Join us  

जुलैच्या घसरणीनंतर ऑगस्टमध्येही वाहन विक्री सार्वकालिक नीचांकावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 2:46 AM

‘सोसायटी ऑफ ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स’ने (सियाम) ही माहिती सोमवारी दिली. सियामने म्हटले की, सोसायटीने १९९७-९८ मध्ये घाऊक वाहन विक्रीची आकडेवारी ठेवायला सुरुवात केली

नवी दिल्ली : भारतातील वाहन विक्री आॅगस्टमध्ये विक्रमी घसरून सार्वकालिक नीचांकावर गेली आहे. प्रवासी वाहने आणि दुचाकींसह सर्व श्रेणींतील वाहनांची विक्री घटली असून वाहन क्षेत्र अभूतपूर्व मंदीत सापडले आहे.

‘सोसायटी ऑफ ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स’ने (सियाम) ही माहिती सोमवारी दिली. सियामने म्हटले की, सोसायटीने १९९७-९८ मध्ये घाऊक वाहन विक्रीची आकडेवारी ठेवायला सुरुवात केली. तेव्हापासून इतकी नीचांकी विक्री कधीच झाली नव्हती. सर्व श्रेणीतील वाहनांचा विचार करता आॅगस्टमध्ये विक्रीत २३.५५ टक्के घसरण झाली आहे. या महिन्यात प्रवासी वाहने, दुचाकी आणि व्यावसायिक वाहने या सर्व श्रेणीतील १८,२१,४९0 वाहने विकली गेली. आॅगस्ट २0१८ मध्ये २३,८२,४३६ वाहनांची विक्री झाली होती. जुलैमध्ये वाहन विक्रीत १८.७१ टक्के घट होऊन विक्री १९ वर्षांच्या नीचांकावर गेली होती. आॅगस्टमध्ये ती आता सार्वकालिक नीचांकावर गेली आहे.

प्रवासी वाहनांची विक्री ३१.५७ टक्क्यांनी घटून २,८७,१९८ वाहनांवरून १,९६,५२४ वाहनांवर आली आहे. जुलैमधील घसरण ३0.९८ टक्केहोती. विशेष म्हणजे वाहन विक्रीत सलग दहाव्या महिन्यात घसरण झाली आहे. प्रवासी वाहनांत नेतृत्वस्थानी असलेल्या मारुती सुझुकीच्या विक्रीत ३६.१४ टक्क्यांची घसरण झाली आहे.