Join us  

नोटांची पडताळणी अद्याप सुरूच , आरबीआयने दिले स्पष्टीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 2:51 AM

५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद केल्याच्या घोषणेला एक वर्ष पूर्ण होत असताना, आरबीआयने स्पष्ट केले आहे की, अत्याधुनिक चलन सत्यापन प्रणालीद्वारे या नोटांची मोजणी करण्यात येत आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद केल्याच्या घोषणेला एक वर्ष पूर्ण होत असताना, आरबीआयने स्पष्ट केले आहे की, अत्याधुनिक चलन सत्यापन प्रणालीद्वारे या नोटांची मोजणी करण्यात येत आहे.आरटीआय (माहितीचा अधिकार)अंतर्गत एका प्रश्नाच्या उत्तरात रिझर्व्ह बँकेने सांगितले आहे की, ३० सप्टेंबरपर्यंत बँकेने ५०० रुपयांच्या १,१३४ कोटी नोटांची, तर १००० रुपयांच्या ५२४.९० कोटी नोटांची प्रक्रिया पूर्ण केली आहे. या दोन्ही नोटांचे मूल्य अनुक्रमे ५.६७ लाख कोटी आणि ५.२४ लाख कोटी रुपये आहे. या नोटांची एकत्रित किंमत १०.९१ लाख कोटी रुपये एवढी आहे.पीटीआयच्या बातमीदाराने विचारलेल्या प्रश्नावर माहिती देताना आरबीआयने स्पष्ट केले आहे की, या नोटांवरील प्रक्रिया दोन शिफ्टमध्ये सुरू आहे. अत्याधुनिक मोजणी मशिनवर हे काम सुरू आहे. आतापर्यंत मोजण्यात आलेल्या नोटांची माहितीही आरटीआयअंतर्गत मागविण्यात आली होती. यावर उत्तर देताना आरबीआयने स्पष्ट केले आहे की, नोटांच्या सत्यापनाचे काम ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. विविध बँकांमध्ये जमा करण्यात आलेल्या या नोटा ६६ सोफिस्टिकेटेड करन्सी व्हेरिफिकेशन अँड प्रोसेसिंग (सीव्हीपीएस) मशिनद्वारे या नोटांची मोजणी सुरू आहे. सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ रोजी ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद केल्या होत्या. या नोटा बँकात जमा करण्यासाठी त्या वेळी विशिष्ट मुदत देण्यात आली होती. जमा करण्यात आलेल्या नोटांचे आरबीआयकडून सत्यापन केले जात आहे. २०१६-१७ च्या आपल्या वार्षिक अहवालात आरबीआयने स्पष्ट केले होते की, चलनातून बाद करण्यात आलेल्या ५०० व १००० रुपयांच्या नोटांपैकी ९९ टक्के म्हणजेच, १५.२८ लाख कोटींच्या नोटा बँकेत परत आल्या आहेत. ३० जून २०१७ च्या एका अहवालात असेही स्पष्ट करण्यात आले होते की, १५.४४ लाख कोटींपैकी केवळ १६,०५० कोटींच्या नोटा परत आल्या नाहीत. ८ नोव्हेंबर २०१६ पर्यंत ५०० रुपयांच्या १,७१६.५ कोटी नोटा आणि १००० रुपयांच्या ६८५.८ कोटी नोटा चलनात होत्या. तथापि, नव्या ५०० व २००० रुपयांच्या नोटा छापण्यासाठी आरबीआयने ७,९६५ कोटी रुपये खर्च केले आहेत. ही रक्कम गतवर्षी खर्च करण्यात आलेल्या रकमेच्या म्हणजेच ३,४२१ कोटी रुपयांच्या तुलनेत दुप्पट आहे.काँग्रेस, तृणमूल काँग्रेससह विरोधी पक्षांनी स्पष्ट केले आहे की, नोटाबंदीला एक वर्ष पूर्ण होत असताना, ८ नोव्हेंबर रोजी ‘काळा दिवस’पाळण्यात येईल. दुसरीकडे विरोधकांचा मुकाबला करण्यासाठी सत्ताधारी भाजपाने नोटाबंदीला एक वर्ष पूर्ण होत असताना, हा दिवस ‘काळा पैसा विरोधी दिन’पाळण्याचे ठरविले आहे.

टॅग्स :नोटाबंदीबँक