‘करांवर कर नको’ म्हणून, उत्पादन शुल्क, सेवाकर आणि मूल्यवर्धित कर यांच्यासाठी स्वतंत्र प्रणाली तयार केलेली आहे. उत्पादन शुल्क व सेवाकर भरताना खरेदी केलेला कच्चा माल, भांडवली वस्तू व अंतर्भूत सेवा यावर भरावे लागणारे उत्पादन शुल्क व सेवाकर कागदोपत्री नोंदीत जमा म्हणून दाखवणे आणि आपले उत्पादन शुल्क अथवा सेवाकर भरताना त्याची वजावट घेणे यालाच ‘कच्चा मालाचे, भांडवली वस्तूंचे आणि अंतर्भूत सेवांचे क्रेडिट’ असे म्हणतात. १९८६ साली अस्तित्वात असलेली ‘मॉड व्हॅट’ ही संकल्पना पुढे सप्टेंबर २००४ पासून उत्पादन शुल्क व सेवाकरासाठी एकत्रित आणि परस्पर विनियोग करता येण्याजोगी झाली ज्याला अशी ‘सेनव्हट क्रेडिट /नियमावली २००४’ असे म्हणतात. मूल्यवर्धित कराच्या बाबतीत सुद्धा २००५ पासून खरेदीवस्तूवर भरावा लागणारा मूल्यवर्धित कर सेट आॅफ म्हणून विक्री किंमतीवर लावणाऱ्या मूल्यवर्धित करांतून वजावट घेता येईल अशी तरतूद करण्यात आली. थोडक्यात वस्तू खरेदी करताना भराव्या लागणाऱ्या करांची वस्तू विक्री करताना भराव्या लागणाऱ्या करामधून वजावट करता येणे म्हणजेच करावर कर नसणे. या प्रकारची सुविधा/ प्रणाली मात्र केवळ वर उल्लेख केलेल्या तीन करांसाठीच होती. तशीच आताही ती अस्तित्वात येणाऱ्या तीन करांसाठीच असणार आहे. (केंद्रीय वस्तू आणि सेवांवरील कर (सीजीएसटी), राज्यीय वस्तू आणि सेवांवरील कर (एसजीएसटी) येणाऱ्या वस्तू आणि सेवांवरील करांसाठी म्हणून या सुविधा/ प्रणालीला ‘अंतर्भूत कर के्रडिट’ असे म्हणले आहे. या सुविधा/ प्रणालीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे एखादी वस्तू/सेवा जोपर्यंत अंतिम ग्राहकापर्यंत त्याच्या वापरासाठी पोहचत नाही तोपर्यंत त्या वस्तू अथवा सेवेच्या प्रवाहात (उत्पादनापासून ते अंतिम ग्राहकापर्यंत) येणाऱ्या सर्व प्रकारच्या व्यावसायिकांसाठी या अंतर्भूत कर क्रेडिटचा फायदा घेता येणार आहे. उदाहरण दयायचे झाल्यास एखादा साबण उत्पादित झाल्यानंतर उत्पादकाने वितरकाला पाठविला. त्या वितरकाने पुढे तो किरकोळ व्यापाऱ्याला पाठविल्या, पुढे किरकोळ व्यापाऱ्याने दुकानदाराला पाठविला आणि शेवटी दुकानदाराने त्याची विक्री अंतिम ग्राहकाला केली यामध्ये उत्पादक ते वितरक, वितरक ते किरकोळ व्यापारी, किरकोळ व्यापारी ते दुकानदार आणि दुकानदार ते अंतिम ग्राहक या चार प्रवासी टप्प्यानंतर प्रत्येक वेळीस आधीच्या टप्प्यावर लावलेल्या कराची वजावट पुढच्या टप्प्याला लावाव्या लागणाऱ्या करातून घेता येईल. म्हणजेच अंतिम ग्राहकाला वस्तू मिळेपर्यंत फक्त मूल्यवर्धित किंमतीवरच कर लागेल.
करांवर कर नको म्हणजे काय?
By admin | Updated: January 24, 2017 00:45 IST