Join us  

सरकारी-खासगी बँक प्रमुखांच्या वेतनातील तफावत प्रचंड रुंदावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 5:22 AM

खासगीत दिवसाला २.४८ लाख तर सरकारी क्षेत्रात ८,५४१ रुपये

मुंबई : सरकारी बँका आणि खासगी बँका यांच्या प्रमुखांच्या वेतनातील तफावत मागील दोन वर्षांत आणखी रुंदावली आहे. वित्तवर्ष २0१९ मध्ये सरकारी बँकांच्या प्रमुखांचे दररोजचे सरासरी वेतन ८,५४१ रुपये होते. खासगी बँकांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे दररोजचे सरासरी वेतन मात्र तब्बल २.४८ लाख रुपये होते.

सरकारी आणि खासगी क्षेत्रातील प्रत्येकी पाच बँकांच्या वार्षिक अहवालांच्या विश्लेषणानंतर हा निष्कर्ष समोर आला. एका संस्थेच्या विश्लेषणानुसार, वित्तवर्ष २0१७ पासून सरकारी व खासगी बँकांच्या प्रमुखांच्या एका दिवसाच्या वेतनातील तफावत ७0 हजारांनी वाढली आहे. वित्तवर्ष २0१९ मध्ये एसबीआयचे चेअरमन रजनीशकुमार यांचे एक दिवसाचे वेतन ८,0९२ रुपये होते. त्याचवेळी एचडीएफसीचे सीईओ आदित्य पुरी यांचे एक दिवसाचे वेतन मात्र तब्बल ३.७४ लाख रुपये होते. एसबीआय ही सर्वांत मोठी सरकारी बँक आहे, तर एचडीएफसी ही सर्वांत मोठी खासगी बँक आहे.समभाग देण्याच्या विचारातखासगी बँकांच्या वरिष्ठ कार्यकारींच्या मोबदल्यात मोठा भाग समभागांच्या स्वरूपात असतो. सरकारी बँकाही या पर्यायावर सध्या विचार करीत आहेत. सरकारी बँकांच्या प्रमुखांना मोक्याच्या ठिकाणी शासकीय निवासस्थान मिळते. निवासस्थानावरील खर्च त्यांच्या वेतनात मोजला जात नाही.