डिप्पी वांकाणी, मुंबई ग्राहकांची तोल-मापाच्या बाबतीत लुबाडणूक होणार नाही, यासाठी वैधमापनशास्त्र विभाग ठोस पावले उचलण्याच्या तयारीत आहे. ग्राहकांच्या वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर वैधमापनशास्त्र विभाग राज्यभरातील किराणा दुकानापासून ते थेट मॉलमधील वजनकाट्यांची (तराजु) नियमित तपासणी आणि मापांकन करण्यासाठी राष्ट्रीय परीक्षण केंद्रासोबत लवकरच करार करणार आहे. वजनकाट्यांचे मापांकन (कॅलिब्रेशन) केल्यानंतरच व्यापाऱ्यांना यापुढे वैधमापनशास्त्र विभागाकडून प्रमाणपत्र दिली जातील.व्यापारी, मॉलमधील दुकाने तसेच विमानतळावरील वजनकाट्यांची तपासणी वैधमापनशास्त्र विभागाकडून दोन वर्षांतून एकदा केली जाते; परंतु, मापन मानक पडताळणी (कॅलीब्रेशन/मापांकन) प्रक्रिया अत्यंत किचकट असते. यासाठी वेळही खूप लागतो. यांत्रिकी किंवा स्वयंचलित वजनकाट्यांच्या वेगवेगळ्या चाचण्या घेतल्या जातात. या चाचण्या यशस्वी पार पडल्यास या वजनकाट्याने होणारे मोजमाप अचूक असल्याचे प्रमाणित करण्यात येते, असे वैधमापनशास्त्र विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला सांगितले.वजनकाट्यांची मापन मानक पडताळणीची प्रक्रिया स्पष्ट करतांना सांगितले की, बिनचूक परीक्षण, फेरपरीक्षण आणि मध्य भूजक चाचणी (कॉर्नर्स टेस्ट) यासारखे विविध परीक्षण करण्यात येते. वजनकाटा रिकामा ठेऊन बिनचूक परीक्षण (झिरो एरर टेस्ट) करण्यात येते. फेरपरीक्षणात वेगवेगळ्या वजनमापे ठेऊन अनेकवेळा तोल-माप करण्यात येते.राष्ट्रीय परीक्षण केंद्रासोबत हा करार झाल्यानंतर राज्यभरातील सर्व लहान-मोठ्या व्यापारी प्रतिष्ठानांना या केंद्राकडून वजनकाट्यांचे मापांकन करून घ्यावे लागेल. एकूणच या मापांकनामुळे ग्राहकांच्या हित जोपासण्यात येईल, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.
वजनकाट्यांचे करणार मापांकन परीक्षण
By admin | Updated: April 1, 2015 02:03 IST