Join us  

वाहन विक्रीचा टॉप गिअर

By admin | Published: November 03, 2015 2:29 AM

सणासुदीमुळे आॅक्टोबर महिन्यात देशभरात कार विक्रीत लक्षणीय वाढ झाली असून मारुती सुझुकी आणि ह्युंदाई मोटार इंडियाच्या वाहनांची सर्वाधिक विक्री झाली.

नवी दिल्ली : सणासुदीमुळे आॅक्टोबर महिन्यात देशभरात कार विक्रीत लक्षणीय वाढ झाली असून मारुती सुझुकी आणि ह्युंदाई मोटार इंडियाच्या वाहनांची सर्वाधिक विक्री झाली.होंडा कार्स इंडिया, महिंद्रा अँड महिंद्रा आणि टाटा मोटर्सच्या वाहन विक्रीतही वाढ झाली. भारतात वाहन उद्योग क्षेत्रात सर्वात मोठी कंपनी असलेल्या मारुती सुझुकी इंडियाच्या देशांतर्गत विक्रीत २४.७ टक्के वाढ झाली असून आॅक्टोबर महिन्यात या कंपनीच्या १,२१,०६३ कार विकल्या गेल्या. मागच्या वर्षी याच अवधीत मारुती सुझुकीच्या ९७,०६९ कार विकल्या गेल्या होत्या.ह्युंदाई मोटर इंडियाच्या वाहनांच्या विक्रीचा गिअरही आॅक्टोबरमध्ये टॉपमध्ये राहिला. देशांतर्र्गत ह्युंदाई कारच्या विक्रीत २३.७ टक्के वाढ झाली. या अवधीत कंपनीच्या ४७,०१५ कार विकल्या गेल्या. आजवरची ही सर्वाधिक विक्री आहे. विक्रीत आगामी काळातही वाढ होईल, अशी आशा कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष (विक्री) राकेश श्रीवास्तव यांनी व्यक्त केली.आॅक्टोबर महिन्यात होंडा कार्स इंडियाच्या देशभरातील विक्रीत ५२ टक्के वाढ झाली. या अवधीत कंपनीच्या २०,१६६ कार विकल्या गेल्या. सणासुदीत मागणी असल्याने विक्रीत वाढ झाली. एवढेच नाही तर चालू आर्थिक वर्षातील ही सर्वाधिक विक्री होय, असे कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष (विपणन) ज्ञानेश्वर सेन यांनी सांगितले.महिंद्रा अँड महिंद्राच्या वाहन विक्रीतही आॅक्टोबरमध्ये २१ टक्के वाढ झाली. विक्रीबाबत आम्ही समाधानी आहोत. हाच कल यापुढेही कायम राहील, असे कंपनीचे मुख्य कार्यकारी (आॅटोमोटीव्ह विभाग) प्रवीण शाह यांनी सांगितले.टाटा मोटर्सच्या प्रवासी वाहनांच्या विक्रीतही आॅक्टोबरमध्ये ११ टक्के वाढ झाली असून या अवधीत टाटा मोटर्सची १२,७९६ वाहने विकली गेली. नवीन मॉडेल्समुळे विक्रीत वाढ झाल्याचे कंपनीच्या सूत्रांनी सांगितले.फोर्ड इंडिया लिमिटेडच्या एकूण विक्रीत ७५.५८ टक्के वाढ झाली. आॅक्टोबरमध्ये भारतात कंपनीच्या वाहन विक्रीत ४९ टक्के वाढ झाली.नव्या मॉडेलांना उत्तम प्रतिसादनवीन मॉडेल्समुळे सणासुदीत आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला. आताही विक्री चांगली होईल, अशी आशा असून त्यादृष्टीने नेटवर्क तयार केले आहे. एखाद्या महिन्यातील आजवरची कंपनीच्या वाहनांची आॅक्टोबरमध्ये सर्वाधिक विक्री झाली. आॅल्टो आणि वॅगन-आरसह छोट्या कारच्या विक्रीत ५.२ टक्के वाढ झाली. या अवधीत अशा ३७,५९५ कार विकल्या गेल्या. स्विफ्ट, अ‍ॅस्टिलो, रिट्झ, डिझायर आणि पेश बलेनोसह कॉम्पॅक्ट कारच्या विक्रीत आॅक्टोबर २०१५ मध्ये ३७.७ टक्के वाढ झाली, असे मारुती सुझुकी इंडियाचे कार्यकारी संचालक (विपणन) आर. एस. कलसी यांनी सांगितले.दुचाकी वाहनांची विक्रीही सुसाट...दुचाकी वाहनांच्या विक्रीचा वेगही या महिन्यात सुसाट राहिला. यामाहा इंडियाच्या विक्रीत २९.४३ टक्के वाढ होत या अवधीत यामाहाच्या ७०,८०० दुचाकी विकल्या गेल्या.