरही ते होते. ते चार्टर्ड अकाऊंटंट असून, सरकारचा शेवटचा अंतरिम अर्थसंकल्प त्यांनी सादर केला होता. भाजप पुन्हा सत्तेत आल्यास त्यांनी पगारदार वर्गासाठी आणखी कर सवलत देण्याचे सुतोवाच केले होते.

केअर रेटिंगचे मुख्य अर्थतज्ज्ञ मदन सबनवीस म्हणाले की, वित्तमंत्री कोण असेल, हे महत्त्वाचे नाही. कारण सर्व मोठे निर्णय पंतप्रधान कार्यालयातूनच घेतले जातात.

अनेक विधेयके मंजूर करून घेतलीअरुण जेटली हे विद्यमान वित्तमंत्री असून, व्यवसायाने वकील आहेत. मोदी सरकारमधील महत्त्वाचे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी अनेक वेळा संकटमोचकाची भूमिका यशस्वीपणे पार पाडली आहे. मागच्या पाच वर्षांत जेटली यांनी संसदेत महत्त्वाची आर्थिक विधेयके मंजूर करून घेतली.याशिवाय तब्बल दोन दशके रेंगाळत पडलेला वस्तू-सेवा कर (जीएसटी) लागू करण्याचे श्रेयही त्यांना जाते, तसेच तिहेरी तलाक प्रथा रद्द करण्यासंबंधी जोरदार युक्तिवाद करून सरकारची भूमिका किती रास्त आहे, हे पटवून देण्याचाही प्रयत्न केला. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांतील खासदारांशी त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत.संसदेत आणि संसदेबाहेर प्रभावी वक्ता म्हणून ते परिचित आहेत. त्यांच्या या व्यक्तिमत्त्वामुळेच मोदी यांनी त्यांच्यावर तीन मंत्रालयांची जबाबदारी सोपविली होती. प्रकृती अस्वस्थ्यामुळे फेब्रुवारीत त्यांना लेखानुदान सादर करता आले नाही. त्यावेळी ते कर्करोगावर उपचार घेण्यासाठी अमेरिकेत उपचारासाठी गेले होते. मागच्या वर्षी मे महिन्यात त्यांच्यावर मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

टॅग्स :अरूण जेटलीपीयुष गोयल