Join us  

स्वयंपाकाचा विनाअनुदानित गॅस १०.५० रुपयांनी महाग

By admin | Published: June 02, 2015 12:15 AM

जागतिक बाजारपेठेत तेलाच्या किमती वाढल्यानंतर देशातील सरकारी तेल कंपन्यांनी सोमवारी विमानाच्या इंधनात

नवी दिल्ली : जागतिक बाजारपेठेत तेलाच्या किमती वाढल्यानंतर देशातील सरकारी तेल कंपन्यांनी सोमवारी विमानाच्या इंधनात ७.५ टक्क्यांची वाढ केली व विना अनुदानित स्वयंपाकाचा गॅस १०.५० रुपयांनी वाढवला.विमानाचे इंधन (एटीएफ) प्रति किलोलिटर ३,७४४.०८ (७.५४ टक्के) वाढून ५३,३५३.९२ रुपये प्रति किलोलिटर झाले. या आधी गेल्या मे महिन्यात जेट इंधनाचा भाव प्रतिकिलोलिटरमागे २७२ रुपयांनी (०.५ टक्के) वाढून ४०,६०९.८४ रुपये झाला होता. जागतिक तेल बाजारपेठेतील भाववाढीचा कल पाहता अनुदान नसलेले स्वयंपाक गॅसचे १४.२ किलोग्रॅ्रमचे सिलिंडर दिल्लीत ६२६.५० रुपयांना झाले आहे. रविवारपर्यंत त्याची किंमत ६१६ रुपये होती. या आधी गेल्या एक मे रोजी याच सिलिंडरचा भाव ५ रुपयांनी कमी झाला होता. ग्राहकांना वर्षभरात १४.२ किलोग्रॅमचे १२ आणि ५ किलोगॅ्रमचे ३४ अनुदानित सिलिंडर मिळतात. अशा सिलिंडरची किंमत दिल्लीत अनुक्रमे ४१७ आणि १५५ रुपये आहे. याशिवाय ग्राहकाला सिलिंडर हवे असल्यास ते बाजारभावाने घ्यावे लागते. बाजारभावाप्रमाणे ५ किलोग्रॅमचे सिलिंडर ३१८.५० रुपयांना आहे.