Virat Kohli Deal: क्रिकेटपटू विराट कोहलीनं आपला स्पोर्ट्सवेअर आणि ॲथलेझर ब्रँड वन८ (One8) एजिलिटास स्पोर्ट्सला (Agilitas Sports) विकण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच, तो एजिलिटास स्पोर्ट्समध्ये ४० कोटी रुपयांची गुंतवणूक करून एक लहान हिस्सादेखील खरेदी करत आहेत.
हा करार विराट कोहलीसाठी एका नवीन प्रवासाची सुरुवात आहे, जिथे त्याचा वन८ ब्रँड आता एक स्वतंत्र ग्लोबल स्पोर्ट्स ब्रँड म्हणून काम करेल. एजिलिटास स्पोर्ट्स आधीपासूनच स्पोर्ट्स फुटवेअरचं उत्पादन आणि लायसन्सिंग क्षेत्रात सक्रिय आहे. आता ते वन८ ला नवीन उंचीवर नेण्याची तयारी करत आहेत.
विराट कोहलीच्या एका मोठ्या एंडोर्समेंट कराराच्या समाप्तीनंतर काही महिन्यांनी ही बातमी आली आहे. आठ वर्षांपर्यंत पूमा इंडियासोबत ११० कोटी रुपयांचा करार केल्यानंतर विराट कोहलीनं आता एजिलिटास स्पोर्ट्ससोबत एक नवीन भागीदारी केली आहे. एजिलिटास स्पोर्ट्सचे सह-संस्थापक आणि सीईओ अभिषेक गंगवार यांनी, वन८ आता एक स्वतंत्र, प्रीमियम ग्लोबल स्पोर्ट्स ब्रँड म्हणून काम करणार असल्याचं म्हटलं. ते ब्रिटन, दक्षिण आफ्रिका आणि अमेरिका यांसारख्या बाजारपेठांमध्ये डिस्ट्रिब्युशन पार्टनर अंतिम रूप देत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
एजिलिटासमध्ये ४० कोटींची गुंतवणूक
विराट कोहलीने एजिलिटास स्पोर्ट्समध्ये ४० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयात दाखल केलेल्या कागदपत्रांनुसार, या गुंतवणुकीद्वारे त्यानं कंपलसरी कन्व्हर्टिबल प्रेफरेंस शेअर्सच्या माध्यमातून १.९४% इक्विटी हिस्सा मिळवली आहे.
विराट कोहलीने स्वतः सोशल मीडियावर या नवीन सुरुवातीबद्दल माहिती देत आनंद व्यक्त केला. "आज एका रोमांचक नवीन अध्यायाची सुरुवात होत आहे. वन८ आणि एजिलिटाससाठी एक नवीन प्रवास सुरू होत आहे, जो उद्देश आणि महत्त्वाकांक्षेनं प्रेरित आहे. वन८ ला एजिलिटासमध्ये परत घेऊन जात आहे," असं त्यानं म्हटलं.
इंडस्ट्रीतील मजबूत खेळाडू आहे एजिलिटास स्पोर्ट्स
विराट कोहलीने २०१७ मध्ये पूमा सोबत मिळून वन८ ची सुरुवात केली होती. त्यावेळी पूमा आणि वन८ मध्ये एक परवाना करार होता, ज्यात इक्विटीचा हिस्सा नव्हता. आता एजिलिटास स्पोर्ट्ससोबतचा हा करार पूर्णपणे वेगळा आहे.
पूमा इंडिया आणि साउथ एशियाचे माजी एमडी अभिषेक गंगवार यांनी सांगितलं की, एजिलिटास स्पोर्ट्स वन८ साठी ग्लोबल स्पोर्ट्स इव्हेंट्ससोबत प्रायोजकत्व करार आणि खेळाडूंच्या माध्यमातून ब्रँडची ओळख निर्माण करण्यावरही विचार करत आहे. तथापि, हे करार सध्या चर्चेच्या टप्प्यात असल्याने त्यांनी याबद्दल अधिक माहिती दिली नाही.
एजिलिटास स्पोर्ट्स आधीपासूनच स्पोर्ट्स इंडस्ट्रीमध्ये एक मजबूत खेळाडू आहे. ही कंपनी मोशिको शूजची मालक आहे, जी ॲडिडास, पूमा, न्यू बॅलन्स आणि स्केचर्स सारख्या मोठ्या कंपन्यांसाठी बूट बनवते. याव्यतिरिक्त, एजिलिटास स्पोर्ट्सकडे लोटो ब्रँडचे परवाना अधिकार देखील आहेत.
लोटोचाही परवाना
एजिलिटासची स्थापना दोन वर्षांपूर्वी अभिषेक गंगवार यांनी अमित प्रभू आणि अतुल बजाज यांच्यासोबत मिळून केली होती. हे तिघेही पूर्वी पूमामध्ये काम करत होते. एजिलिटासनं मोशिको शूजच्या अधिग्रहणांनंतर इटालियन शू ब्रँड लोटोचे परवाना अधिकारही मिळवले होते. याअंतर्गत ते भारतात लोटोचे उत्पादन करतात आणि विकतात. एजिलिटास स्पोर्ट्स आपल्या सध्याच्या गुंतवणूकदार नेक्सस व्हेंचर पार्टनर्सकडून अतिरिक्त निधी गोळा करण्यासाठी देखील चर्चा करत असल्याची माहितीही समोर आली आहे.
