Join us  

पारंपरिक बाजरीचे आंतरराष्ट्रीय ब्रॅण्डिंग, बंगळुरूत परिषद; संयुक्त राष्टांना आकर्षित करण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 1:48 AM

सोयाबिन आणि तूरडाळीसारख्या आधुनिक पिकांच्या शर्यतीत पारंपरिक बाजरी पौष्टिक असतानाही दुर्लक्षित असून, तिचे आंतरराष्ट्रीय ब्रॅण्डिंग करण्यासाठी पुढील महिन्यात बंगळुरूत आंतरराष्ट्रीय परिषद होत आहे. संयुक्त राष्टांना त्यात आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

मुंबई : सोयाबिन आणि तूरडाळीसारख्या आधुनिक पिकांच्या शर्यतीत पारंपरिक बाजरी पौष्टिक असतानाही दुर्लक्षित असून, तिचे आंतरराष्ट्रीय ब्रॅण्डिंग करण्यासाठी पुढील महिन्यात बंगळुरूत आंतरराष्ट्रीय परिषद होत आहे. संयुक्त राष्टांना त्यात आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू आहे.कर्नाटक सरकारने सेंद्रीय शेती व त्या माध्यमातून देशी आणि पारंपरिक पिकांवर लक्ष केंद्रित केले आहे. सेंद्रीय शेती धोरण २००४ मध्ये तयार केले, तेव्हा २५०० हेक्टरवर ती होत होती. हा आकडा आता ९३ हजार ९६३ हेक्टरवर गेला आहे. यानंतर त्यांनी बाजरी पिकाच्या मार्केटिंगसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठीच बंगळुरूत परिषद होत असल्याचे कर्नाटकचे कृषिमंत्री कृष्ण बायर गौडा यांनी सांगितले.१९६० च्या हरित क्रांतीनंतर आपली पारंपरिक धान्ये विस्मृतीत गेली. मात्र अशा धान्यांमध्ये अधिक पोषणमूल्ये आहेत. बाजरी त्यापैकीच एक पीक. शरीरातील लोह, बी जीवनसत्व, अ‍ॅमिनो अ‍ॅसिड, मधुमेह, लठ्ठपणा आदी संतुलित करण्याची क्षमता बाजरीत आहे. तांदळापेक्षा ७० टक्के कमी पाणी लागत असल्याने हे पीक दुष्काळातही तग धरून राहू शकते. देशात ३ कोटी एकरावर हे पीक घेतले जाते. पण मागणीअभावी ते दुर्लक्षित आहे. यासाठीच बंगळुरूत ही व्यापार परिषद घेतली जात आहे, असे गौडा म्हणाले.आंतरराराष्ट्रीय बाजरी वर्ष-संयुक्त राष्ट्रांकडून २०१८ हे ‘आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष’ म्हणून घोषित होण्याची शक्यता आहे. कृष्ण बायर गौडा यांनी त्यासाठी अलीकडेच संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संघटनेशी (यूएनएफएओ) चर्चा केली होती.