Join us

रिझव्र्ह बँकेचा द्वैमासिक पतधोरण आढावा आज

By admin | Updated: August 5, 2014 01:36 IST

रिझव्र्ह बँक आज पतधोरणाचा द्वैमासिक आढावा जारी करणार आहे. यात प्रमुख व्याजदर कायम ठेवले जाऊ शकतात.

नवी दिल्ली : रिझव्र्ह बँक आज पतधोरणाचा द्वैमासिक आढावा जारी करणार आहे. यात प्रमुख व्याजदर कायम ठेवले जाऊ शकतात. कमजोर मान्सूनमुळे खाद्यान्न महागाई आणखी वाढण्याची भीती आहे. या पाश्र्वभूमीवर रिझव्र्ह बँकेकडून हे धोरण मांडले जाणार आहे.
खाद्यान्न महागाई 8 टक्क्यांवर कायम आहे. याचा रिझव्र्ह बँकेच्या पतधोरण आढाव्यावर दबाव असणार आहे. महागाईवर नियंत्रण आणण्यास सर्वोच्च प्राधान्य असल्याचे रिझव्र्ह बँकेने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. टमाटा, बटाटा आणि कांदा यासारख्या जीवनोपयोगी वस्तूंचे भाव चढे आहेत. मान्सूनच्या स्थितीत सुधारणा न झाल्यास यात आणखी वाढ होण्याची भीती आहे. जुलैअखेर्पयत मान्सूनमध्ये वार्षिक सरासरीच्या 23 टक्के तूट नोंदली गेली आहे.
भारतीय स्टेट बँकेच्या प्रमुख अरुंधती भट्टाचार्य यांनी पतधोरणात प्रमुख व्याजदर कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे.  एचडीएफसी बँकेचे उप- महाव्यवस्थापक परेश सुकथांकर यांनीही व्याजदरात बदल करण्याची शक्यता फेटाळून लावली. चालू आर्थिक वर्षात वृद्धीमध्ये गुंतवणूक वाढ, धोरणात्मक सुधारणा यांचे योगदान राहील. व्याजदरांत घट केल्यास आर्थिक वृद्धी तेज होण्याची शक्यता नसल्याचे ते म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
तथापि, बाजारातील चलन तरलता वाढविण्यासाठी काही घोषणा करण्याचीही शक्यता वर्तविली जात आहे. ओबीसी बँकेचे चेअरमन एल. एल. बन्सल यांनी अतिरिक्त चलन निर्मितीसाठी काही ठोस उपाययोजना जाहीर केल्या जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली. (लोकमत न्यूज नेटवर्क)